खा. नवनीत कौर राणा यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

अमरावती : २२ जून – अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर यांना आज (मंगळवार) सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत कौर राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याव्यतिरिक्त सुप्रीम कोर्टानेही प्रतिवाद्यांना नोटीस बजावल्या आहेत. न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने ८ जून रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देत सर्व प्रतिवाद्यांना नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जून रोजी होईल.
मुंबई उच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या निर्णयाला नवनीत कौर यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाने नवनीत कौर यांचे जात प्रमाणपत्र बनावट घोषित केले होते. यासह हायकोर्टाने आपल्या निर्णयात नवनीत कौर यांना दोन लाखांचा दंडही ठोठावला होता. हायकोर्टाच्या आदेशामुळे नवनीत कौर यांचे सदस्यत्व धोक्यात आले होते.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या अमरावती मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. या निवडणूक निकालानंतर माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. आनंदराव अडसुळ यांच्या वतीने अँड. सी. एम. कोरडे, अँड. प्रमोद पाटील व अँड. सचिन थोरात यांनी बाजू मांडली होती.

Leave a Reply