घटनात्मक संकट बघता राजीनामा देणे योग्य – तिरथसिंग रावत

नवी दिल्ली : ३ जुलै – उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. रावत यांनी चार महिन्यांपूर्वीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रावत यांचा राजीनामा महत्त्वाचा मानला जात आहे.
मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री ११ वाजता राजभवनावर जाऊन राज्यपाल बेबी रानी मौर्या यांच्याकडे आपला राजीनामा दिला. रात्री ९.३० वाजता बोलावलेल्या पत्रकार परिषदेत रावत यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांबाबत माध्यमांना माहिती दिली. तीरथसिंह रावत यांच्याकडे ४ महिनेच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी होती.
तीरथसिंग रावत यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.मी माझा राजीनामा राज्यपालांना सादर केला आहे. घटनात्मक संकट पाहता मला राजीनामा देणे योग्य आहे असे वाटले. मला आत्तापर्यंत प्रत्येक संधी दिल्याबद्दल मी केंद्रीय नेतृत्व आणि पंतप्रधान मोदी यांचे आभारी आहे असे रावत यांनी म्हटले.
रावत यांनी राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना उच्च पदावर काम करण्याची संधी दिल्याचे त्यांनी म्हटले. पौरी लोकसभा क्षेत्रातून येणारे खासदार रावत यांनी यावर्षी १० मार्च रोजी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली होती. घटनात्मक तरतुदीनुसार ६ सप्टेंबरपूर्वी म्हणजेच सहा महिन्यांच्या आत विधानसभा सदस्य म्हणून निवड करण्यात येणार होती.

Leave a Reply