दहशतवाद्यांसाठी काम केल्याच्या आरोपात जम्मू-काश्मीरमध्ये ११ कर्मचारी बडतर्फ

श्रीनगर: १० जुलै- दहशतवादी संघटनांसाठी काम करीत असल्याचा आरोप ठेवीत जम्मू-काश्मीर प्रशासनाने ११ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. त्यामध्ये हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन याच्या दोन मुलांचा त्याचप्रमाणे पोलीस खात्यातील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
ज्या ११ कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे, ते जम्मू-काश्मीर पोलीस, शिक्षण, कृषी, कौशल्य विकास, ऊर्जा आणि आरोग्य खाते आणि शेर-ए-काश्मीर वैद्यकीय विज्ञान संस्थेतील कर्मचारी आहेत. घटनेच्या अनुच्छेद ३११ नुसार यांना बडतर्फ करण्यात आले असून, या कारवाईविरोधात केवळ उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय आहे.
हिजबूल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीन याची दोन मुले सय्यद अहमद शकील आणि शाहीद युसुफ यांना दहशतवादाला आर्थिक साहाय्य केल्याच्या आरोपाखाली सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने या दोघांचा दहशतवादाला आर्थिक साहाय्य करण्यात हात असल्याबाबत तपास केला. तेव्हा पैशांची व्यवस्था करणे, पैसे स्वीकारणे आणि हवालामार्फत ते पैसे हिजबूल मुजाहिद्दीनच्या दहशतवादी कारवायांसाठी हस्तांतरित करणे यामध्ये या दोघांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply