पोलिसांनी शोधली नक्षलवाद्यांनी लपवून ठेवलेली स्फोटके आणि रोख रक्कम

गडचिरोली: ३ जुलै-गडचिरोली पोलिस दलास गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली अंतर्गत येत असलेल्या कुदरी जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवितांना नक्षल्यांनी पुरून ठेवलेली मोठी रोख रक्कम व स्फोटके हुडकून काढण्यात यश प्राप्त झाले आहे.
नक्षलविरोधी अभियान राबविणारे सी-६० व इतर अभियान पथकाचे जवान एटापल्ली तालुक्यातील पोलिस मदत केंद्र हालेवारा अंतर्गत येत असलेल्या कुदरी जंगल परिसरात नक्षल विरोधी शोधमोहीम राबवीत होते. या दरम्यान त्यांना एका ठिकाणी नक्षल्यांनी पुरून १५ लाख ९६ हजाराची रोख रक्कम, ३ डेटोनेटर, ४ इलेक्ट्रीक बटन, १ स्वीच, २ वायर बंडल, १ वॉकीटाकी, व इतर साहित्य हस्तगत करण्यात यश प्राप्त झाले. सदर साहित्य गडचिरोली पोलिस मुख्यालय येथे आणण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलिस कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
ही कारवाई गडचिरोली जिल्हयाचे पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक मनिष कलवानिया, अपर पोलीस अधिक्षक, समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अहेरी, उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कामगिरीबद्दल अधिक्षक अंकित गोयल यांनी अभियानात सहभागी असलेल्या विशेष अभियान पथकाचे कौतुक केले आहे. तसेच सदर परीसरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्याचे संकेत दिले.

Leave a Reply