संपादकीय संवाद – सुबोध मोहितेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश अनिल देशमुखांना शह देण्यासाठीच!

शरद पवार हे अनाकलनीय राजकारणासाठी विख्यात आहेत. ते कधी कोणाला मोठा करतील आणि कधी कोणाला आडवा करतील, याचा बहुतेक त्यांनाही अंदाज नसावा. एका काळात त्यांनी नागपूर जिल्ह्यात रणजीत देशमुखांना मोठं केलं होतं. नंतर रणजीत देशमुखांच्या चुलत भावाला म्हणजेच अनिल देशमुखला मोठं करायला त्यांनी सुरुवात केली. १९९५च्या विधानसभा निवडणुकीत मंत्री असलेल्या रणजीत देशमुखचा सुनील केदारांनी पराभव केला. त्यामागेही पवारच सूत्रधार होते, हे उघडं गुपित आहे. तिथून अनिल देशमुखांचा राजकारणातील चढता काळ सुरू झाला. आता, त्याच अनिल देशमुखांना शरद पवार झोपविणार की काय, अशी चिन्ह दिसू लागली आहेत.
परवा, म्हणजे शुक्रवारी अनिल देशमुखांच्या सर्व घरांवर ईडीचे छापे पडले. या घटनेमुळे उभ्या महाराष्ट्रात खळबळ उडाली होती, मात्र, पवार शांत होते. हे छापे सुरू असताना, पवारांनी अनिल देशमुखांच्या कट्टर राजकीय विरोधकाशी म्हणजेच सुबोध मोहित्यांशी पुण्यात राष्ट्रवादी भवनाच्या केबिनमध्ये चर्चा सुरू केली होती. त्याचे पर्यावसान सुबोध मोहित्यांनी काही कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यात झाले.
सुबोध मोहिते हे नागपूर जिल्ह्यातले एक सध्या अडगळीत पडलेलं राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. मोहितेंनी १९९७मध्ये सरकारी नोकरी सोडून, शिवसेनेत प्रवेश घेतला. ९८मध्ये ते शिवसेनेचे नागपूर जिल्हाप्रमुख झाले. १९९९मध्ये ते रामटेकमधून शिवसेनेचे खासदार म्हणून निवडले गेले. २००३मध्ये ते केंद्रात मंत्री झाले. २००४मध्ये ते पुन्हा लोकसभेत निवडून गेले.
यावेळी मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही विरोधात होती. त्यामुळे मोहितेंना मंत्रिपद मिळणे शक्य नव्हते. परिणामी, मोहिते शिवसेनेत अस्वस्थ होते. त्याचा परिणाम म्हणजे २००७मध्ये त्यांनी शिवसेना सोडली. त्यावेळी झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. तेव्हापासून ते अडगळीतच गेले होते. काँग्रेसने त्यांना प्रवक्तेपद दिले खरे, मात्र, ते माध्यमांमध्ये कधीच येत नव्हते.
मोहिते खासदार झाल्यापासून, अनिल देशमुख हे कायम त्यांच्या हिट लिस्टवर होते. २००४मध्ये अनिल देशमुखांविरुद्ध मोहितेंनी सतीश शिंदेंना लढवून पूर्ण ताकद लावली होती, मात्र, शिंदेंचा पराभव झाला. रामटेकमधून २००७मध्ये पराभव झाल्यावर मोहितेंनी पुन्हा एकदा काटोलवर लक्ष केंद्रित केले. २००९मध्ये ते अनिल देशमुखांविरुद्ध काटोलमधूनच लढले, मात्र, तिथे त्यांचा पराभव झाला. त्यानंतर २०१४मध्ये ते रामटेकमधून लढले. तिथेही पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर मोहितेंनी काँग्रेसपासून फारकत घेत, काही काळ मराठा महासंघ, तर, काही काळ राजू शेट्टींची शेतकरी संघटना यांच्याशीही शय्यासोबत केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून २०१९मध्ये वर्ध्यातून लोकसभा लढविण्यासाठीही त्यांनी दंड थोपटले होते, मात्र, हा फुसका बार ठरला. तेव्हापासून मोहिते राजकारण सन्यास घेण्याची भाषा बोलू लागले होते.
या वाटचालीत मोहितेंनी अनिल देशमुख हे कायम टारगेट ठेवले होते. आज त्याच अनिल देशमुखच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोहितेंनी प्रवेश घेतला आहे. ही बाब काहीशी देशमुख लॉबीला धक्कादायकच ठरणार आहे, मात्र, अनिल देशमुख म्हणतात की, मोहितेंना पक्षात आणण्यासाठी मीच पुढाकार घेतला. खरं-खोटं शरद पवार आणि परमेश्‍वरच जाणो!
ज्या अनिल देशमुखांना शरद पवारांनी मोठं करत-करत गृहमंत्र्यासारखे महत्वाचे पद दिले. त्या देशमुखांचे १०० कोटींचे प्रकरण निघताच, पवारांनी त्यांचा साथ सोडला तर नाही ना, अशी शंका घेतली जात आहे. त्यातच सुबोध मोहितेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये डेरेदाखल करून घेतले, म्हणजे आता, पक्षातच देशमुख-मोहिते यांच्यात शीतयुद्ध सुरू होणार, हे स्पष्ट दिसते आहे. रामटेक लोकसभा क्षेत्र आता राखीव आहे. त्यामुळे मोहितेंना तिथे जागा नाही. परिणामी, मोहितेंचा डोळा काटोलवर आहे. आतापर्यंत काटोलसाठी अनिल देशमुखांना कोणीही स्पर्धक नव्हता. आता मोहितेंना आणून पवारांनी ही नवी खेळी तर खेळली नाही ना, अशी शंका घेतली जात आहे.
हे सर्व बघता, आता अनिल देशमुखांनी जपून राहायला हवं, इतकंच सुचवावंसं वाटतं.

अविनाश पाठक
९०९६०५०५८१

Leave a Reply