घ्या समजून राजेहो!

उद्धवपंतांनी दिली तत्वशून्य राजकारणाची कबुली


राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात आहे, मात्र सरकारमध्ये सोबत असल्यामुळे मी त्यांच्यावर टीका करत नाही, अशा आशयाचे विधान शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धवपंंत ठाकरे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. उद्धवपंंतांचे हे विधान म्हणजे, त्यांनी फक्त सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी वैचारिक मतभिन्नता असतानाही, केवळ तत्वशून्य युती केली आहे, असा अर्थ काढता येतो.
ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर शिवसेनेने युती करून सरकार बनवण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वच राजकारण हे काँग्रेसच्या विरोधात राहिले होतेे. ज्या शरद पवारांच्या मदतीने बाळासाहेब ठाकरेंचे कथित स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांना दिलेला कथित शब्द खरा ठरवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली. त्या शरद पवारांवर बाळासाहेब ठाकरेंनी अगदी टोकाला जाऊन टीका केली होती, हे उद्धवपंंत विसरले असतील, मात्र, महाराष्ट्र विसरलेला नाही. शिवाजी पार्कच्या जाहीर सभेत शरद पवारांना बारामतीचा ममद्या आणि मैद्याचं पोतं, अशा शेलक्या विशेषणांनी गौरवणार्या बाळासाहेबांची आठवण आजही महाराष्ट्राला होते. शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस हे मूळचे काँग्रेसचेच अपत्य, मात्र, थोडे मोठे झाल्यावर पंख फुटले म्हणून वेगळा घरठाव केला तरी, संस्कृती आणि विचारधारा ही काँग्रेसचीच होती. बाळासाहेबांनी शिवसेना उभी केली, ती मराठी माणसाच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी. त्यावेळी काँग्रेस असो, समाजवादी पक्ष किंवा जनसंघ असो, सर्वांनाच राष्ट्रीय स्तरावर राजकारण करायचे असल्यामुळे त्यांचे सर्वसमाावेशक धोरण राहिले होते. त्याला बाळासाहेबांचा कायम विरोध राहिला होता. मुंबईच नव्हे, तर, संपूर्ण महाराष्ट्र हा मराठी माणसाचा असून, इथे मराठी माणसाचीच सत्ता असली पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. १९७८च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष रजनी पटेल होते, तर, दुसरा प्रमुख राष्ट्रीय पक्ष असलेल्या जनता पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष हे शांती पटेल होते. त्यावेळी काँग्रेसचे रजनी पटेल, जनता पक्षाचे शांती पटेल, मराठी माणसा! तुला हे पटेल? अशा घोषणांनी शिवसेनेने उभ्या मुंबईतील भिंती रंगवल्या होत्या, त्यामुळे मुंबईची अन्य प्रांतीयांसाठी धर्मशाळा बनवणाऱ्या राजकीय पक्षांना बाळासाहेबांनी कायम विरोध केला होता.
काही वर्षांनी बाळासाहेबांनी शिवसेनेचा सांधा बदलला, ते मराठी माणसासोबत हिंदुत्वाचाही विचार करते झाले. इथेही बाळासाहेबांचे म्हणजेच शिवसेनेचे आणि काँग्रेसचे पटणे शक्य नव्हते, कारण काँग्रेसने सर्वधर्मसमभावाचे धोरण जपले होते. त्यातही अल्पसंख्यकांकडे कायम झुकते माप राहिले होते. परिणामस्वरूप, काँग्रेसला बाळासाहेबांनी कायम विरोधच केला होता. भारतीय जनता पक्षाची हिंदुत्वा संबंधीची धोरणे लक्षात घेत, जवळ-जवळ ३० वर्षे भाजपसोबत त्यांनी युती ठेवली, अर्थात, तिथेही भांड्याला भांडे लागत होतेच! त्यामुळे बाळासाहेब किंवा शिवसेना यांचा कायम ३६चाच आकडा राहिला होता.
नाही म्हणायला, काही वेळा बाळासाहेब काँग्रेससोबत घरठाव करते झाले होते, मात्र त्या राजकीय अपरिहार्यता होत्या, असेच म्हणावे लागेल. १९७५मध्ये इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लावली होती, तेव्हा बाळासाहेबांनी आणि आणीबाणीला पाठिंबा जाहीर करून टाकला होता. आधी म्हटल्याप्रमाणे हे अपरिहार्यतेतून केलेले कृत्य होते, असे म्हणावे लागेल. आणीबाणीत इंदिरा गांधींनी प्रत्येक विरोधकाची पूर्णत: मुस्कटदाबी केली होती. बाळासाहेबांनी त्यावेळी जर विरोध केला असता तर, बाळासाहेबांना आणि सोबतच्या सर्व आघाडीच्या नेत्यांना ऑर्थर रोड किंवा येरवडा तुरुंगात बसावे लागले असते. त्यावेळी शिवसेनेला मुंबई, पुणे आणि ठाणे वगळता कुठेही फारसे स्थान नव्हते. प्रमुख नेते जर तुरुंगात गेले असते तर, संघटनेची कदाचित वाताहतही झाली असती. तो धोका पत्करायचा नसल्यामुळे बाळासाहेबांनी इंदिरा गांधींना साथ दिली, असा निष्कर्ष काढता येतो. त्यानंतर 1980मध्ये बॅ. अंतुले मुख्यमंत्री झाल्यावरही काही काळ शिवसेनेने त्यांना साथ दिली होती, मात्र, तीही अपरिहार्यतेपोटीच होती.
2007मध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्यावेळीदेखील शिवसेनेने काँग्रेसला साथ दिली होती. त्यावेळी काँग्रेसच्या प्रतिभा पाटील या राष्ट्रपतिपदाच्या उमेदवार होत्या. प्रतिभा पाटील या महाराष्ट्राच्या होत्या आणि मराठी कुटुंबातील होत्या. त्यावेळी शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाने भैरवसिंह शेखावत यांना उमेदवारी दिली होती. मित्रपक्ष म्हणून शिवसेनेने भाजपला मदत करावी, अशी भाजपची अपेक्षा होती, मात्र, शिवसेनेने प्रतिभा पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. मराठी व्यक्ती देशाच्या सर्वोच्चपदी जाते आहे, याचा आम्हाला अभिमान आहे आणि या पार्श्वभूमीवर आम्ही मतभेद बाजूला ठेवून प्रतिभा पाटील यांना पाठिंबा देऊ, असे बाळासाहेबांनी त्यावेळी घोषित केले होते. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीला वैचारिक मतभेद बाजूला ठेवून ही शिवसेनेने दिलेली आणखी एक साथ होती. ज्यावेळी शरद पवारांची कन्या सुप्रिया सुळेे यांना राज्यसभेची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसने दिली, त्यावेळी वैचारिक मतभेदांपेक्षा कौटुंबिक संबंध जपत बाळासाहेबांनी सुप्रिया सुळेंना अविरोध राज्यसभेवर पाठवण्यासाठी पुढाकार घेतला होता. ही आठवण खुद्द शरद पवारांनीच एका मुलाखतीत सांगितली होती.
हे काही प्रसंग वगळता शिवसेना आणि काँग्रेस किंवा काँग्रेसचेच अपत्य असलेला राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फारसे सख्य कधी राहिले नव्हते. काँग्रेसच्या घराणेशाहीला, अल्पसं‘यंक लागूलचालनाला इतर सर्वच धोरणांना बाळासाहेबांनी कायम जीव तोडून विरोध केला होता. मुंबई बॉम्बस्फोट, अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यावरच्या मुंबईतील दंगली, अशा अनेक प्रसंगातून शिवसेना आणि काँग्रेसमधील मतभेद उघड झाले होते. त्याच खुन्नसीच्या जोरावर बाळासाहेबांना तुरुंगात टाकण्याच्या प्रयत्नही काँग‘ेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने २०००साली केला होता. हा इतिहासही ताजा आहे. प्रत्येक निवडणुकांमध्ये शिवसेना ही कायम काँग्रेसच्या विरोधातच लढली होती आणि अगदी अखेरपर्यंत म्हणजेच २०१९च्या निवडणुकीपर्यंत हा विरोध आणि त्यामुळे होणारा संघर्ष कायम होता.
या सर्व पार्श्वभूमीवर, २०१९च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, लगेचच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांशी असलेले शिवसेनेचे राजकीय मतभेद एका रात्रीत संपले असतील, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, तरीही, काही तरी चमत्कार घडावा, तसे अचानक हे तीन पक्ष एकत्र आले आणि महाराष्ट्रात कसे कां होईना, पण, हे तीनचाकी ऑटोरिक्शा सरकार चालवत आहेत, ही फक्त राजकीय तडजोड आहे, हे समजण्याइतपत महाराष्ट्राची जनता मूर्ख निश्चितच नाही. अर्थात, या सर्व प्रकाराला तीनही पक्षांनी कुठे भावनिक, तर, कुठे तात्विक मुलामा देण्याचा निश्चितच प्रयत्न केला. महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेचा मु‘यमंत्री बनवीन, असा आपण बाळासाहेबांना अखेरच्या क्षणी शब्द दिला होता, हा दावा करत उद्धवपंतांनी या सर्व प्रकरणाला भावनिक खळ दिली. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या खोलीत अमित शहांनी अडीच वर्षे शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देऊ, असा शब्द दिला होता, अशी कपोलकल्पित कथाही त्यांनी ऐकवली आणि बाळाहेबांचा शब्द आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही ही महाआघाडी करत आहोत, असे उद्धवपंतांसह समस्त शिवसेना नेत्यांनी छातीठोकपणे सांगितले. दुसरीकडे, भाजपने देशाची वाट लावली आहे, म्हणून त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही शिवसेनेसोबत जात आहोत, असा तात्विक मुलामा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने दिला. अशी केवळ सत्तेसाठी ही कोणताही विधिनिषेध नसलेली महाआघाडी बनलेली आहे.
अर्थात, या महाआघाडीत उद्धवपंतांना धरून-बांधून मु‘यमंत्री व्हावे लागले, त्यामुळे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष होते आहे. देशातील छोट्या पक्षांचा इतिहास बघितला तर, पक्षप्रमुख मुख्यमंत्री झाले की, काही काळातच त्या पक्षाची वाट लागते, असा अनुभव आहे. एन.टी. रामाराव, चंद्राबाबू नायडू, मायावती, मुलायमसिंह यादव, प्रफुल्लकुमार महंतो, अशी अनेक उदाहरणे देता येतील, मात्र पक्षसंघटनेचा बळी देऊन उद्धवपंतांनी हे शिवधनुष्य पेलले आहे. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक निश्चितच दुखावलेला आहे.
याचसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसार‘या निधार्मिकतावादाच्या तत्वावर पोसलेल्या पक्षांसोबत हातमिळवणी केल्यामुळे शिवसेनेला अनेक ठिकाणी आपले हिंदुत्वाचे आणि मराठीपणाचे तत्व बाजूला ठेवावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या आमदारांनी इदेनिमित्त अजानची स्पर्धा घेण्याचा निर्णय हे त्याचे उत्तम उदाहरण आहे, असे अनेक प्रसंग आणि अनेक किस्से इथे सांगता येतील.
मात्र, आजवर उद्ववपंत ठाकरे आम्ही किती तत्वनिष्ठ आहोत आणि तात्विक मुद्दांवर आधारित कसा समान किमान कार्यक्रम राबवत आम्ही सरकार चालवतो आहोत, असे सांगून ते आपली पाठ थोपटत आले आहेत. आम्ही कुठे चुकलो हे मान्य करायला ते आजवरतरी तयार नव्हते. राजकीयदृष्ट्या मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याविरोधात आहे, असे त्यांनी सांगणे हे हातून घडलेल्या चुकीची कबुली देण्याचे पहिले पाऊल आहे, असे म्हणता येते.
उद्धवपंतांना आज झालेल्या चुकीची कबुली देण्याची उपरती झाली असेलही, मात्र, माझ्यामते, त्याला आता उशीर झाला आहे. २०१९मध्ये भाजपसोबत लढवलेली निवडणूक त्यावेळी एकत्र सरकार बनवण्याचे जनतेला दिलेले आश्वासन नंतर त्यावरून केलेले घूमजाव, त्यासाठी बाळासाहेबांना दिलेला शब्द आणि त्यांच्या खोलीत अमित शहांनी दिलेला शब्द याच्या ऐकवलेल्या कथा हे सर्व सत्तेसाठी घडवलेले महाभारत होते, हे महाराष्ट्राच्या जनतेने तेव्हाच जाणले होते, मात्र देशातील घटनात्मक तरतुदींमुळे एकदा मत दिल्यावर पुढील पाच वर्षं मतदाराला काहीच करता येत नाही, त्यामुळे मतदाराचा नाईलाज झाला, मात्र मतदार शहाणा झाला आहे. उद्धवपंंतांच्या तत्वशून्य राजकारणाचा आलेला अनुभव लक्षात घेता, मतदार पुढील निवडणुकीत निश्चितच विचार करेल, याची खात्री उद्धवपंतांनी बाळगायलाच हवी.

तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो….

ता.क. : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

अविनाश पाठक

Leave a Reply