तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता तत्काळ पाऊले उचलण्याची गरज – सोनिया गांधी

नवी दिल्ली : २४ जून – काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी गुरुवारी पक्षाचे सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी यांच्यासोबत करोना परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेतली. बैठकी दरम्यान त्यांनी देशातील लसीकरणाच्या गतीबद्दल चिंता व्यक्त केली. देशात करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता मोठ्या प्रमाणात तयारी करण्यासोबत विशेषतः मुलांच्या सुरक्षेसाठी योग्य पावले उचलण्याची गरज आहे असे सोनिया गांधी म्हणाल्या.
रोजच्या लसीकरणाचे दर तीनपट करावे लागतील, जेणेकरून वर्षाच्या अखेरीस ७५ टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण होऊ शकेल. हे लसींचा पुरवठा व साठा यावर पूर्णपणे अवलंबून आहे यात काही शंका नाही. आपण केंद्र सरकारवर दबाव कायम ठेवला पाहिजे असे सोनिया गांधी म्हणाल्या. या बैठकीत सोनिया गांधी यांनी पक्षाच्या सरचिटणीसांना लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी काम करण्यास सांगितले तसेच लसींचा अपव्यय कमी होण्यासाठी काळजी घेण्यास सांगितले.
करोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला मदत करण्याच्या हेतूने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेला हाताळताना झालेल्या चुकांचा उल्लेख केला होता. तिसऱ्या लाटेचा सामना करताना नेमकं काय करण्याची गरज आहे याची माहिती यामध्ये देण्यात आली होती. तिसरी लाट आल्यास आपली प्रतिक्रिया काय असावी याची ही ब्ल्यूप्रिंट असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं होतं.
“तिसरी लाट येणार हे स्पष्ट आहे. विषाणू सतत बदलत असून सरकारला पुढील मार्ग सुचवावा हाच या श्वेतपत्रिकेचा हेतू आहे. आम्ही तज्ज्ञांशी चर्चा केली असून हे चार खांब विकसित केले आहेत. यामध्ये लसीकरण हा मुख्य खांब आहे. आक्रमकपणे आणि १०० टक्के लसीकरण करणं अत्यंत महत्वाचं आहे. सरकार पूर्णपणे तयार असलं पाहिजे. रुग्णालयं, ऑक्सिजन, औषधं या सर्व गोष्टी उपलब्ध असलं पाहिजे,” असा सल्ला राहुल गांधींनी दिला होता.

Leave a Reply