संपादकीय संवाद – मेनका गांधी यांनी जनतेला गृहीत धरू नये

भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधी या एका पशुवैद्यकाला शिवीगाळ करतानाची एक ऑडिओ क्लिप गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होते आहे. यात मेनका गांधी यांच्या कुणीतरी परिचयाच्या व्यक्तीच्या घरच्या कुत्र्याचा पाय चुकीच्या पद्धतीने अम्प्युट केला असल्याची मेनकाजींची तक्रार असल्याचे ऑडिओ क्लिप ऐकल्यावर लक्षात येते.सदर पशुवैद्यक मध्यप्रदेशातील जबलपूरचा असल्याचे देखील या संवादातून जाणवते आहे. सदर पशुवैद्यकाला त्याची पदवी आणि पशुवैद्यक सेवेचे पार्वणपत्र रद्द करण्याची धमकीही मेनका गांधी यांनी दिल्याचे म्हटले आहे. या संवादात मेनका गांधी यांनी या पशुवैद्यकाचा बापही काढला आहे.
या प्रकरणात नेमकी खरी बाजू कुणाची आहे, हे याक्षणी कळण्यास काहीच मार्ग नाही. मात्र मेनका गांधींसारख्या दीर्घकाळ केंद्रात मंत्रिपद भूषविलेल्या व्यक्तीने अश्याप्रकारे पातळी सोडून बोलणे ही चिंताजनक बाब मानवी लागेल. सदर व्हिडिओमद्जह्ये मेनका गांधी या डॉक्टर शर्माशी सुरुवातीपासूनच एकेरीत बोलत असल्याचे ऐकू येते, हरामी या शिवीपासूनच त्यांनी बोलण्यास सुरुवात केली असून सदर डॉक्टरने घेतलेले शिक्षण त्याचा अभ्यास त्याची लायकी या सर्वांवर अत्यंत खालच्या पातळीवर येऊन त्यांनी टीका केली आहे. वस्तुतः मेनका गांधी या पशुवैद्यक नाहीत, त्यामुळे सदर डॉक्टरने केलेले उपचार योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा त्यांना कोणताही अधिकार पोहोचत नाही. त्यातही जरी उपचार चुकीचे वाटले तरीही शिवीगाळ करून सभ्यतेची पातळी ओलांडणे हेदेखील गैर लागूच म्हणावे लागेल. त्यातही सदर पशुवैद्यकाचा बाप काढणे हे नायलकपणाचेच लक्षण मानावे लागेल.
आपल्या देशात सत्ता फार लवकर डोक्यात जाते असे म्हटले जाते. मेनका गांधींच्या या ऑडिओ क्लीपने ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. मेनका गांधी यांनी सदर प्रकरणात सर्व सभ्यता आणि शिष्टाचार गुंडाळून ठेवत धाब्यावर बसवले असेच म्हणावे लागते.
राजकारणी मंडळींच्या डोक्यात सत्ता गेली तरी ती फार काळ टिकू शकत नाही, जर सत्तेचा अतिरेक होऊ लागला तर जनताच तुम्हाला उचलून दूर करते. मेनका गांधी यांचे दिवंगत पती संजय गांधी यांच्याही डोक्यात १९७५-७६ मध्ये अशीच सत्ता गेली होती. त्यावेळी पंतप्रधानपदी असलेल्या इंदिरा गांधींची आणि त्यांचे सुपुत्र संजय गांधी यांची मतदारांनी किती दारुण अवस्था केली होती याची आठवण मेनकाजींनी ठेवायला हवी. मतदारांना किंबहुना देशातील नागरिकांना गृहीत धरून चालत नाही, त्यांचा योग्य मान ठेऊनच त्यांच्याशी वागावे लागते, हा धडा मेनका गांधींनी या प्रकरणातून घ्यायला हवा इतकेच यावेळी सुचवावेसे वाटते.


अविनाश पाठक

Leave a Reply