बॉम्बस्फोट खटल्यातील कैद्यांचा पॅरोल उच्च न्यायालयाने केला नामंजूर

नागपूर:२९ जून- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील कैदी असगर कादर शेख व मो. याकूब नागुलची अभिवचन रजा (पॅरोल) नामंजूर केली. याबाबत न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली होती. अर्जानुसार, कोरोना संक्रमणामुळे सर्वोच्च न्यायालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व सुधारित पॅरोल नियमाप्रमाणे आपत्कालीन पॅरोलसाठी पात्र असल्याचे या कैद्यांचे म्हणणे आहे. या कैद्यांना १९९६मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात विविध कलमांतर्गत एकूण ५५ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ते नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहेत.
राज्य शासनाने दाखल केलेल्या उत्तरानुसार २०११ साली असगर कादर शेख हा एक दिवस उशिरा, तर २०१० साली याकूब नागुल हा ११ दिवस उशिरा हजर झाला होता. याचिकाकर्त्यांनी न्यायालयाची दिशाभूल केल्यामुळे न्यायालयाने सदर याचिका फेटाळत पॅरोल नामंजूर केला. याचिकाकर्त्यातर्फे अँड. मीर नगमान अली तर सरकारतर्फे अँड. एन. आर. त्रिपाठी यांनी कामकाज पाहिले.

Leave a Reply