पवार-मोदींची भेट राजकीय आहे, असं मला वाटत नाही – संजय राऊत

नवी दिल्ली : १७ जुलै – राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीचे राजकीय अर्थ काढले जात आहेत. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. शरद पवार हे देशातील प्रमुख नेते आहेत. ते कृषी आणि सहकार क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यामुळे ते जेव्हा पंतप्रधानांना भेटतात तेव्हा त्यात राजकारण का काढता?, असा सवाल करतानाच पवार अधूनमधून पंतप्रधानांना भेटत असतात. त्यामुळे यात काही राजकारण आहे, असं वाटत नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर मीडियाशी बोलताना संजय राऊत यांनी हा सवाल केला. पवार-मोदींची राजकीय भेट आहे, असं मला वाटत नाही. या भेटीत सहकार आणि कृषी क्षेत्रावर चर्चा झाली असेल. पवार हे देशाचे प्रमुख नेते आहेत. सहकार आणि कृषी क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ते पंतप्रधानांना भेटतात तेव्हा तुम्ही त्यात राजकारण का काढता? पवार हे मोदींना भेटत असतात. प्रत्येक भेटीत राजकारण असत नाही, असं त्यांनी सांगितलं.
सहकारी कारखान्यावर ईडीच्या कारवाया सुरू झाल्या आहेत. सरकारमधील सहभागी लोकांना टार्गेट केल जात आहे. पंकजा मुंडे यांच्या कारखान्यावर कारवाई झाल्याचं मी माध्यमातून वाचत आहे, असं ते म्हणाले.
शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्याची चर्चा आहे. त्यावर राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर मला त्याविषयी माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं.
आज राज्यसभेची सर्वपक्षीय बैठक आहे. त्यांचा काय रागरंग आहे, तो पाहू. मग राज्यसभेतील भूमिका ठरवू, असं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच राज्यसभेच्या सर्वपक्षीय बैठकीला शरद पवार येणार आहेत. तेव्हा त्यांना भेटेन. त्यांच्याशी चर्चा होईल, असंही त्यांनी सांगितलं.

Leave a Reply