राकेश टिकैत यांनी जाहीर केली शेतकरी आंदोलनाची नवी दिशा

नवी दिल्ली: २४ जून- केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आणि शेतकरी आंदोलनासंदर्भात शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. शेतकरी आता चार लाख ट्रॅक्टर घेऊन थेट संसदेवर मोर्चा काढणार असल्याचे टिकैत म्हणाले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हा इशारा दिला.
यावेळी टिकैत म्हणाले, इथे चार लाख ट्रॅक्टर आणि २५ लाख आंदोलक आहेत. हे सर्व ट्रॅक्टर देशातील असून, ते अफगाणिस्तानमधून आलेले नाहीत. आम्ही मागील सात महिन्यापासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत. शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकून घेण्याइतकीही लाज सरकारकडे शिल्लक नाही. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने काम करता येत नाही, अशी टीका यावेळी त्यांनी केली.
या वेळी टिकैत म्हणाले, पहिल्या टप्प्यात २६ जून रोजी देशातील सर्व राज्यपालभवनासमोर शेतकरी धरणे आंदोलन करतील. शेतकरी आंदोलक हे राज्यपालांना तर, दिल्लीतील शेतकरी नायब राज्यपालांकडे अर्ज देतील, असे ते म्हणाले.
दरम्यान, टिकैत यांनी आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाविरोधात प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले. आम्ही प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये मात्र. उतरणार नाही, असंही टिकैत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply