मुंबईत मुसळधार पावसाच्या तांडवात २३ बळी – केंद्र आणि राज्याची आर्थिक मदत

मुंबई:१८ जुलै- मुंबईच्या अनेक भागांमध्ये शनिवारी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळे अनेक भागांमध्ये तलावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. अनेक भागांमध्ये घरांमध्ये देखील पाणी शिरल्याचं दिसून आलं. चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी बांधलेली भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआयनं दिली आहे. पावसाच्या परिणामामुळे दरड
भिंतीवर कोसळल्यामुळे ही भिंतच कडेच्या घरांवर कोसळली. यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला असून एनडीआरएफचं पथक घटनास्थळी हजर आहे. आत्तापर्यंत ६ जणांना वाचवण्यात बचाव पथकांना यश आलं आहे. बचावकार्य अजूनही सुरू असून अजून काही नागरिक मलब्याखाली अडकले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विक्रोळीमध्ये घडलेल्या दुसऱ्या घटनेमध्ये एक दुमजली इमारत कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, या दुर्घटनांमधील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र आणि राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती निधीमधून २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यासोबतच, या दुर्घटनांमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दुर्घटनेत झालेल्या मृत्यूंसंदर्भात राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. पालिका आयुक्तांकडून मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी सुरू असलेल्या बचावकार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली असून जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
चेंबूरच्या आरसीएफ परिसरातल्या भारत नगरमध्ये ही दुर्घटना घडली. मध्यरात्री १२.३० ते १ च्या सुमारास हा प्रकार घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने वैयक्तिक पातळीवर बचावकार्य सुरू केलं. त्याच वेळी बचाव यंत्रणेला देखील माहिती देण्यात आली. त्यामुळे माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. या भागात सकाळी पावसाचं प्रमाण जरी कमी झालं असलं, तरी पावसामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला. त्यामुळे बचावकार्य करण्यात एनडीआरएफच्या जवानांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Leave a Reply