३३ केंद्रीय मंत्र्यांविरोधात आहेत गुन्हे, एडीआरच्या अहवालातील माहिती

नवी दिल्ली::१० जुलै-केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात एकूण ४३ मंत्र्यांनी बुधवारी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांची एकूण संख्या आता ७८ झाली आहे. यापैकी तब्बल ४२ टक्के अर्थात ३३ मंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल असून, त्यातल्या २४ जणांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा यासारखे गंभीर गुन्हेदेखील दाखल आहेत. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स अर्थात एडीआरने नुकताच यासंदर्भातला अहवाल जाहीर केला असून, त्यामध्ये नव्या मंत्रिमंडळासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.
एडीआरच्या ताज्या अहवालानुसार, एकूण ७८ केंद्रीय मंत्र्यांपैकी ३३ मंत्र्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत. शिवाय, २४ मंत्र्यांविरोधात हत्या, हत्येचा प्रयत्नसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या सर्वांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या माहितीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
दरम्यान, यंदाच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री ठरलेले ३५ वर्षीय निसित प्रामाणिक यांच्याकडे केंद्रीय गृहराज्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या विरोधात भादंविच्या कलम ३०२नुसार हत्येचा गुन्हा दाखल असल्याचं एडीआरच्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय, जॉन बारला, पंकज चौधरी आणि व्ही. मुरलीधरन या तिघांविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा (भादंवि ३०७) गुन्हा दाखल आहे.

Leave a Reply