सारांश – ल.त्र्यं. जोशी

पंकजा मुंडे यांचा सात्विक संताप की, वैफल्य ?

भारतीय जनता पार्टीच्या एक राष्ट्रीय सचिव आणि महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीच्या एक सदस्य पंकजा पालवे मुंडे याच्या मंगळवारच्या भाषणाचा एकंदर बाज पाहिला तर बहिणीला मंत्रिपद न मिळणे, हे त्यानी मनोमन स्वीकारलेले दिसत नाही. त्यांच्या भाषणात त्वेष नक्कीच होता पण तो सात्विक संताप होता की, वैफल्य होते, हे कळण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. त्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहेत व मध्यप्रदेशच्या प्रभारी आहेत. खरे तर दिल्ली येथे पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यानी बोलावलेल्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीसाठी राजधानीत गेल्या होत्या. त्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रदीर्घ बैठकीत सहभागी झाल्या होत्या. या बैठकींहून परतल्यानंतर आपण नवीन जबाबदारी पार पाडण्यासाठी काय करणार आहोत हे सांगणे अपेक्षित होते. पण त्याबद्दल एक अवाक्षरही न काढता त्यांनी केवळ आपली बहिण डाॅ. प्रीतम मुंडे याना मंत्रिपद न मिळाल्याची खंतच अधिक होती. मी ऐकलेल्या त्यांच्या भाषणात भाजपा हा शब्द एकदोनदाच ऐकला. बाकी पूर्ण भाषण मी, माझा, मला या शब्दांनीच भरलेले होते. पक्षाची शिस्त आपण पाळली पाहिजे, पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, या अपेक्षित आवाहनाचा तर जणू त्याना विसरच पडला होता. प्रत्येक वाक्यात मुंडेसाहेब आणि समाज या उल्लेखांची मात्र रेलचेल होती. भाजपाच्या राष्ट्रीय सचिवांच्या प्रथम नड्डा यानी घेतलेल्या व नंतर मोदीजींच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीतून त्या आल्या असे एकदाही जाणवले नाही.
वास्तविक पंकजा मुंडे ह्या राजकारणात नवीन नाहीत. पंतप्रधान वा मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची रचना वा पुनर्रचना कशी करतात याची त्याना चांगली माहिती आहे. अशा काळात माध्यमांमधून कशा बातम्या येतात व त्या शंभर टक्के खर्या नसतात. त्यात अंदाजबाजीही असते, हेही त्याना चांगले ठाऊक आहे. त्यामुळे त्यावर किती विश्वास ठेवायचा हे त्याना कळयलाच हवे. असे असताना केवळ अंदाजावर विश्वास ठेवून आपल्या बहिणीला डावलले गेल्याचा आरोप करणे व त्यासाठी आपल्या कथित विरोधकांना कौरव पांडवांच्या भाषेत जबाबदार धरणे किती बेजबाबदारपणाचे लक्षण आहे, हे अन्य कुणाला नसेल पण पंकजाताईना नक्कीच ठाऊक आहे. तरीही त्या जेव्हा संताप व्यक्त करतात तेव्हा तो सात्विक राहत नाही. उलट वैफल्य प्रकट करीत असते. मंगळवारचे भाषण तेच सूचित करते. याचा एक अर्थ असाही निघू शकतो की, पक्षात आपल्याला भवितव्य नाही, असा संकेत त्याना मिळाला असावा. त्यामुळे त्या वैफल्यग्रस्त झाल्या असाव्यात. अन्यथा त्यानी त्या बैठकांनंतर दिल्लीतूनच मंगळवारचा मेळावा रद्द केला असता. पण असे दिसते की, त्या मेळाव्याचा तूर्त त्यानी स्प्रिंगबोर्ड सारखा उपयोग करून घेतला आहे.
मोदी, शहा व नड्डा हेच आपले नेते आहेत, हे त्यानी सांगण्याची तशी गरज नव्हती. ते सर्वानाच ठाऊक आहे पण त्यातून त्याना आपण महाराष्ट्राचे नेतृत्व मानत नाही, असे सुचवायचे असावे. नाइलाजास्तव तूर्त त्यानी माघार घेतली असली तरी त्यांच्या मनातील खदखद कायमच असल्याचे शब्दाशब्दातून जाणवत होते. कौरव पांडवांची भाषा तर अगदीच अनावश्यक होती. त्याना मविआ म्हणजे कौरव व भाजपा म्हणजे पांडव असे म्हणता आले असते. पण त्यानी ते जाणीवपूर्वक टाळलेले दिसते. कदाचित ते पुढे खुलाशासाठी राखून ठेवले असावे. त्यांच्या प्रयत्नाना युध्द म्हणायचे झाल्यास युध्दबंदी तेवढी जाहीर केलेली दिसते. ‘मोठे नेते पक्षाने दिलेले लक्षात ठेवतात, कार्यकर्ते मात्र न दिलेले लक्षात ठेवतात’ असे नमूद करून एकीकडे त्यानी स्वतःचे मोठेपण जाहीर केले व कार्यकर्त्यांचे नाव घेऊन इशाराही दिला आहे.
एवढे व्यक्तिस्तोम पचविणे भाजपाला कितपत परवडेल, हा प्रश्न त्यानी निश्चितच निर्माण करून ठेवला आहे.पण भारतीय जनता पार्टी वा त्यापूर्वीचा भारतीय जनसंघ हे पक्ष असे आहेत की, जेथे व्यक्ती अपरिहार्य असत नाहीत, पक्षाला प्राधान्य दिले जाते.म्हणूनच तेथे प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष व शेवटी मी, हे बोधवाक्य बनले आहे. या पक्षांचे काही अध्यक्ष मरण पावले तर मौलिचंद्र शर्मा, बलराज मधोक यांच्यासारख्या काही अध्यक्षांनी वेगळा मार्ग चोखाळण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी पक्ष कायम राहिला, एवढेच नाही तर वाढतही गेला. अर्थात त्यावेळी त्या नेत्यांबरोबर 10 टक्के लोक गेले असतील तर आजच्या व्यक्तिस्तोमाच्या काळात बंडखोर नेत्यांबरोबर 30 टक्के लोक गेले तरी 70 टक्के लोक पक्षासोबत राहणेच पसंत करतील. पंकजा मुंडे याना या वस्तुस्थितीची कितपत जाणीव असेल हा प्रश्नच आहे. तशी जाणीव असती तर विधानसभा निवडणुकीत त्यांचा तीस हजारांवर मतानी पराभव झाला नसता.
म्हणून भारतीय जनता पार्टी जोपर्यंत इलेक्टीव मेरिटबरोबरच तिकिटवाटपाचे कठोर निकष ठरवित नाही तोपर्यंत पक्षात एकनाथराव खडसे, पंकजा मुंडे निर्माण होणे अपरिहार्य आहे. मोदीजी आल्यानंतर त्यानी 75 वर्षांचा निकष लावला. तो लागू व्हायला थोडा वेळ लागला पण आता तो प्रस्थापित झाल्यासारखा दिसतो. राज्यपालांच्या बाबतीतही एका टर्मची अघोषित मर्यादा त्यानी घातलेली दिसते. तसेच तिकिटवाटपाबद्दल व्हायला हवे. त्यासाठी महापालिकेच्या नगरसेवकपदापासून तर मंत्रिपदापर्यंतची पदे निश्चित करावी लागतील व कुणालाही त्यासाठी किमान संधी ठेवाव्या लागतील. दोन किंवा फारतर अपवाद म्हणून तीन. पण त्यापेक्षा अधिक वेळा त्यासाठी तिकिट दिले जाणार नाही. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार व केंद्र वा राज्यातील मंत्री असे गट ठरवितो म्हटले तरी एका कार्यकर्त्याला पंचवीसपेक्षा अधिक वर्षे काम करण्याची संधी मिळू शकते. त्यानुसार कार्यकर्त्यांच्या आकांक्षांवर नियंत्रणही येऊ शकते. अपवाद किती प्रमाणात करायचे हेही याचवेळी ठरवावे लागणार आहे.
नागपूरचे एक निवडणूक अभ्यासक संजय फांजे यानी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र विधानसभा-2019 निवडणुकीमध्ये 192 विद्यमान आमदार पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात होते. यामधील 48 आमदारांना मतदारांनी घराचा रस्ता दाखवला आहे. याचा अर्थ 144 आमदाराना पुन्हा निवडून दिले आहे. ते सर्वच पहिल्यांदा निवडून आले नसतीलही. पण त्यात त्यांचेच प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ असाही आहे की, लोक नवे चेहरे अधिक पसंत करतात. पण त्याचबरोबर असेही दिसून येते की, योग्य उमेदवार दिले तर जुन्या आमदारांनाही लोक संधी देतात. विधानसभेतील 50 टक्के आमदार नव्या दमाचे मतदारांनी निवडून दिलेले आहेत तर 50 टक्के विद्यमान आमदाराना पुन्हा विधानभवनात कार्य करण्याची संधी मतदारांनी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. राज्याच्या राजकारणात महायुतीला कौल देताना मतदारांनी विचारपूर्वक उमेदवारांची निवड केल्याचे दिसून येत आहे. विद्यमान 288 आमदारांपैकी काही जणांनी राजकीय सोय वा लोकसभेत गेल्याने उमेदवारी मिळवली तर काही आमदारांना उमेदवारीच राजकीय पक्षांनी दिली नाही मात्र ज्या आमदारांना पुन्हा उमेदवारी मिळाली त्यापैकी 144 आमदारांनी पुन्हा जनतेचा विश्वास संपादन केला आहे.महाराष्ट्र विधानसभा-2019 पुन्हा निवडणूक लढविलेल्या 192 आमदारांच्या मध्ये भाजप व सेनेचे इतर पक्षांच्या तुलने सर्वाधिक विजयी उमेदवार होते. पक्षनिहाय संख्या भाजप-87, शिवसेना-47, कॉंग्रेस-23, राष्ट्रवादी-22, अपक्ष-6, शेकाप-2, बविआ-2, प्रहार जनशक्ती-1, सपा-1, एमआयएम-1 अशाप्रकारे आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्या भूमिकेचा विचार करावा लागेल. असे म्हटले जाते की, त्यांचा शिवसेनेत जाण्याचा विचार आहे. अधिकृतपणे त्या या विचाराचा इन्कारही करतील पण तो तेवढ्यापुरताच. शेवटी भाजपमध्ये आपल्याला आता किती भवितव्य आहे याचा त्याना विचार करावाच लागणार आहे. त्याचबरोबर त्यांच्यासारख्या नेत्यांचे महत्व ते पक्षात असतात तोपर्यंतच कायम राहते. नंतर त्यांचा ‘नाथाभाऊ’ केव्हा होतो, याचा पत्ताही लागत नाही. पंकजा हा विचारही नक्कीच करू शकतात.

ल.त्र्यं. जोशी
ज्येष्ठ पत्रकार

Leave a Reply