बाळासाहेब थोरातांनी फेटाळले मध्यवर्ती निवडणुकांचे वृत्त

संगमनेर : ११ जुलै – ‘देवेंद्र फडणवीसांची नेहमी काही ना काही घोषणा देत असतात पण ती प्रत्यक्षात उतरत नाही. मध्यावर्ती निवडणुका होणार नाहीत. दोन वर्ष आघाडी सरकार चाललंय. आणखी तीन वर्ष चालेल पुन्हा आघाडी सरकार आले तर आश्चर्य मानू नये, असं म्हणत काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मध्यावर्ती निवडणुकीच्या बातम्यांना फेटाळून लावले.
महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दंडकारण्य अभियानाचा वृक्ष लागवड करून शुभारंभ करण्यात आला. संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील डोंगरावर वृक्षारोपण करून अभियानाची सुरुवात झाली. यावेळी, थोरात यांनी पत्रकारांशी बोलत असताना राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
मध्यवर्ती निवडणूका झाल्या तर आघाडी सरकार धाराशाई होईल असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं, यावरही थोरातांनी निशाणा साधला. ‘फडणवीसांची नेहमी काही ना काही घोषणा असते पण ती प्रत्यक्षात उतरत नाही. मध्यावर्ती निवडणुका होणार नाहीत. दोन वर्ष आघाडी सरकार चाललंय आणखी तीन वर्ष चालेल पुन्हा आघाडी सरकार आले तर आश्चर्य मानू नये’, असं विधान थोरातांनी केलंय.
‘देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस आंदोलनावर टीका करण्यापेक्षा केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची केलेली दरवाढ करून सर्वसामान्य माणसांना महागाईचे जे चटके बसतायत त्या संदर्भात त्यांनी लक्ष द्यावे. त्यांचं केंद्रात चांगलं वजन आहे. ते इंधनाचे दरवाढ कमी करण्यासाठी वापरावे, असा सल्लावजा टोलाही थोरात यांनी फडणवीसांना लगावला.
‘भास्कर जाधव यांनी पावसाळी अधिवेशन उत्तमरित्या गाजवले आहे पण शिवसेनेनं अध्यक्षपदावर अद्याप कोणताही दावा केलेला नाही. काँग्रेसचा अध्यक्ष राहील तो निर्णय आधीच झाला आहे. तिन्ही पक्षांनी मिळून हा निर्णय घेतला आहे, त्यामुळे यात काही बदल होणार नाही. भास्कर जाधव यांच्यासारखेच तडाखेबाज नेते काँग्रेसमध्ये सुद्धा आहे, असंही थोरात यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply