घ्या समजून राजे हो…. तिसरी आघाडी – भाजपला मदत करण्यासाठी पवारांची नवी खेळी?

शरद पवारांनी आपल्या दिल्ली निवासस्थानी बैठक बोलविली आणि पवार मोदींविरोधात विरोधी पक्षांची मोट बांधणार अशी चर्चा सुरू झाली. ज्यावेळी काँग्रेस या बैठकीत नाही, अशी बातमी झिरपली त्यावेळी पवार तिसरी आघाडी उभारणार या चर्चेला वेग आला. त्यातच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी एक बैठक बोलाविल्याची बातमी व्हायरल होताच तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेवर जणू शिक्कामोर्तबच झाले. आता, देशभरातील राजकीय पंडित या तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेबाबतच आपली मते मांडताना दिसत आहेत.

आपल्या देशात काँग्रेस ही सर्वात प्राचीन आणि आज अस्तित्वात असलेली विचारधारा आहे. तर, भारतीय जनता पक्ष म्हणजेच आधीचा जनसंघ आणि त्यांची हिंदुत्वाकडे झुकलेली विचारधारा हीदेखील आज पहिल्या स्थानावर आहे, मात्र, त्याचबरोबर ढीगभर राजकीय पक्ष या देशात अस्तित्वात आहेत. माझ्या माहितीनुसार, २०१४साली निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेल्या राजकीय पक्षांची संख्या ही पाच हजारापेक्षा जास्त होती. त्यातील कित्येक पक्षांचे कुठे नामो-निशाणही नसेल, पण, कागदोपत्री कां होईना, पक्ष अस्तित्वात आहेत. आज देशात राजकीयदृष्ट्या सक्रिय असलेले आणि संसदेत एखाद-दुसरा खासदार निवडून आणण्याची क्षमता असणारे पक्ष बघितले तरी, त्यांची संख्या ५०च्या आसपास जाईल. आतापर्यंत देशात काँग्रेस आणि भाजप या दोन विचारधारांच्या भोवती राजकारण फिरत राहिले आणि त्यामुळे आघाड्या बनविताना या दोन पक्षांना केंद्रस्थानी ठेवूनच आघाड्या बनविल्या जात होत्या. असे असले तरी, गेल्या ३० वर्षांत अनेकदा तिसऱ्या आघाडीचा विचार पुढे येत होता. दस्तुरखुद्द शरद पवारांनीच २००१मध्ये असे प्रयत्न केले होते. या पार्श्वभूमीवर पवारांनी आजही असे प्रयत्न केले तर, त्यात आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. राजकीय महत्वाकांक्षा बाळगणारा एक नेता या नात्याने असे उद्योग करण्याचा पवारांचा हक्क कुणीही नाकारू शकत नाही, मात्र, असा प्रयत्न पवारांनी केल्यास त्याचा कोणाला फायदा मिळेल, याचाच विचार या लेखात करायचा आहे.

आज देशाच्या राजकारणात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात असलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वात असलेली संयुक्त पुरोगामी आघाड्या, अशा दोन आघाड्या सक्रिय आहेत. भाजपसोबत आधी बरेच पक्ष होते, मात्र, आता हळूहळू ती संख्या बरीच घटली आहे. शिवसेना आणि अकाली दलासारखे त्यांचे सर्वात जुने मित्रही त्यांच्यापासून दूर गेले आहेत. सध्या जदयू, लोजपा, रामदास आठवलेंचा रिपब्लिकन गट, असे काही मोजकेच पक्ष भाजपसोबत राहिलेले आहेत, असे असले तरी, आज भाजपला फारसा फरक पडणार नाही, अशी परिस्थिती आहे. आज भाजपच्याच एकट्याच्या ३०३ जागा आहेत आणि आज तरी विरोधक मोदींचा करिश्मा कमी झाला, अशी कितीही ओरड करत असले, तरी, लोकसभा निवडणुकींच्या वेळेपर्यंत मोदी काही तरी नवी खेळी खेळून वातावरण भाजपला अनुकूल करू शकतात. दुसरे असे की, आज काही कारणाने भाजपापासून दूर गेलेले पक्ष निवडणूक काळात पुन्हा भाजपसोबत येऊ शकतात.

आता संयुक्त पुरोगामी आघाडीबाबत बोलायचे झाल्यास ही आघाडी २००४मध्ये काँग्रेसच्या पुढाकाराने भाजपला पराभूत करण्यासाठी गठित करण्यात आली होती. या आघाडीत सर्व भाजपविरोधक एकत्र आले होते. या आघाडीच्या जोरावर काँग्रेसने २००४ आणि २००९, असे दोन वेळा पंतप्रधानपद मिळविले खरे, पण, २०१४च्या मोदी लाटेत त्यांची पुरती वाताहत झाली होती. आजही आघाडी अस्तित्वात आहे, मात्र, ही आघाडी भाजपला सक्षम पर्याय देऊ शकलेली नाही. या आघाडीला सक्षम करण्याचा काँग्रेसशिवाय इतर नेत्यांनीही बराच प्रयत्न केला. त्यात शरद पवारही आघाडीवर होते, मात्र, ती  आघाडी ठोस असे काही करू शकलेली नाही.

या आघाडीत शरद पवार हे कायम सक्रिय राहिलेले आहेत. असे सक्रिय राहण्यामागे त्यांचा पंतप्रधानपदाच्या वाटेवरील हल्लाबोल हा कधीच लपून राहिलेला नाही, जर, पंतप्रधानपद मिळालेच नाही, तर, राष्ट्रपतीपद आणि तेही मिळाले नाही, तर मुलगी सुप्रियाला राजकारणात कुठेतरी स्थिर करायचे, हा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठीच ते संयुक्त पुरोगामी आघाडीवर आजवर आपला फोकस कायम ठेवत आले आहेत, मात्र, असे असूनही कोणतेही लक्ष्य अजून त्यांच्या टप्प्यात आलेले दिसत नाही.

याच पार्श्वभूमीवर, पवारांचा तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करण्याचा मनसुबा अधूनमधून उफाळून येत असतो. तसाच यावेळीही तो उफाळून आला असावा, असा निष्कर्ष काढता येतो, मात्र, या उठाठेवीतून त्यांचे लक्ष्य कसे साध्य होईल, यावर विचार होणे गरजेचे आहे.

आधी नमूद केल्याप्रमाणे आज भाजपची ताकद बऱ्यापैकी आहे, मात्र, विरोधकही तेवढेच आक्रमक असल्यामुळे अधूनमधून मोदींचा जनाधार कमी तर होत नाही ना, अशी शंका घेतली जाते. कोरोना काळातील कथित अपयश हे २०२४मध्ये मोदींना अडचणीचे ठरेल, असे काही राजकीय पंडित बोलतात. अशा वेळी विरोधकांचे मतविभाजन हा एक अतिशय चांगला किंबहुना रामबाण उपाय असतो. तिसर्या आघाडीची धडपड ही त्यासाठी तर नाही ना, अशी शंका घेण्यास निश्चित वाव आहे.

जर, भाजपला संपविण्यासाठी एकत्र यायचे असेल, तर, संयुक्त पुरोगामी आघाडी आहेच. या आघाडीत सर्व पक्षांनी जोर मारला तर, भाजपला जेरीस आणणे अशक्य नाही, तरीही वेगळी आघाडी कां? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. संयुक्त पुरोगामी आघाडीसोबत राहून शरद पवार पंतप्रधान होणे कधीही शक्य नाही. इतकेच काय पण, सोनिया आणि राहुल गांधी त्यांना राष्ट्रपतीही करणार नाहीत, हे नक्की. याला कारण पवार यांचे बेभरवशाचे राजकारण हे आहे. त्याचप्रमाणे पवारांनी काँग्रेससोबत वेळोवेळी केलेली गद्दारी आणि व्यक्तिगत स्वार्थासाठी प्रसंगी भाजपशी केलेली हातमिळवणी, याबाबतही सोनिया, राहुुल आणि प्रियंका हे माय-लेक जाणून आहेत, त्यामुळे पवारांना एका विशिष्ट मर्यादेपुढे ते ढील देणार नाहीत, हे नक्की. याची पवारांनाही पूर्ण जाणीव आहे. इतकेच काय, तर, पवारांनंतर सुप्रिया सुळेंनाही काँग्रेस कितपत साथ देईल, याची पवारांनाही शंका आहे. त्यामुळेच पवार तिसऱ्या आघाडीच्या मागे आहेत.

अर्थात ही तिसरी आघाडी तरी, पवारांना पंतप्रधानपदाकडे नेईल काय, याचे उत्तर नकारार्थीच मिळते, मात्र, ही तिसरी आघाडी सुप्रिया सुळेंच्या राजकीय पुनर्वसनासाठी निश्चित उपयोगाची ठरू शकते. तिसरी आघाडी उभी केल्यास विरोधकांमध्ये फाटाफूट होईल, परिणामी, संयुक्त पुरोगामी आघाडीला तो मोठा फटका असेल. संयुक्त पुरोगामी आघाडी मोदीविरोधी वातावरणाचा फायदा घेऊन जास्त जागा पदरात पाडू शकते, मात्र, जर, तिसरी आघाडी समोर आली, तर, विरोधकांमध्येच मतविभाजन होणार, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. त्याचा फायदा सत्ताधारी भाजपाला मिळून ३०३च्या ३२३ झाल्या तरी, विशेष आश्चर्य वाटू नये.

राजकीय विश्लेषकांच्यामते, शरद पवारांची नेमकी हीच खेळी आहे. आता, आपल्याला पंतप्रधान होणे कठीण आहे, राष्ट्रपतीपदासाठी कदाचित सर्व सहमतीचा उमेदवार म्हणून आपला विचार होऊ शकतो आणि नच झाल्यास मोदींच्या मदतीने किमान सुप्रियाला तरी, केंद्रात मंत्री बनवून स्थिर करता येऊ शकते, हा पवारांचा या सर्व प्रकारात डाव असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या संदर्भात त्यांची आणि मोदी किंवा शहा यांची गुप्त चर्चाही झालेली असू शकते.

काही दिवसांपूर्वी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक अभ्यासक दिलीप देवधर यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलताना भाकित केले होते की, २०२२मध्ये सुप्रिया सुळे भाजपत येतील आणि केंद्रात मंत्री होतील. माझ्यामते, २०२२ही घाईची वेळ ठरेल. शरद पवार याच पद्धतीने २०२४मध्ये तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करून भाजपचा विजय सुकर करतील आणि पाठोपाठ सुप्रिया सुळे यांना केंद्रात मंत्रिपदी प्रतिष्ठित करतील.

शरद पवार या व्यक्तीने आजवरच्या राजकारणात फक्त संधीसाधू राजकारण केलेले आहे. आजवरच्या राजकीय वाटचालीत त्यामुळेच त्यांनी असंख्य कोलांटउड्या मारल्या आहेत. ही बाब लक्षात घेता पवारांची अशी खेळी असणारच नाही, असे छातीठोकपणे सांगता येणार नाही. ते कोणत्याही पद्धतीने आपल्या पदरात हवे ते पाडून घेतील आणि नाही स्वत:ला जमले तर, किमान मुलीसाठी तरी, वाट मोकळी करून देतील, हे नक्की.

अर्थात हे सर्व बघण्यासाठी आपल्याला अजून काही काळ वाट बघावी लागणार आहे.

तुम्हाला पटतंय का हे? त्यासाठी आधी तुम्ही समजून तर घ्या राजे हो….

ता.क. :  घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

अविनाश पाठक

९०९६०५०५८१

Leave a Reply