कँसर रुग्णांच्या नातेवाईकांना म्हाडाची घरे देण्याचा निर्णय रद्द करण्याप्रकरणात जितेंद्र आव्हाडांची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड

ठाणे : २४ जून – “ही घरं काही माझ्या बापाची नाहीत. जर गरीबांना घर मिळत असतील तर माझं काय जातंय? याबाबतीत एकाही स्थानिकाला डावललं नाहीय. टीव्हीवर सांगितलं जातंय कोणाची तरी घरे काढून घेतली जात आहेत. तर मी माझ्या मेलेल्या आईची शप्पत घेतो मी त्यातला माणूस नाही. माझी आई देखील २७ दिवसांत कॅन्सरने वारली आहे. असे धंदे मी करत नाही. मी कोणाची घरं काढून घेतली नाही. जे अधिकचे गाळे वाटण्यात आले त्यांच्यावर म्हाडाचा अधिकार होता. ती वाटण्यातआली आहेत”, अशी भूमिका गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.
टाटा कॅन्सर रुग्णालयाला १०० सदनिका देण्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली होती. शिवसेनेचे शिवडीचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली होती. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जात होता. मात्र, या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिलीय.
“१०० सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आहेत. स्थानिकांनी विरोध केला आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला आज सांगितलं, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. १५ मिनिटात निर्णय झाला, बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देण्याचा निर्णय घेतला आहे”, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
मला आनंद आहे कि उद्धव ठाकरे आपल्या आमदारांचा किती सन्मान करतात, आपल्या मंत्री मंडळाच्या मंत्र्याने आपली परवानगी घेऊन घेतलेल्या निर्णयाला जर आपला शिवसेनेचा आमदार विरोध करतोय तर त्याची मर्जी पहिली राखली पाहिजे, त्यांचा हा दृष्टीकोण मला वाटतं की एक नेता म्हणून वाखण्याजोग्या आहे, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं.
“परळ नाक्यावर ही शंभर वर्षे जुनी ही चाळ होती. तिचा पुनर्विकास करण्याचं ठरलं आणि तिचा पुनर्विकास झाल्यानंतर तिथल्या एकाही राहिवाश्याला बेघर केलंल नाही. आर आर बोर्डानुसार अधिकचे घर मास्टर लिस्टमध्ये जातात आणि त्यातून विस्तापितांना तिथे अधिकची घरे देणं हा म्हाडाला अधिकार आहे. यातील १९२ घरे म्हाडाच्या हातात होती. मुख्यमंत्र्यांनीच कॅन्सरग्रस्तांच्या म्हाडा सदनिकांना परवानगी दिली होती, मी कोणतीही गोष्ट पूर्व परवानगीशिवाय करत नाही”, असं स्पष्टीकरण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.

Leave a Reply