पोलीस मारहाणीत दिव्यांग व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू , दोषींवर गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिक रस्त्यावर

नागपूर : ८ जुलै – नाकाबंदीदरम्यान बुधवारी रात्री दिव्यांग व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला. पोलिसांनी त्याला मारहाण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. बातमी सर्वत्र पसरताच संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आणि दोषी पोलिस अधिकारी व कर्मचार्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच, मृतकाच्या पत्नीला सरकारी नोकरी व कुटुंबीयांना २0 लाख रुपयांचा मोबदला देण्याची मागणी केली. घटनेनंतर परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली. परिणामी, दंगा नियंत्रण पथकासह अतिरिक्त पोलिस दल तैनात करण्यात आले होते.
मृतक मनोज हरीभाऊ ठवकर (वय ३५ वर्ष, रा. पारडी) हा मोटर मेकॅनिक होता. त्याच्या कुटुंबात पत्नी अश्विनी (वय ३२ वर्ष) मुलगी अंशू (वय १३ वर्ष) व मुलगा (आरुष ११ वर्ष) यांचा समावेश आहे. दिव्यांग असल्यामुळे कृत्रिम पायाच्या मदतीने मनोज चालत होते. बुधवारी, रात्री ८.३0 वाजताच्या दरम्यान ते दुचाकीने घरी जात होते. यावेळी पारडी चौकातील हनुमान मंदिराजवळ पोलिसांची नाकाबंदी सुरू होती. अन्य वाहतूकदारांप्रमाणे पोलिसांनी मनोजलाही अडविले. मनोज हा नशेत होता अशी चर्चा आहे. परिणामी, त्याची गाडीही ब्रेक मारताच जागेवर थांबली नसावी. दरम्यान, पोलिसाचा धक्का लागल्यामुळे मनोजचे वाहनावरून संतुलन बिघडले होते. परिणामी, त्यांची गाडी ही नाकाबंदीत तैनात पारडी पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक शिंदे यांना लागली. यात त्यांना किरकोळ जखम झाली. घटनेत मनोजसुद्धा गाडीवरून खाली पडला. परंतु, मनोजने मुद्दाम ही टक्कर मारली असा नाकाबंदीतील पोलिसांचा समज झाला. त्यानंतर मनोजला पोलिसांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर मनोज हा तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यात गेला. येथे तो बेशुद्ध पडला. यानंतर त्याला उठवण्याचा प्रयत्न केला तरी तो उठला नाही. त्याला भवानी मल्टीस्पेशालीटी अँण्ड रिसर्च सेंटर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. येथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यानंतर पोलिसांच्या मारल्यामुळे मनोजचा मृत्यू झाल्याची वार्ता सर्वत्र पसरली. परंतु, पोलिसांच्या मारहाणीत मनोजचा मृत्यू झाला की हृदयविकाराच्या धक्क्याने हे सिद्ध व्हायचे आहे. मात्र मनोजच्या मृत्यूनंतर मोठय़ा प्रमाणात नागरिकांची एकच गर्दी जमली. दोषी पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

Leave a Reply