आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या हबिबूर रहमानला अटक

नवी दिल्ली : १५ जुलै – पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हेरगिरी करणाऱ्या हबिबूर रहमान याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. हबिबूर हा मुळचा राजस्थानातील बिकानेर इथला रहिवासी असून त्याला पोखरणमधून अटक करण्यात आली आहे. हबिबूर हा लष्कराची गोपनीय माहिती आणि त्यांच्यावर देखरेख ठेवत असल्याचं लक्षात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याच्याकडून महत्त्वपूर्ण नकाशा आणि लष्कारासंदर्भातील महत्त्वाची कागदपत्रं हस्तगत करण्यात आली आहेत. रहमान हा पाकिस्तानच्या आयएसआय यंत्रणेसाठी काम करत होता. तसेच त्याने आयएसआयसाठी संपूर्ण देशाचा दौरा केल्याचंही निष्पन्न झालं आहे. दिल्लीच्या गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. हबिबूरच्या अटकेनंतर हेरगिरीचं मोठं जाळं उघडीस आलं आहे.
हबिबूरची चौकशी केल्यानंतर त्याने त्याला कुणी कुणी मदत याबाबतचा खुलासा केला आहे. गोपनीय माहिती आणि नकाशा लष्काराच्या जवानाने दिल्याचं त्याने कबुली दिली आहे. त्यामुळे लष्कराचा जवान संशयाच्या भोवऱ्यात आहे. जवानाला चौकशीसाठी आग्र्यात बोलवण्यात आलं आहे. त्याची चौकशी केल्यानंतर आणखी काही महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे. तर पोलिसांनी हबिबूरला मदत करणाऱ्या काही जणांना अटक केली आहे. आग्र्यात तैनात असलेला जवान परमजीत कौर याने कागदपत्रं दिल्याचं कबुली आरोपी हबिबूरने दिली आहे. त्याचबरोबरी रहमानला ही माहिती कमल नावाच्या व्यक्तीकडे सोपवायची होती.
हबिबूर रहमान हा पोखरण आर्मी बेसला भाजी पुरवत असल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून ठेका पद्धतीवर भाजी पुरवण्याचं काम करत होता. तेव्हा तिथे त्याने काही जवानांशी सलगी केली आणि आयएसआय या गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवण्याचं काम केलं.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानासाठी हेरगिरी करणाऱ्या दोघां बहिणींना मध्य प्रदेशातील इंदौरमधून अटक करण्यात आली होती. इंदौरजवळील महू येथील सैन्य छावणीत हेरगिरी करत असल्याचा या दोघींवर आरोप आहे. त्या पाकिस्तानमधील व्यक्तींशी संपर्कात होत्या आणि महू सैन्य छावणीची माहिती पुरवत होत्या. काही दिवसांपूर्वी दोघी जणी रस्त्यावरून जात असताना पाकिस्तानातील व्यक्तींशी बोलत होत्या. या दरम्यान गुप्तचर विभागाने त्यांच्या फोनची फ्रिक्वेंसी पकडली आणि त्यांचं बिंग फुटलं होतं.

Leave a Reply