‘सामना’च्या अग्रलेखात काँग्रेसला सुनावले खडे बोल

मुंबई: २४ जून- शरद पवार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी मोदी सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी ‘राष्ट्रमंच’ची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीच्या निमित्ताने शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसवर निशाणा साधण्यात आला आहे. पवारांच्या घरी ‘राष्ट्रमंच’चे चहापान झाले. त्यानिमित्ताने विरोधी पक्ष नक्की कोठे आहे? असा सवाल करत शिवसेनेनं पुन्हा एकदा काँग्रेसला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
‘मोदी किंवा भाजपविरुद्ध आघाडी हे एकमेव ध्येय ठेवूनच विरोधी पक्षांची ‘मोट’ बांधायची काय? यावरच आधी विचारमंथन होणे गरजेचे आहे. देशापुढे आज प्रश्नांचा डोंगर आहे व ती विद्यमान सरकारची देणगी आहे हेदेखील खरे, पण त्यावर पर्यायी नेतृत्वाचा विचार काय? ते कोणीच सांगू शकत नाही. विरोधी पक्षांची एकजूट हवीच. ती संसदीय लोकशाहीची गरज आहे. पण गेल्या सात वर्षांत विरोधी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील अस्तित्व अजिबात दिसत नाही, असं म्हणत सेनेनं काँग्रेसवर हा निशाणा साधला.
अनेक मोठ्या राज्यांतील प्रादेशिक पक्ष व त्यांच्या नेत्यांनी भाजप किंवा मोदी-शहा यांच्या ताकदीचा प्रतिकारही केला व विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभवही केला. ज्या पद्धतीने भाजपला रोखले तेच खरे विरोधी पक्षांचे विचारमंथन आहे. पण, दिल्लीतील मंथनात यापैकी एकही पक्ष किंवा नेता हजर नव्हता. काँग्रेस पक्षाने ‘राष्ट्रमंच’ला महत्त्व दिले नाही. खरे तर शरद पवारांनी विरोधी पक्षाचे जे चहापान केले तसे सोहळे दिल्लीत राहुल गांधी यांनी सुरू केले तर, मरगळलेल्या विरोधी पक्षांच्या चेहऱ्यांवर तरतरीत भाव दिसू लागतील, असा टोलाही सेनेनं काँग्रेसला लगावला.
काँग्रेस पक्ष स्वतःच गेले कित्येक महिने राष्ट्रीय अध्यक्षांविनाच हालतडुलत आहे. खरे म्हणजे काँग्रेससारखा प्रमुख विरोधी पक्ष या सर्व घडामोडीत बरोबरीने उतरायला हवा. विरोधकांची एकजूट करण्याच्या शरद पवारांच्या या प्रयत्नात राहुल गांधींसारख्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्याने सहभागी व्हायला हवे. तरच विरोधी पक्षांच्या एकत्रित शक्तीला खरे बळ प्राप्त होऊ शकेल’ असा सल्लाही सेनेनं काँग्रेसला दिला आहे.
पंतप्रधान मोदी यांची देहबोली आता बदललेली दिसते व देशाची एकंदरीत परिस्थिती बरी नसून, आपले नियंत्रण राहिलेले नाही हे त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट दिसते. लोकांत रोष, अप्रीती असली तरी सरकारला आणि भाजपला धोका नाही या आत्मविश्वासाची ठिणगी आजही त्यांच्या मनात आहे, असेही ‘सामना’ने म्हटले आहे.

Leave a Reply