एलएनजी भविष्यातले इंधन- नितीन गडकरी, देशातील पहिल्या नैसर्गिक द्रवरूप वायू प्रकल्पाचा शुभारंभ

नागपूर :१२ जुलै- देशातील पाहिले खासगी नैसर्गिक द्रवरूप वायू (एलएनजी) स्टेशन नागपुरात उभारण्यात आले असून, त्याचा आता देशभरात विस्तार होणार आहे. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून, या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलला पर्याय मिळणार आहे. त्याचा फायदा संपूर्ण देशाला होणार असून, एलएनजी परिवहन क्षेत्रात क्रांती घडवेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
विदर्भाला डिझेलमुक्त करण्याच्या उद्देशाने विहीरगाव येथे बैद्यनाथ आयुर्वेदिक समूहातर्फे पहिला खासगी एलएनजी फॅसिलिटी प्लांट उभारण्यात आला असून गडकरी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला एलएनजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभा राव, बैद्यनाथचे अध्यक्ष सुरेश शर्मा, प्यारेखान आदी उपस्थित होते.
नैसर्गिक द्रवरूप वायू (एलएनजी) हे स्वच्छ इंधन असून पेट्रोल व डिझेलप्रमाणे ते प्रदूषण करत नाही. स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या एलएनजीमुळे इंधन खर्चात बचत होणार असून मोठय़ा प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. एलएनजी भविष्यातले इंधन असून ते परिवहन क्षेत्रात क्रांती घडवेल. पेट्रोल आणि डिझेलमुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होते. त्याचे दर वाढत चालल्यामुळे त्याला पर्याय म्हणून इथेनॉल, इलेक्ट्रिक, सीएनजी, एलएनजी गॅसला केंद्र सरकार प्रोत्साहन देत आहे. देशात साखर, तांदळाचे उत्पादन अतिरिक्त प्रमाणात झाले असून, त्याचे व्यवस्थापन करणे हे देशासमोरचे मोठे आव्हान आहे, असे गडकरींनी सांगितले.
गॅस, पेट्रोल, डिझेल यानंतर आता देशात वाहतुकीसाठी पर्यावरणपूरक एलएनजी म्हणजे लिक्विफाईड नेचर गॅसचा वापर करता येणार आहे. ट्रक आणि मोठय़ा वाहनांत सध्या याचा उपयोग होणार असून, यासाठी एक किट बसवावी लागणार आहे. ती किटही याच प्रकल्पातून बनवली आहे. डिझेलवर चालणारे ट्रक आता या गॅसवर चालल्यास ते स्वस्त पडतील. या प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीही होईल. एलएनजीचा वापर केल्यास जड वाहने ४ किमीचा मायलेज देईल. डिझेलमध्ये तो २ किमीचा मिळतो. डिझेलसाठी आपल्याला दुसऱ्या देशांना द्यावे लागणारे पैसेही वाचणार असून याची निर्मिती देशातच होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

Leave a Reply