आजची दुर्घटना महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच घडली – आशिष शेलार

मुंबई : १८ जुलै – चेंबूरच्या वाशीनाका परिसरात संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेवर टीका केली आहे. महापालिकेच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली असून मुंबई महापालिका मुंबईकरांच्या जीवाशी खेळत आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
आशिष शेलार यांनी आज वाशीनाका येथे जाऊन दुर्घटनाग्रस्त भागाला भेट दिली. यावेळी त्यांनी महापालिकेवर टीका केली. मी महापौरांवर बोलणं टाळत आहे. या ठिकाणी राजकारण करण्याची गरज नाही. डोंगर पायथ्याशी राहणाऱ्या लोकांना महापालिकेने पूर्वसूचना दिली होती का? त्यामुळे महापौरांचा अभ्यास कच्चा असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका शेलार यांनी केली.
आज घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्देवी आहे. या दुर्घटनेत दगावलेल्या व्यक्तिंच्या कुटुंबीयांसाठी सर्वांनीच मदत केली पाहिजे. महापालिकेने या नागरिकांचं पुनर्वसन करावं. त्यांची राहण्याची व्यवस्था करावी. धोकादायक भिंत काढावी. राज्य सरकारनेही मदत करायला हवी, असं ते म्हणाले.
या दुर्घटनेबद्दल आपण संवेदना प्रकट केल्या आहेत. ते ठिक आहे. पण या लोकांना सावरण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे. जे सत्तेत आहेत त्यांनी काही निर्णय घेतला की नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे, असं ते म्हणाले.
मुंबईच्या झोपडपट्टीत आढावा बैठक, पूर्वनियोजित बैठक घेण्यात आलेली नाही. दुर्देवाने संपूर्ण मुंबईत हे चित्रं पाहायला मिळत आहे. मुंबईत विजेच्या गतीने यंत्रणा उभी करण्याची महापालिकेची क्षमता आहे. पालिकेकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांची कमतरता नाही. पण इच्छाशक्तीचा अभाव आहे, असं त्यांनी सांगितलं. मुंबई महापालिका जनतेच्या जीवाशी खेळत आहे. एवढे बळी गेले. त्याला निष्काळजीपणा जबाबदार असून सामान्य माणसाला मात्र ते भोगावं लागत आहे, असं ते म्हणाले.

Leave a Reply