गडकरींच्या घरासमोर ‘आप’चे आंदोलन

नागपूर : १८ जुलै- राज्यातील एस.एस.सी.जी.डी.मध्ये वगळण्यात आलेल्या सर्व उमेदवारांना अंतिम निवड यादीत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी करत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वर्धा मार्गावरील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विदर्भ युवा संयोजक पीयूष आखरे व संयोजक गिरीश तितरमारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
गृहमंत्रालयाकडून कर्मचारी नियुक्त आयोग यांच्यामार्फत ६० हजार पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यात हजारो युवकांनी अर्ज केले. भरती प्रक्रियेत आवश्यक ती चाचणी पूर्ण करून पात्र असूनही, केवळ ५४ हजार पात्र उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. पात्र उमेदवारांवर केंद्र सरकारने अन्याय केला आहे. चाचणीमध्ये उत्तीर्ण युवकांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करत आम आदमी पक्षाने आंदोलन केले. पोलिसांची परवानगी न घेता आंदोलन केल्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले.

Leave a Reply