सर्व मंदिरे खुली करण्याची विहिंपची मागणी, १७ जुलैला भजन आंदोलन

नागपूर: १५ जुलै-राज्यातील मंदिरे सर्व भक्तांना दर्शनासाठी खुली करा, पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी पालख्यांना मर्यादित संख्येने परवानगी द्या, तसेच विठ्ठल दर्शन खुले करा आदी मागण्यांसाठी सरकारविरोधात १७ जुलैला विदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर भजन आंदोलन करणार असल्याची माहिती कीर्तनकार हभप श्रीरामपंत जोशी महाराज व विहिंपचे प्रांत सहमंत्री सनतकुमार गुप्ता यांनी पत्रपरिषदेत दिली.
१७ जुलैला संपूर्ण टेकडी मार्गावरील भोंडा महादेव मंदिराजवळून सकाळी १० वाजता वारकरी व हिंदू समाज प्रतिकात्मक वारीच्या स्वरूपात निघून जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. तेथे भजन, किर्तन करून वारीची आठवण म्हणून वृक्षारोपण करतील. पुढच्या पिढीला ७५० वर्षांहुन अधिक काळातील परंपरा खंडित झाली याची आठवण राहील. विदर्भातील २० स्थानी हजारो वारकरी संत व हिंदू समाज आंदोलन करणार आहे. या आंदोलनात देवनाथ पीठाधिश्वर जितेंद्रनाथ महाराज, सद्गुरूदास महाराज, हभप श्रीरामपंत जोशी, हभप नारायण महाराज शिंदे, गणूदास महाराज, हभप श्याबुवा धुमकेकर महाराज मार्गदर्शन करणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
या आंदोलनात वैदर्भीय हरिकीर्तन संस्था, जलाराम सत्संग मंडळ, अखिल ब्रह्मवृंंद संस्था, विश्व वारकरी सेवा संस्था, ज्ञानदेव- तुकाराम प्रतिष्ठान, गीता अभ्यास मंडळ, संत गजानन महाराज समिती आदींसह अनेक संस्था सहभागी होणार आहेत. सद्गुरूदास महाराज, भगीरथ महाराज, श्यामबुवा धुमकेकर, हभप रमेश महाराज बनकर, हभप संदीप महाराज कोहळे, हभप दिगंबरबुवा नाईक, हभप देवेंद्र महाराज भुजाडे, हभप चंदु भोजने महाराज, विहिंपचे नागपूर महानगर मंत्री प्रशांत तितरे, मृण्मयी कुळकर्णी, प्रचार प्रमुख निरंजन रिसालदार आदी पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

Leave a Reply