झोपेत असतानाच घेतला दोन मजुरांचा जीव

गोंदिया : २५ जून – निर्माणाधीन इमारतीत दोन मजुरांची निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी भागात ही घटना घडली. मजूर झोपेत असतानाच त्यांचा जीव घेण्यात आला. हत्येनंतर त्यांच्यासोबत राहणारा मजूर पसार झाला आहे.
दोन्ही मजूर हे मूळ उतर प्रदेशमधील होते. अमन आणि निरंजन अशी मयत मजुरांची नावं आहेत. तर आरोपी बलवान दोघांची हत्या करुन पसार झाला. गुरुवारी रात्री या नवनिर्मित इमारतीत चार मजूर झोपले होते. यापैकी दोघांची झोपेतच निर्घृण हत्या करण्यात आली. एक मजूर घटनास्थळावरुन पसार झालेला आहे, तर दुसऱ्या मजुराने याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली.
दरम्यान गोंदिया शहर पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनस्थळी जाऊन पंचनामा केला. मजुरांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पाहणी केली. पुढील तपास गोंदिया शहर पोलिस करत आहेत.

Leave a Reply