लाच मागणारा उद्योजकता उपायुक्त कारवाईच्या जाळ्यात

नागपूर्:१० जुलै-वारिष्ठ लिपिकाच्या पदोन्नतीसाठी नाव पाठविणे व पदोन्नती मिळवून देणे यासाठी २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या व ती स्वीकारणाऱ्या उद्योजकता उपायुक्ताला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडलं आहे. सुनील रामभाऊ काळबांडे (वय ५५) असं या उपायुक्ताचं नाव असून, ते कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय मुख्यालयात कार्यरत आहेत.
या प्रकरणातील तक्रारदार हे चंद्रपूर येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना याच विभागात कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता अधिकारी म्हणून पदोन्नती व पदस्थापना मिळावी यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
‘हा प्रस्ताव आपण वरिष्ठांकडे पाठवला असून आपले बोलणंही झाले आहे. मी तुला लवकरच पदोन्नती मिळवून देतो. तसंच चंद्रपुरातच पदस्थापनासुद्धा मिळवून देतो, असं सांगत काळबांडे यांनी तक्रारदाराकडून २५ हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराच्या तक्रारीच्या आधारावर एसीबीच्या पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद तोतरे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक योगिता चापले आणि त्यांच्या चमुने सापळा रचला.
काळबांडे यांनी लाचेची रक्कम स्कीकारताच त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

Leave a Reply