संपादकीय संवाद – पंकजा मुंडेंचा आजचा निर्णय म्हणजे एकनाथी भारूड एकवणाऱ्या दलबदलूंना सणसणीत चपराक

प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न दिल्याने मुंडे भगिनी नाराज असून त्या कठोर पाउले उचलू शकतात या सुरु असलेल्या चर्चेला अखेर आज पंकजा मुंडेंनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांच्या बैठकीत पूर्णविराम दिला हे अतिशय सुज्ञ पाऊल म्हणावे लागेल. गेला जवळजवळ आठवडाभर ही चर्चा सुरु होती. पंकजा आणि प्रीतम या दोघी बहिणींना मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसात पक्षाचे आणि पदाचे राजीनामे तयार करून पंकजांकडे पाठवले होते. त्यामुळे आज कार्यकर्त्यांना भेटल्यावर पंकजा मुंडे एकतर नवा पक्ष किंवा आघाडी काढतील अन्यथा त्या शिवसेनेसारख्या दुसऱ्या एखाद्या पक्षात जातील असे तर्क लावण्यात येत होते. मात्र हे सर्व तर्क निष्फळ ठरवत पंकजा मुंडेंनी आपण इथेच राहणार असल्याचे स्पष्ट केले, हा अतिशय चांगला निर्णय ठरला आहे.
राजकीय पक्षात काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला पक्षात मोठे पद मिळावे ही इच्छा असते, पक्षाची शिडी वापरून शासकीय स्तरावर एखादे पद मिळावे अशीही महत्वकांक्षा असते मात्र,पक्ष हा पाच-दहा कार्यकर्त्यांचा नसतो असंख्य समविचारी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तो पक्ष बनतो या पक्षात प्रत्येकालाच सर्वोच्च पद मिळणे शक्य नसते. मग अश्यावेळी फाजील महत्वकांक्षेने प्रेरित झालेली माणसे दुसऱ्या पक्षाची दारे ठोठावतात अर्थात दुसऱ्या पक्षात गेल्यावर सर्वांच्याच महत्वकांक्षा पूर्ण होतात असे नाही, अनेकदा असे फाजील महत्वाकांक्षेने वेडे झालेले दलबदलू तोंडघशीही पडतात. काहींना पक्षबदल करताना छोटेसे गाजर दिले जाते खरे मात्र थोड्याच दिवसात अश्या दलबदलूंची अवस्था तेलही गेले आणि तूपही गेले अशी झालेली दिसते.
अश्यावेळी पदापेक्षा विचार श्रेष्ठ हा मुद्दा घेऊन कार्यकर्ता जेव्हा समोर येतो तेव्हा जनसामान्य निश्चितच सुखावून जातात. मुंडे भगिनींच्या निर्णयामुळे आज जनसामान्य निश्चितच सुखावले असतील यात शंका नाही.
पंकजा मुंडेंनी आज कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली मी स्वतःचा विचार करून काहीही मिळवू शकते मात्र ते माझ्यावर संस्कार नाहीत माझे संस्कार गोपीनाथ मुंडेंचे आहेत त्यामुळे पद मिळाले नाही म्हणून मी पक्ष सोडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. जे घर मी बनवले ते सोडण्यासाठी माझा जन्म नाही कष्टाने बनवलेले घेर का सोडायचे? जर घराचे छत कोसळून अंगावर येत असेल तर बघू एरवी मी घर सोडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांचे हे विचार म्हणजे गेल्या दोन वर्षात भाजपची राज्यातील सत्ता गेली म्हणून पक्ष सोडणाऱ्यांना आणि सत्तेच्या पदासाठी आपले एकनाथी भारूड एकवणाऱ्या दलबदलूंना सणसणीत चपराक असल्याचेच मानावे लागेल.
यापूर्वी २०१९ च्या निवडणुकीत पंकजा मुंडे पराभूत झाल्या तेव्हाही त्या पक्ष सोडणार अशी जोरदार चर्चा सुरु झाली होती, त्यावेळी भगवान गडावर मेळावा घेऊन पंकजा मुंडेंनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देत पुन्हा पक्षकार्यात स्वतःला झोकून दिले होते,आजही त्यांनी तीच परंपरा पुढे जपली आहे. त्यांचे दिवंगत वडील गोपीनाथजी मुंडे यांनीही दोनदा पक्षाबाबत नाराजी निश्चित व्यक्त केली होती त्यावेळेस इतर पक्षांनी गोपीनाथ मुंडेंसाठी पायघड्याही घातल्या होत्या. तेव्हाही गोपीनाथजींनी पदापेक्षा पक्ष आणि विचार श्रेष्ठ हेच तत्व जपले होते. अखेरपर्यंत ते विचारांची एकनिष्ठ राहिले होते.
स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्याच तत्वनिष्ठ परंपरेच्या आपण पाईक आहोत हे आज मुंडे भगिनींनी स्पष्ट केले आहे. त्यासाठी देशभरातील भाजपप्रेमी आणि गोपीनाथ मुंडे प्रेमी जनता त्यांचे कौतुकच करेल हे निश्चित.

अविनाश पाठक

Leave a Reply