धान उत्पादकांची मागणी पूर्ण न झाल्यास भाजपचे आंदोलन – आ. परिणय फुके

गोंदिया : २३ जून -आगामी दहा दिवसात धान उत्पादक जिल्ह्यातील रब्बी हंगामातील धानाची उचल करावी, तसेच त्यांच्या बँक खात्यात बोनसची रक्कम जमा करावी, अन्यथा भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाधिकारी तसेच पणन कार्यालयाला टाळे ठोकू, इशारा इशारा आ. डॉ. परिणय फुके यांनी शासनाला दिला आहे. यासंदर्भात त्यांनी अन्न व नागरी सुरक्षामंत्री छगन भुजबळ यांना पत्र दिले आहे.
महाविकास आघाडी सरकारने आतापर्यंत धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस निधी दिला नाही. हा गोंदिया, भंडारासह पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांसोबत अन्याय आहे. सद्यस्थितीत खरीप हंगामाची कामे सुरु झाली आहे. मात्र सरकारने निधीच उपलब्ध केला नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सरकार बि-बियाणांचा पुरवठा करीत आहे, मात्र अद्यापही बहुतांश शेेतकरी त्यापासून वंचित आहे. परिणामी शेतकऱ्यांना महागडे बियाणे खरेदी करावे लागत आहे, असे आ. फुके यांनी पत्रात म्हटले आहे.
धानाच्या बोनसचे ८०० कोटी रुपये सरकारकडे थकित असून ,एकीकडे सरकार वीजबीलापोटी शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा खंडीत करीत आहे, तर दुसरीकडे बोनसचा पैसा देण्यास चालढकल करीत आहे. यातून सरकारची असंवेदनाशीलता दिसून येते. खरीप हंगाम सुरु होऊनही अद्याप रब्बी हंगामातील धानाची उचल झाली नाही. परिणामी भविष्यात शेतकऱ्यांना पाखड धानाच्या नुकसानास सामोरे जावे लागणार आहे. हा प्रकार शेतकऱ्यांनाच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे, असे आ. फुके यांनी म्हटले आहे.

Leave a Reply