प्रेस रूममध्ये आमचं अधिवेशन चालवणार-देवेंद्र फडणवीस, भाजपची वादळी प्रतिविधानसभा

मुंबई:६ जुलै- पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांवर गैरवर्तवणूक केल्याचा ठपका ठेवत निलंबन करण्यात आल्यानंतर, आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजपाने विधिमंडळ परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. या प्रतिविधानसभेविरोधात कारवाईची मागणी महाविकास आघाडीतील आमदारांनी केली. त्यानंतर प्रतिविधानसभेमधील माईक जप्त करण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना देण्यात आले. दरम्यान, प्रेस रूममध्ये आमचं अधिवेशन चालवणार, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी भाजपाने भरवलेली प्रतिविधानसभा सभागृहाचा अपमान असल्याचं सांगत त्यावर कारवाई करण्याची मागणी केली. जाधव यांनी सभागृहात प्रारंभी आवाज उठवला. प्रतिविधानसभा घेण्यास परवानगी दिली आहे का?, तिथे कागद वाटले जात आहेत. स्पीकर लावण्यास परवानगी दिली का? आदी मुद्दे त्यांनी सभागृहाचे कामकाज सुरु झाल्यानंतर उपस्थित केले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनीही प्रतिविधानसभा भरवणं हा सभागृहाचा अपमान असून, हा सर्व काय प्रकार सुरु आहे, असा प्रश्न सभागृहामध्ये उपस्थित केला. प्रतिविधानसभा भरवणाऱ्यांविरोधात कारवाई केली पाहिजे असं मत व्यक्त केले. त्याचप्रमाणे एका वृत्तवाहिनीवर सुरु असणारं प्रतिविधानसभेचं लाइव्ह प्रक्षेपण थांबवण्याची मागणीही चव्हाण यांनी केली. चव्हाण यांनी या थेट प्रक्षेपणावरही आक्षेप घेतला. या आक्षेपानंतर अध्यक्षांनी कारवाई करण्याचे आदेश सुरक्षा रक्षकांना दिले. त्यानंतर भाजप आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर भाजपने आपली भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केली. राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या कारवाईचा निषेध केला.
सरकारचा भ्रष्टाचार बाहेर येतोय. महाराष्ट्र सरकारच्या विरोधात विधानसभेत काळा अध्याय लिहिला गेलाय. खोटे आरोप लावून आमच्या १२ जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. शांतपणे प्रतिअधिवेशन सुरू होते. मार्शल्स पाठवून पत्रकारांवर दंडुकेशाही करण्यात आली. आमचं अधिवेशन चालणार पण, पत्रकारांना हाकलत असतील, तर प्रेस रूममध्ये आमचं अधिवेशन चालवणार! लोकशाहीच्या दोन्ही सभागृहांना कुलूप लावण्याचं काम ठाकरे सरकार करतंय. आम्ही आता पत्रकार कक्षात प्रतिअधिवेशन भरवणार, असं फडणवीस म्हणाले.

Leave a Reply