रस्त्याच्या गटारात लोटांगण घेऊन नोंदवला प्रशासनाचा निषेध

अमरावती : २५ जून – चांदूर बाजार तालुक्यातील श्री क्षेत्र नागरवाडी येथील रस्त्याचे बांधकाम जिल्हा परिषद प्रशासनाच्या वेळकाळू धोरणामुळे अनेक दिवसांपासून रखडले आहे. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याकरिता गेल्या एक वर्षांपासून गावकऱ्यांनी मागणी केली असताना सुद्धा काम पूर्णत्वास गेले नसल्याने गावकऱ्यांनी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात रस्त्याच्या गटारात लोटांगण घेऊन जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध नोंदविला.
कर्मयोगी गाडगेबाबा महाराजांचे अंतिम श्रद्धास्थान असलेले पर्यटन क्षेत्र नागरवाडी येथील वणी ते नागरवाडीपर्यंत जाणारा रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. मात्र या रस्त्यावर नागरिकांना वाहतूक करणे कठीण झाले आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून जागोजागी गटारी तयार झाल्या आहे. वणी ते नागरवाडी हा रस्ता 3 किलोमीटरचा आहे. हा रस्ता बांधकाम करण्याकरिता नागरवाडी संस्थानतर्फे जिल्हा परिषद प्रशासनाला वारंवार निवेदन देऊन मागणी करण्यात आली होती. मात्र तरीही जिल्हा परिषद प्रशासन केवळ राजकारणामुळे हा रस्ता बनवत नसल्याने वणी येथील प्रहारचे मंगेश देशमुख व गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाला दिला होता.
त्यानुसार वणी येथील गावकऱ्यांनी १५ जून रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष, मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच बांधकाम विभागाला निवेदन देऊन रस्ता बांधकाम करण्याची मागणी केली होती. हा रस्ता बांधकाम करण्यास सुरुवात न झाल्यास आंदोलनाचा इशारा होता. मात्र जिप प्रशासन कोणतीच दखल घेत नसल्याने अखेर वणी येथील गावकऱ्यांनी या रस्त्यावर साचलेल्या गटारीत लोटांगण घेऊन जिल्हा परिषद प्रशासन तसेच बांधकाम विभागाचा निषेध केला.
रस्ता बांधकामाला सुरुवात न केल्यास या रस्त्यावरील गोळा झालेला चिखल जिल्हा परिषद बांधकाम विभागात नेऊन टाकणार असल्याचा इशाराही ग्रामपंचायतचे उपसरपंच तसेच प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मंगेश देशमुख यांनी दिला आहे. विशेष म्हणजे हा मतदार संघ जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वतःचा मतदारसंघ असून या मतदारसंघातील रस्ते गटारीत गेले असल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनाचे वेळी प्रहार शेतकरी संघटनेचे प्रफुल्ल नवघरे, सुनील मोहोड, अमोल शेळके, वसंतराव नवघरे, नितीन शेळके, रवींद्र घोम, सागर धनसांडे, प्रफुल्ल सोलव, संदीप ढोकळ, मयूर देशमुख, शरद शेळके, अनिल धर्माळे, अतुल राऊत यासह शेकडो गावकरी उपस्थित होते.

Leave a Reply