नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्याने मुख्यमंत्री ठाकरे नाराज

मुंबई : २२ जून – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली नाराजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे बोलून दाखवल्याचे सूत्रांनी आज येथे सांगितले. यामुळे
महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहेत. एकीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला, तर, मंत्री अनिल परब यांच्यावर देखील आरोप सुरू आहेत.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. हे तिन्ही पक्ष एकत्र असण्यापेक्षा काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रमुख मंत्री यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अशा प्रकारचे वक्तव्य तिन्ही पक्षात अविश्वासाचे वातावरण निर्माण करत आहे, अशी सेनेची भूमिका आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील काँग्रेस मंत्र्यांकडे स्वबळ नाऱ्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून शिवसेना वर्धापन दिनानिमित्त भूमिका मांडल्यावरही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठाम आहेत. परिणामी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे थेट नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी २०२४ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले होते, हे विशेष.

Leave a Reply