नागपुरात न्युमोकॉकल लसीकरण मोहिमेचा शुभारंभ

नागपूर : १३ जुलै – नागपुरात न्युमोकॉकल लसीकरण मोहीम प्रारंभ करण्यात आली. नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारींनी या मोहिमेची सुरुवात केली. मात्र चिमुकल्यांना न्युमोकॉकल लस देताना शेजारी असलेले नागपूर महापालिकेचे अधिकारी विनामास्क चिमुकल्यांच्या शेजारी वावरत असल्याचे दिसले. नागपुरात न्युमोकॉकल लसीकरणाच्या वेळी हा गंभीर प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वात मोठं शस्त्र म्हणजे मास्क. याबाबतची आरोग्य यंत्रणांकडून वारंवार सूचना केली जात आहे. मात्र खुद्द आरोग्य यंत्रणांचेच अधिकारी या नियमाला तिलांजली देत असतील तर त्याला काय म्हणावे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नागपूरात आजपासून म्युमोकॉकल या लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. या लसीकरणावेळी खुद्द महापालिकेचे सहआयुक्त राम जोशी आणि आरोग्य अधिकारी यांनी मास्क खाली केला होता. या केंद्रांवर लहान मुलांचं लसीकरण सुरू होतं. शिवाय त्यांच्या माता आणि इतर कर्मचारी होते. ही मुलं अगदी दोन चार महिन्यांची असल्यानं त्यांना मास्क घालणं शक्य नाही.
त्यामुळं त्याठिकाणी उपस्थित असलेल्यांना मास्क घालणं अनिवार्यच होतं. मात्र, आरोग्य अधिकाऱ्यांना याचं गांभीर्य कळलं नाही आणि त्यांनी आपला मास्क खाली केला होता. यासंदर्भात महापौरांना विचारल्यावर त्यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली. जर अधिकारी असं वागत असतील तर ही गंभीर चूक आहे, यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना ताकीद दिली जाईल, असं महापौरांनी सांगितलं.

Leave a Reply