पंकजा मुंडे दिल्लीला रवाना

मुंबई:११ जुलै-केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना डावलण्यात आल्यामुळे मुंडे समर्थकांनी राजीनामा अस्त्र बाहेर काढले आहे. दुसरीकडे, पंकजा मुंडे या आज रविवारी दिल्लीला रवाना झाल्या आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद न दिल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचे बोलले जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर पंकजा मुंडे आज सकाळी दिल्लीला रवाना झाल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर पहिल्यांदाच पंकजा दिल्लीत पोहोचणार आहेत. नियोजित बैठकांसाठी जात असल्याचं पंकजा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलं आहे.
आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांची अध्यक्ष नड्डा यांच्यासोबत बैठक आहे. कार्यकर्त्यांची नाराजी आणि प्रीतम मुंडे यांना न मिळालेल्या मंत्रिपदाबद्दल दिल्लीतील नेत्यांशी पंकजा मुंडे यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, बीडमध्ये भाजपच्या ३६ पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहे. या नाराजी नाट्याची लाट आता पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचली आहे. पिंपरी चिंचवड शहर ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष दत्ता कायंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Leave a Reply