अमरावती जिल्हयातील वाढत्या गुंडगिरीला पालकमंत्र्यांचा हस्तक्षेप जबाबदार – भाजपचा आरोप

अमरावती: २९ जून- अमरावती जिल्ह्यातील तिवसा शिवसेना शहराध्यक्ष अमोल पाटील यांचा निर्घृण खून झाल्याने तिवसा शहर व तिवसा मतदारसंघातील जनता भयभीत झाली आहे . पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्तक्षेपामुळे कायदा व सुव्यस्था पूर्णपणे मोडकळीस आली असून, तिवसा शहरातील वाढत्या गुंडगिरीला त्याच जबाबदार आहेत, असा आरोप भाजपाच्या जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी यांनी केला आहे.
ज्या शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्यात आहे, त्या शिवसेनेच्या शहराध्यक्षाचीच हत्या होते व तेही पालकमंत्री असलेल्या यशोमती ठाकूर यांच्या मतदारसंघात होत असेल तर, शासन व प्रशासनासाठी ही अतिशय लाजीवरवाणी बाब आहे.
पालकमंत्री झाल्यापासून पोलिसांच्या दैनंदिन कामकाजात ठाकूर मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करीत आहेत. तिवसा शहरातील गुंडगिरीला त्याच खतपाणी घालत असतील, तर याचा विचार जनतेने करणे जरुरी आहे, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात निवेदिता चौधरी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कुख्यात महिंद्र ठाकूर याच्या खुनाचा आरोप मृतक अमोल पाटील यांच्यावर होता व तेव्हापासून त्याचे काही जणांसोबत अजिबात पटत नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Reply