आता, स्मार्ट एलपीजी सिलिंडर!- कळणार टाकीतील गॅसची अचूक माहिती

नवी दिल्ली: १८ जुलै- नवा एलपीजी सिलिंडर ग्राहकांच्या भेटीला आला आहे. या स्मार्ट एलपीजी सिलिंडरमुळे ग्राहकांना टाकीतील गॅसची अचूक माहिती कळणार आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडने हा नवा एलपीजी सिलेंडर ग्राहकांच्या भेटीला आणला आहे. फायबरपासून हा कम्पोझिट सिलेंडर तयार करण्यात आला आहे. लवकरच ग्राहकांना तो उपलब्ध होणार आहे.
‘स्मार्ट स्वयंपाकघर’ डोळ्यासमोर ठेवून या सिलेंडरची निर्मिती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आताच्या सिलेंडरच्या तुलनेत हा स्मार्ट सिलेंडर वजनाने हलका आहे. तसेच ग्राहकांची फसवणूकही यामुळे टळणार आहे. तसेच हे स्मार्ट सिलेंडर सुरक्षित आहे. त्यामुळे लवकरच आताचा सिलेंडर नव्या सिलेंडरमध्ये रूपांतरीत होणार आहे.
कम्पोझिट सिलेंडर आताच्या सिलेंडरपेक्षा जास्त मजबूत आणि सुरक्षित आहे. तीन थर चढवून हा सिलेंडर तयार करण्यात आला आहे. यातील विशेष बनावटीमुळे टाकीत किती गॅस उरला आहे, याची माहिती मिळणार आहे. तसेच नवीन सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी याची मदत होणार आहे. तसेच फायबर असल्याने आताच्या सिलेंडरसारखा फरशीवर गंज लागणार नाही. सध्या वापरात असलेले सिलेंडर कम्पोझिट सिलेंडरमध्ये परिवर्तित करण्यासाठी सुरक्षा ठेव (सिक्युरिटी डिपॉझिट) द्यावे लागणार आहे. 10 किलो सिलेंडरसाठी 3 हजार 350 रुपये, तर 5 किलो सिलेंडरसाठी 2 हजार 150 रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या दिल्ली, गुरुग्राम, हैदराबाद, फरीदाबाद आणि लुधियाना या भागात स्मार्ट सिलेंडर वितरित केले जात आहेत.

Leave a Reply