पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्यामुळेच त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली – देवेंद्र फडणवीस

नागपूर : १२ जुलै – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्याने शिवसेना आणि राष्ट्रवादीला कापरे भरले आहे. त्यांना जेवणही जात नाही आणि पाणीही पीत नाहीत. त्यामुळेच पटोलेंवर पाळत ठेवण्यात आली असून त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.
देवेंद्र फडणवीसांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नाना पटोले यांनी आघाडी सरकारवर केलेल्या गंभीर आरोपवर प्रतिक्रिया व्यक्त केली. नाना पटोले यांनी स्वबळाची घोषणा केल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेला कापरं भरलंय. त्यांना जेवण जात नाहीय, पाणीही पिता येत नाहीय. ते अत्यंत घाबरलेले आहेत. म्हणून त्यांनी नाना पटोलेंवर पाळत ठेवली आहे असं नानांचं म्हणणं आहे. आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी याबाबत उत्तर द्यावं, त्याबाबत मी काय बोलणार, असं फडणवीस म्हणाले.
पोलिसांच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या मनोज ठवकर यांच्या कुटुंबीयांची फडणवीस यांनी भेट घेतली. यावेळी फडणवीस यांनी ठवकर कुटुंबीयांचं सांत्वन केलं. तसेच ठवकर कुटुंबीयांना भाजपकडून दोन लाखांची आर्थिक मदतही जाहीर केलं. मनोज ठवकर हे कोठडीत नव्हते. ते गुन्हेगार नव्हते. मास्क लावला नाही हा काही मोठा गुन्हा ठरत नाही. तो फाईनचा गुन्हा आहे. या गुन्ह्यात अटक करता येत नाही. शिक्षाही करता येत नाही. त्यामुळे मनोज यांना पकडून पोलिसांनी मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही एक प्रकारे हत्याच आहे. त्यामुळे संबंधित पोलिसांना निलंबित करा. त्यांची बदली करून पाठिशी घालू नका, असं ते म्हणाले.
या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे दिला हे चांगलं झालं. परंतु, जोपर्यंत सीआयडीचा तपास होत नाही, तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. हेल्मेट घातलं नाही म्हणून दंड आकारला पाहिजे. त्यासाठी कुणाच्या अंगावर लाठ्या तोडण्याचा अधिकार पोलिसांना नाही, असंही ते म्हणाले.

Leave a Reply