कर्जबाजारीपणामुळे कुटुंबातील ६ जणांनी एकाच दिवशी संपवले जीवन

यादगीर (कर्नाटक) : २९ जून – मागील दीड वर्षापासून देशात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात सातत्यानं लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. परिणामी अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. अशातच कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेकांना कर्जबाजारी व्हावं लागलं आहे. एकीकडे व्यवसाय ठप्प आणि दुसरीकडे कर्जाचं वाढतं व्याज अशा दुहेरी संकटात सापडलेल्या एका कुटुंबातील सहा जणांनी एकाच दिवशी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. सावकाराच्या त्रासाला कंटाळून पीडित कुटुंबानं तलावात उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
संबंधित घटना कर्नाटक राज्यातील यादगीर जिल्ह्यातील आहे. येथील एक कुटुंब मागील काही दिवसांपासून खाजगी सावकाराच्या दबावामुळे त्रस्त होतं. लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्यानं दिवसेंदिवस कर्जाचं ओझं आणखी वाढत चाललं होतं. यातून नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सहाही जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
भीमारैया सुरपुरा, पत्नी शांतम्मा, मुलगा शिवराज, मुली सुमित्रा, श्रीदेवी आणि लक्ष्मी अशी आत्महत्या केलेल्यांची नावं आहेत. खाजगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून संबंधित कुटुंबीयांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
वृत्तानुसार, संबंधित कुटुंबीयांनी काल सकाळी 10 च्या सुमारास आत्महत्या केली असावी. परंतु त्यांचे मृतदेह पाण्यात तरंगताना दिसल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. स्थानिक सावकारांच्या कर्जाचं ओझं झाल्यानं संबंधित कुटुंबीयानं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे मागील काही दिवसांपूर्वी कर्जाला कंटाळून कर्नाटकमधील चामरानगर येथील एका कुटुंबातील चौघांनी गोळ्या झाडून आत्महत्या केली होती.

Leave a Reply