राम शेवाळकर नावाचा बाप.. – आशुतोष शेवाळकर

(काल आंतरराष्ट्रीय पितृदिन म्हणजेच फादर्स डे साजरा झाला. या निमित्ताने विख्यात साहित्यिक आणि वक्ते कै. राम शेवाळकर यांच्या संदर्भातील त्यांचे चिरंजीव आणि ख्यातनाम उद्योजक आशुतोष शेवाळकर यांनी लिहिलेला एक लेख समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. पंचनामाचे अमरावती येथील सहकारी श्याम देशपांडे यांनी तो पंचनामाला उपलब्ध करून दिला आहे.)
लहानपणी हा मला मुळीच रागावत नसे. तो ‘रागावेल’ असा आई घालत असलेला धाक पोकळ वाटायला लागला होता. इतक्यातच “मी शाळेत जात नाही” असा एक दिवस मी हट्ट करत असताना अचानक हा एकदम रागावला. माझं दप्तर बगीच्यात फेकून दिलं व “आजपासून याची शाळा बंद, मी घरी जेवायलाही येणार नाही’ असं सांगून कॉलेजमध्ये निघून गेला.
मी मुळापासून हादरलो. ‘शॉक’ जो म्हणतात तो हा माझ्या आयुष्यातला बहुधा पहिलाच असावा. याआधी हा मला एकदाच रागावलेला आठवतो. नांदेडला असताना या दोघांचं महिन्याच्या बजेटचं काही बोलणं सुरू असताना हा अचानक मध्येच रागावला व आईही मग रागावून मधल्या खोलीत चटई अंथरून झोपून गेली होती हे आठवतं.
नांदेडचं आणखी काय आठवतं बरं आपल्याला?
घरी भरदुपारी चोर आला, त्याने बाहेर वाळत घातलेले सगळे कपडे नेले, मग आई त्याच्या मागे धावत ‘चोर, चोर’ ओरडत गेली, तेव्हा आपण खूप घाबरलो होतो, ते आठवतं. या सगळ्यांत हा कुठे होता हे आठवतच नाही. चोर येणं, मग पोलीस येणं, पंचनामा, खूप दिवसांनी कपडे परत मिळणं या सगळ्या गोष्टी आईनेच केल्याच्या आठवतात. हा तेव्हा होता कुठे?
मग नांदेडचा शेवटचा दिवस आठवतो. आम्ही बसमध्ये व बसच्या बाहेर सोडायला आलेल्यांची खूप गर्दी जमलेली आठवते. हा प्रसंग आठवण्याचं कारण, हा सतत रडत होता. एकेक माणूस हात मिळवून गेला की हा रडत होता, तीही माणसं रडत होती.
सेन्सॉर बोर्डाच्या मीटिंग्सना हा दर महिन्याला मुंबईला जायचा. येताना मला आवडतात म्हणून चिकू आणायचा. चिकू त्या वेळी इकडे कुठेच मिळत नसत. बॅग उघडली की याच्या सामानाला तेव्हा टिपिकल चिकूचा वास यायचा.
मुंबईहून आला की कपडे काढून पट्टयापट्टयाची चड्डी व वर बनियन या वेषात तो सामान काढायचा, तेव्हा साऱ्या घरात हा वास पसरायचा. बाहेरगावाहून आलेलं सामान आणि हा वास हे ‘असोसिएशन’ माझ्या मनात तेव्हा इतकं पक्क झालं होतं की, बाहेरगावाहून हा आला, सामान उघडलं की तोच वास मला यायचा.
त्याच वेषात दाढी, आंघोळ आटोपून इतक्या दूरच्या प्रवासाहून सकाळीच आलेला हा, लगेच दहा वाजता कॉलेजला जायचा.
कुठूनही बाहेरगावाहून येताना हा माझ्यासाठी छोटी छोटी ‘जादूची सतरंजी’ वगैर पुस्तकंही आणायचा. एक एक करता ४०० पुस्तकांची माझी लायब्ररी तेव्हा झाली होती. याचं बघून रजिस्टरमध्ये मी त्या पुस्तकांचं इंडेक्सींग वगैरेही केलं होतं. पंचतंत्र, इसापनीती, टारझनचे दहाही भाग, भा. रा. भागवतांची फास्टर फेणेची पूर्ण सिरीज हे सगळं यात होतं.
तेव्हाच्या दिवसांतला आणखी काय काय आठवतो हा?
जैताईच्या जीर्णोद्धारासाठी श्रमदान घेणारा आठवतो. दारोदारी देणग्या मागत, अपमान सहन करत, तरी नेटाने घरच्या गप्पांत सहकाऱ्यांचं मनोधैर्य वाढवणारा आठवतो. मराठी प्राध्यापक परिषद, साहित्य संमेलनासाठी समित्या बनवून मीटिंग्स घेणारा आठवतो. ग्रंथ व्यवहार परिषदेसाठी, अणे जन्मशताब्दीसाठी, तर कधी कॉलेजच्या पगारासाठी आईचे दागिने महाराष्ट्र बँकेत गहाण टाकून आलेला आठवतो. त-हेत-हेचे सामाजिक कार्यकर्ते घरी उतरवून घेणारा, आईला चडफडत का होईना पण त्यांचे करायला लावणारा, पवनार आश्रमाचा कार्यकर्ता आजारी पडला तर बरं होईपर्यंत घरून जाऊ न देणारा, एखाद्या वेड्या कवीला आठ-आठ दिवस त्याचं कुणी नाही’ म्हणून घरी ठेवून घेऊन पाहुणचार देणारा, महिनाभर किराण्याची उधारी ठेवून पैसे वाचवणाऱ्या आईच्या तुटपुंज्या बजेटमधून कार्यकर्त्यांनी मागितले तर आईच्या रागावण्याला न जुमानता पैसे काढून देणारा, असा बराच काही आठवतो.
देवाला सोडलेला घरचा मुलगा असतो, किंवा सिनेमात गेस्ट आर्टिस्ट असावा तसा, घरचा पाहुणा, असा समाजाला सोडलेलाच आपल्या घरातला एक मेंबर, असाच तेव्हाचा बाप मला आठवतो. इतका जीव लावणारा, इतका प्रेम करणारा असूनही, घरी येणाऱ्या पाहुण्यासारख्या या काळातल्या माझ्या याच्या बाबतीतल्या आठवणी आहेत.
घरी येणारे पाहुणे म्हणून पु. भा. भावे आठवतात. बाबा कॉलेजला गेले असताना समोरच्या अंगणात आराम खुर्चीवर बसून हाताची मूठ वळून त्यांचे सिगरेट पीत विचारात असणं आठवतं. त्यांची रेधारेघांसारखी अक्षरे असलेली आलेली पत्रं आठवतात. त्या रेघाच समजून मी लिहता येत नसतानाही रेघा रेघा काढून भावे काकांना पत्र लिहिलेलं आठवतं, ते याने कौतुकाने त्यांना पाठवल्याचं व त्यांचंही तसंच रेघारेधांचं उत्तर आल्याचं आठवतं.
घरी कुणीही, कितीही माणसं आली तरी माझी जागा सिंहासनासारखी याच्या मांडीवर असायची व तिथं बसून सगळ्या गप्पा ऐकायचो, हे आठवतं. ‘बरं दिसत नाही’ म्हणून आईच्या रागावण्याला हा काही म्हणत नाही, उलट बसवून घेऊन लाडच करतो, म्हणून मी जुमानत नसल्याचं आठवतं.
याची किती रूपं आठवावीत? मला पोहणं शिकवणारा. थोडं शिकल्यावर पाण्यात वर उचलून फेकून देणारा व स्वत:च्या भरवशावर वर येतो पाहून कौतुक करत इतरांना ‘मी असं पोहणं शिकवलं’ म्हणून सांगणारा, उन्हाळ्यात दुपारी चटईवर एकी की बेकी करत आमच्या सोबत संत्रं खाणारा, तर तिघांचंच कुटुंब असल्यामुळे माझ्या समाधानासाठी पाच-तीन-दोन किंवा बदाम सात खेळणारा. मी आजारी असताना मधल्या खोलीत माझ्या खाटेच्या बाजूला बसून रमुकाकाला किस्से, गाणे ऐकवत अर्धी रात्र जागवणारा. मॅट्रिकला असताना यवतमाळचे आजोबा आले. पहिल्या पावसात मी भिजायला लागलो. खाली मातीत बसून तुषार उडवायला लागलो, तेव्हा ते मला रागवत असताना, माझ्यासोबत लगेच कपडे काढून येऊन मातीत लोळणारा, खेळणारा व जावईच असं करतो तर पोराला काय म्हणायचं म्हणून जागीच आजोबा चडफडत असतानाही माझ्या बरोबरीनं मस्ती करणारा. पुण्याला मी हॉटेलमधल्या जेवणानंतर फ्रूट सॅलडचा हट्ट केल्यावर तिथे न मिळाल्याने केवळ माझ्या हट्टापायी रिक्षाने फिरत, हॉटेलच्या शोधात पाच रुपयांच्या फ्रूट सॅलडसाठी पंधरा रुपये रिक्षावर ऐपत नसताना खर्च करणारा, असा बराच काही आठवतो.
उन्हाळ्यात बनियन पोटाच्या वर ओढून पोट उघडं ठेवून हा पेपर तपासायचा. असं बसणं ही याची नेहमीची पेटंट स्टाईल. प्रश्नांचे मार्क्स कव्हरच्या पानावर उतरवताना व बेरजा करताना नेहमी चुका करायचा. मी व आई याच्या बेरजा तपासत चुका शोधत बसायचो. (कारण प्रत्येक चुकीचे पैसे कापले जायचे. या पेपर तपासणीतून येणाऱ्या पैशांनी काहीतरी वस्तू घ्यायचं आईच्या मनात असायचं.) मग शेवटी एखादा पेपर नेहमीच गहाळ करायचा. मग हा पूर्ण टेन्शनमध्ये. घरभर टेन्शन. दिवसभर शोधाशोध. मग शेवटी कुठेतरी तो पेपर सापडायचा व सगळं शांत व्हायचं, ते आठवतं.
मी ए.एम.आय.ई.चा पहिला सेक्शन पास झाल्यावर पाया पडलो, तेव्हा मला मिठीत घेऊन रडणारा हा आठवू, की माझ्या ८६ सालच्या वाढदिवशी माझ्या ८५ तल्या सगळ्या अचिव्हमेंट्स एक एक नाव घेऊन ही ‘पार्टी यासाठी’ म्हणत प्रत्येक वेळी हातावर एक एक पेढा ठेवत ‘बजाव टाली’ म्हणत माझ्या सगळ्या मित्रांना टाळ्या वाजवायला लावत मजा करणारा आठवू?
मी पहिली गाडी घेतल्यावर मीच स्वत: गाडी चालवत सरप्राईज म्हणून वणीला आल्यावर, धावत येऊन फाटक उघडत निरागसपणे ‘कुणाची आहे रे भदडा ही गाडी?’ विचारणारा आठवतो व घरात आल्यावर त्याच्या हातात किल्ली ठेवून पाया पडलो, तर मला मिठीत घेऊन भडभडून रडणाराही आठवतो.
वैभव आल्यावर याच्या कुठल्याच वागण्यात यत्किंचितही बदल तर झालाच नाही, पण वैभवाने हा किंचितही सुखावलेलाही कधी दिसला नाही. तसाच नेहमीसारखा याच्या नैसर्गिक आध्यात्मिक प्रगतीच्या आनंदात रमलेला. गाडीने मात्र सुखावला. कारण आता याला दौरे जास्ती करता यायचे. गाड्यांच्या वेळापत्रकांची बंधनं न पाळावी लागता, एका दिवसात दोन-दोन, तीन-तीन गावं करून पुन्हा रात्रभर प्रवास करून दुसऱ्या दिवशी कॉलेजला हजर होता यायचं. वैभवाने आलेली प्रवासाचीच सुखं फक्त याला भावली. विमानामुळे शनिवार-रविवारमध्ये मुंबई, पुण्याचे कार्यक्रम, मीटिंग्ज करता येतात, हाच फक्त याच्या दृष्टीने वैभवाचा उपयोग.
नाहीतर तशा याच्या प्रवासाच्या ‘सुरस्य कथा रम्या’ अनेक आहेत. त्यात पेपरच्या गठ्यांवर बसून प्रवास करण्यापासून, ट्रकमधून प्रवास, त्यातून उतरताना पडणं, रेल्वेत चढायला गेल्यावर रात्री प्रवाशांनी दार आतून बंद करून घेतल्यामुळे दारातच दोन्ही दांड्यांना धरून, दोन्ही खांद्यात बॅगा असा पुढल्या स्टेशनपर्यंत प्रवास. अशा आईच्या हृदयाच्या ठोका चुकवणाऱ्या अनेक कथा यात आहेत. असे शनिवार, रविवारचे दौरे आटोपून, दरमजल गाठत, सोमवारी सकाळी बरोबर नऊला हा ‘प्रिन्सिपॉल’ कॉलेजात पोहोचायचा.
मला मॅट्रिकला परसेंटेज कमी पडले, तेव्हा पॉलिटेक्निकला अॅडमिशनच्या वेळेस याने कुणाला फोन केला नाही. सहाव्या सेमीस्टरचा उशिरा रिझल्ट आल्यामुळे इंजिनिअरिंगला कुलगुरुच्या लहानपणीच्या मित्राचा मुलगा म्हणून माझ्या एका वर्गमित्राची ॲडमिशन झाली, पण कुलगुरुपदाचा एक उमेदवार असलेल्या माझ्या बापाने एकही फोन न केल्यामुळे मी नोकरीची वाट धरून खाजगीरीत्या ए.एम.आय.ई. करायचं ठरवलं.
नंतर पुढे नोकरी मिळवण्यासाठी मी ‘पी.डब्ल्यू.डी.’, ‘एम. एस.ई.बी.’ या खात्यांमध्ये जवळपास वर्ष-दीड वर्ष खेटे घातलेत. तिथल्या ज्युनिअर इंजिनिअर, डेप्युटी इंजिनिअर यांच्याकडेसुद्धा मी चपला झिजवायचो, आणि या काळात याच खात्यांचे मंत्री असलेले सुधाकरराव नाईक व जयंतराव टिळक दोन-तीनदा कार्यक्रमानंतर याला सोडायला जातीने घरापर्यंत आले, पण याने कधी त्यांच्याकडे शब्द टाकला नाही. एकदा मोठ्या मुश्किलीने माझ्या अर्जाची प्रत कुठून तरी परतीच्या प्रवासात याने जयवंतराव टिळकांच्या हातात दिली. एखाद्या सेवादलाच्या गरीब कार्यकर्त्यांचा मी मुलगा असतो तर मात्र, हिरिरीने याने मला नोकरी लावून देण्याचा प्रयत्न केला असता.
या सगळ्याचा त्या काळात मला फार राग यायचा. त्याबद्दलची अढी मी बरेच दिवस मनात बाळगली. नंतर माझ्या आयुष्याच्या स्ट्रगलमध्ये जसं जसं मला मूल्यांचं महत्त्व, त्यांच्यासाठी किंमत देण्यातलं सुख, असं जगण्यातला अप्रतिम आनंद हे कळत गेलं तशी तशी मनातली ही अढी हळूहळू ओसरत गेली.
नोकरीत असतानाच धंदा सुरू करण्याचे माझे प्रयत्न सुरू होते. भांडवल जवळ नसल्यानं कुठेच काही जमत नव्हतं. दोन-तीन प्रपोजल्स अगदी तोंडाशी घास येऊन पळवली गेल्यासारखी फिसकटली. तेव्हा अगदी पूर्ण निराशा व हताशपणा आला होता. धंदा करायची स्वप्नं व प्लॅन्स अगदी सोडून द्यायच्या बेतात होतो. तेव्हा ऑफिसमधल्या एका सहकाऱ्याच्या सासऱ्याचीच जागा पंचवीस हजार रुपये गुंतवणुकीवर मिळण्याची संधी आली.
मी याला तेवढे पैसे मागितले. त्यावेळेस हा माझ्याबद्दल अगदीच आशा सोडलेल्या मन:स्थितीत होता. अर्थात पैसे याच्याजवळही नव्हतेच. हा ‘नाही’, ‘नाही’ म्हणत असतानाही मी अतीच हट्ट केला. शेवटी आई म्हणाली, “अहो, देऊन टाकू यात न एकदा पैसे. निदान स्थाला करून तर बघू द्या.” शेवटी आईनेच जिद्द धरल्यामुळे हा नंतर तयार झाला. पण आईला, “हा बोंबलवणार आहे हे सगळे पैसे, मी नक्की सांगतो तुला,” असं सांगूनच मग याने भैय्याजी ढुमेंकडे शब्द टाकला. त्यांनी त्यांच्या घरचे काही दागिने दिले, ते महाराष्ट्र बँकेत गहाण ठेवून त्याचे पंधरा हजार पाचशे रुपये आले, आईच्या दागिन्यांचे दहा हजार रुपये मिळाले. अशा रीतीने वयाच्या चोविसाव्या वर्षीच माझा धंदा सुरू झाला.
पैसे देताना याने असं केलं, पण नंतर लगेच पुढचा हप्ता द्यायला जेव्हा मी स्टेट बँकेतून कर्ज घेतलं, तेव्हा सह्या करायला आल्यावर याला त्या बाबतीत काहीही कळत नसतानाही तिथल्या फील्ड ऑफिसरनी ‘हे असे असे कागद आहेत, हा इतकं कर्ज घेतो आहे, तुम्हाला माहीत आहे का?’ विचारल्यावर अगदी विश्वासाने मान डोलावून बोलताना माझीच बाजू उचलून धरली. माझ्या हृदयात अगदी हलल्यासारखं झालं.
नंतर सहा-सात महिन्यांच्या आतच मी आई व भय्याजींचे दागिने महालक्ष्मीच्या दिवशी देवीच्या अंगावर घालायला म्हणून सोडवून आणून दिले. त्यानंतर एक रिवाज म्हणून दर दसऱ्याला मी व आई भय्याजींच्या हातावर खरं सोनं ठेवूनच नमस्कार करायचो.
भय्याजी काही वर्षांपूवी, नेमके दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशीच गेले. मी वणीला जाऊन त्यांच्या चितेवर त्या वर्षीचं सोनं वाहून आलो.
लहानपणापासूनच मला नकला, अभिनय, दिग्दर्शन, गाणं यांचं अंग चांगलं होतं. खेळांमध्ये मी बुद्धिबळ अतिशय उत्तम व टेबल टेनिस, बॅडमिंटन बऱ्यापैकी खेळत असे. आजही आतले आवाज प्रत्ययास येतात, तेव्हा दिग्दर्शन व बुद्धिबळ यांत आपण अतिशय पुढे जाऊ शकलो असतो, असं जाणवत राहतं. पण याने कधी या सर्वांमध्ये मला गती मिळण्यासाठी जाणीवपूर्वक क्लासेस लावून देणं किंवा स्पर्धांना पाठवणं असं काही केलं नाही. आज विचार करतो तेव्हा वाटतं की, आज दिसतो तसा पालकांमध्ये या सगळ्या बाबतींतला ‘अवेअरनेस’ त्या काळात नव्हताच. शाळेतल्या प्रगती व मार्काबाबतही पालक इतके ‘काँशस’ नसायचे. याला तर मी कितवीत आहे, हेही माहीत नसायचं. पाहुण्यांनी विचारलं की, मला किंवा आईला विचारून तो सांगायचा.
पण तरीही वाटत राहतं की, हा तर इतका ‘उत्क्रांत’ व ‘जागृत संवेदनांचा’ होता नं? याला तेव्हा आपल्यातली ही अंग ओळखता येऊ नयेत? शिवाय हा तर प्रतिभेच्या क्षेत्रातला, त्यामुळे या सगळ्याच्या ‘महत्त्वाबद्दल’ची जागरूकताही याच्यात असेलच की? तरीही यानं आपल्या बाबतीत हे काहीच का करू नये?
पण नंतर लक्षात येतं, बोलण्यातून नाही, पण आपल्या वागण्यातूनच हा आपल्याला शिकवत गेला. याच्या वागण्यातून आपल्यावर झालेल्या संस्कारांनी आपलं किती भलं झालं आहे हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा ऊर भरून येतो.
पण तरीही वाटतं की, आपल्यात हे संस्कार टिपण्याची संवेदनशीलता होती म्हणून. ही नसती तर?
गांधींनी दोन-तीन पिढ्यांतली अनेक माणसं ‘माणूस’ म्हणून घडवली, पण ‘बाप’ म्हणून बिघडवलीत. हाही त्यातलाच एक. पुढे गांधी अभ्यासला म्हणून बरं झालं, नाही तर गांधी या एका कारणानेच हा माझ्या शत्रूपक्षात गेला असता!
बरं झालं चोरी करणं, डाके घालणं, इतपत कधी मी बिघडलो नाही. नाहीतर यानं स्वत:च पकडून मला पोलिसात नेऊन दिलं असतं. एवढं एक ‘हौतात्म्य’ पोरानं आपल्याला मिळू दिलं नाही, अशी एक खंत याच्या मनात असेलही कदाचित. काही सांगता येत नाही.
उभ्या आयुष्यात याने स्वत:चं घर बांधलं, एवढं एकच बाप या दृष्टीने याच्याकडून झालेलं मला दिसतं. नाहीतर घरात कधी एक वस्तू आणली नाही, कुणासाठी कपडा आणला नाही किंवा काहीच नाही. पुस्तकं मात्र माझ्यासाठी खूप आणली, अजूनही आणतो. डिप्लोमा झाल्यावर ए.एम.आय.ई. करत होतो, तेव्हा मी म्हटलं म्हणून मुंबईहून कॅलक्युलेटरही आणला. पण कधी शर्ट आणला, जोडे आणले हे आयुष्यभरात कधीच झालं नाही.
वर्षभराचा सगळ्यांचा कपडा आईच आणायची व मग सहा महिने कापड दुकानदाराची उधारी फेडत बसायची. टेबल फॅन, रेडिओही आईने असाच घेतला. पहिला ट्यूब लाईट, त्याचा खोलीभर उजेड, मग त्यात बसून अभ्यास करायची मजा, पहिला सिलिंग फॅन, ‘खोलीत कुठेही बसा, हवा लागते हे आनंदाचं फिलींग, हे सगळं आठवतं.
एक दिवस मुंबईहून येताना रेकॉर्ड प्लेयर मात्र याने आणला. एच.एम.व्ही.चा फियेस्टा. सेकंडहँड. हे आश्चर्य कसं घडलं ते माझ्या नंतर लक्षात आलं. मुंबईला ज्या मित्राच्या घरी हा नेहमी उतरायचा, त्याला नवीन रेकॉर्ड प्लेयर घ्यायचा असल्याने त्याने हा जुना प्लेअर सव्वा चारशे रुपयांना त्याच्या माथी मारला असावा. पण यामुळे दिवसभर रेकॉर्ड लावून ऐकत बसायची माझी मात्र चैन झाली. असतील त्या रेकॉर्ड्स मी ऐकत बसे. शास्त्रीय संगीताचा माझा कान यामुळेच या काळात तयार झाला.
हे असे असतानाही एका बेसावध क्षणी ‘पाचवं सेमीस्टर चांगला पास झालास तर स्कूटर घेऊन देईन,’ असं मी याच्याकडून एकदा वदवून घेतलं. पास झाल्यावर मी जिद्दीने याच्या सतत मागेच लागायचा. हा चिडायचा. मी रोज एक स्कूटर दाखवायला आणायचो (अर्थात सेकंडहँड). शेवटी हा चडफडत तयार झाला. परिचिताकडून हातउसने घेऊन मी घरी आणूनच ठेवलेल्या स्कूटरचे पैसे याने देऊन टाकले.
नंतर डिप्लोमा पास होऊन परतल्यावर गावात मी स्कूटरने फिरायचो व हा सायकलने. एकदा बसस्टँडसमोर मी मित्रांसोबत मजा करत स्कूटरने जात होतो व समोरून हा सायकलला पायडल मारत कॉलेजला जात होता. त्या दिवशी मला स्वत:ची लाज वाटून, मेल्याहून मेल्यासारखं झालं.
घराच्या बांधकामाचीच काय, पण संसार व घराच्या सर्वच जबाबदारीची बाजू अर्थात आईने एकटीनेच जन्मभर समर्थपणे पेलली.
पगार झाला किंवा मानधनाचे पैसे मिळाले की हा ते घरी येऊन आईजवळ देऊन मोकळा व्हायचा. हे केलं की याची जबाबदारी संपली. वर आपण सगळा पैसा बायकोजवळच देऊन टाकतो, हे तो मोठ्या अभिमानाने लोकांजवळ सांगायचाही.
असतील तेवढ्या पैशामध्ये आई टुकीने संसार चालवत असे. त्यात हा बाहेर व्याख्यानाच्या दौऱ्याला जाणार, तर कधी शंभर रुपये प्रवासखर्च करून अकरा रुपये मानधन घेऊन येणार.
कुठलंही व्याख्यान ठरवताना आत्तापर्यंत आयुष्यात याने कधी मानधन ठरवलं नाही. कधीही कुठलाही आकडा, अगदी प्रवास खर्चाचाही तोंडाने सांगितला नाही. आयोजक जेवढे देतील, तेवढे पैसे काहीही न बोलता स्वीकारायचे हे याने पाळलं. आत्ता तर नाहीच, पण ज्या काळात पैशांची चणचण होती, त्या काळातही नाही. ज्ञानदानाचं ‘व्रत’ आयुष्यभर सांभाळावं त्या ‘स्पिरीट’ने त्याने आपलं वक्तृत्व जन्मभर वापरलं.
पण याला आयुष्यात कधी कुठे काही कमीही पडलं नाही. प्रसंग पडला, अडचण आली तर कुठून तरी काहीतरी सोय व्हायचीच. ‘अल्ला-रखा’ अशी काही माणसं असतात. जणू ईश्वरच त्यांची देखभाल करत असतो. हा त्यापैकीच आहे. याच्यामुळे आम्हांलाही ‘अल्लारखा’ होण्याचं भाग्य लाभलं.
आईच्या ‘काठोकाठ बजेट’च्या संसारात हा पुन्हा कार्यकर्त्यांना पैसे दे, आपसातल्या माणसांना परतीची आशा नसताही हातउसने पैसे दे, संस्थांना मदत कर, असं काही करून खार लावायचा.
सतत वैर केलेला एक विद्यार्थी पास होऊन कॉलेजबाहेर गेल्यावर काहीतरी अडचणीत आला व मदतीसाठी पुन्हा याच्याकडेच आला. पैसे परत येणार नाहीत, ही खात्री असतानाही कॉलेजच्या सोसायटीचं कर्ज व्याजाने काढून याने त्याला पाच हजार रुपये दिले. ते हप्ते भरणं शेवटी अर्थात आईच्याच नशिबात आलं..
असे कृतघ्नतेचे अनुभव हाही याच्या नशिबाचाच एक भाग आहे, असं वाटतं. विद्यार्थी दशेतले याचे एक मित्र नंतर मराठीचे प्राध्यापक झाले. डॉक्टरेट करून संशोधक, पदव्युत्तर शिक्षक व स्वत:च्या ‘प्रतिभेचा अभाव’ लक्षात घेऊन रीतसर ‘समीक्षक’ झाल्यावर याच्याविषयी कमीपणा वाटून ते त्याच्याशी फटकून वागू लागले. कधी भेटले तरी ‘ये, जा’ ऐवजी ‘अहो, जाहो’ करून अंतर ठेवण्याची सूचना देऊ लागले.
मग हाही मोठा होत जाऊन नाव मिळवत गेला. आता असूयेमुळे डॉक्टरांनी अगदी संबंधच न ठेवायला सुरुवात केली.
नंतर उतरत्या वयात त्यांच्यावर एक बालंट आलं. पोलीस केस झाली, महिला संघटना मागे लागल्या, वृत्तपत्रांतून खूप अपप्रसिद्धी सुरू झाली. त्यावेळी मग त्यांना या ‘जुन्या’ मित्राची आठवण झाली. तत्परतेने हा धावूनही गेला. समोरची व्यक्ती, तिच्या घरचे लोक यांच्याशी वार्ता करून, मध्यस्थी करून त्यांना तक्रार मागे घ्यायला लावली. अरविंद इनामदार इथे पोलीस कमिशनर असल्यामुळे पोलिसांचाही त्रास याने त्यांच्याकरवी थांबवला. वृत्तपत्रांतून मोहीम चालवणाऱ्या आपल्याच मित्रांशी वैर घेतलं व अशा रीतीने या ‘समीक्षक ऋषी’ना या सर्वांतून सोडवलं.
त्यानंतर या समीक्षकांना अ. भा. साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होण्याची स्वप्नं पडू लागली. त्यांनी फॉर्म भरला. याच्याकडे मदत मागितली. हाही हिरिरीने त्यांच्यासाठी मतं गोळा करण्यासाठी फिरू लागला. या समीक्षकांना बहुतांशी सर्वांचाच विरोध होता. पण याने आपल्या जन्मभराच्या सख्ख्या मित्रांशीही वैर घेतलं व शक्य तितकी समीक्षकांना मदत केली. आपल्या जन्मभर पाळलेल्या ‘अजातमित्रत्वा’च्या व्रतामुळे हे ‘संशोधक, समीक्षक’ निवडून येणं शक्यच नव्हते. त्यामुळे ते रीतसर पडले.
यानंतरही त्यांनी याच्याशी थोडाबहुत संपर्क ठेवला होता. पण निवडणुकीच्या दरम्यान त्यांचं जसं रोज प्रेम उफाळून यायचं, ते आता पूर्णपणे ओसरलं होतं.
मध्ये त्यांच्या दृष्टीने एक वाईट घटना घडली. याला नागपूर विद्यापीठाने डी. लिट. प्रदान केली. ती मिळाल्यापासून त्यांनी एकदम याच्याशी संपर्क तोडला. साधा अभिनंदनाचा फोनसुद्धा केला नाही.
पण याने आपला ‘कारुण्याचा प्रवाह’ सुरूच ठेवला होता. त्यांच्या वाढदिवसाला याने फोन केला, त्याचंही उत्तर त्यांनी दिलं नाही.
मग मध्ये दुसऱ्या एका निमित्ताने त्यांना आपली मळमळ ओकण्याची संधी मिळाली. त्यात त्यांनी एका वृत्तपत्राच्या संपादकाच्या नावाने अग्रलेख म्हणून एक अतिशय हीन दर्जाचा पोरकट तर्कशास्त्र मांडणारा लेख लिहिला.
इतका पातळी सोडून लिहिलेला लेख याच्यावर जन्मात यापूर्वी कुणी लिहिलेला नाही आणि एकंदरीतच मराठी साहित्य क्षेत्रात कुठल्याच नामवंतांनी कुठल्याच नामवंतांविषयी, इतकी पातळी सोडून लिखाण केलं नसेल.
आणि हे सगळं केवळ वैयक्तिक असूयेपोटी. आपण कुणाचंही काहीही वाईट न करता, केवळ आपलं स्वत:चं काही चांगलं झालं तरी कसं वैर निर्माण होतं, त्याचा हा उत्तम नमुना होता.
आणि तरीही मला खात्री आहे की, पुन्हा जर त्या समीक्षकांना काही अडचण आली, तर तेव्हाही पुन्हा हा असाच धावून जाईल. आणि हीच खात्री कदाचित समीक्षक महाशयांनाही असावी.
भिडस्तपणा हा याचा आणखी एक (अव?) गुण. आजोबांच्या शेवटच्या दिवसांत रविवारी सकाळी ७-७.३० ला त्यांना श्वास लागला व घरघर सुरू झाली. मी व माझे दोन डॉक्टर मित्र आत घरात नाश्ता करत होतो. आई-बाबा आजोबांजवळ मंदिरात होते. आईला लक्षात आल्याबरोबर तिने बाबांना आम्हांला बोलवायला सांगितलं, पण पोरं रात्रभर जागलेली, आत्ता खात आहेत म्हणून आम्हांला बोलवायला याचा काही आवाज निघेना. शेवटी याने हाक मारली. ‘आशुडाऽऽऽ’ म्हणून. त्या हाकेत आणि आवाजातचं असं काही होतं की, मी सगळं काही समजलो. खाणं सोडायला लावून मित्रांना धावतच घेऊन गेलो. तास-दीड तास जिवाची पराकाष्ठा केली, पण शेवटी पावणे नऊ वाजता त्यांचा प्राण गेला. बाबांचा तो आवाज, ती हाक मी अजूनही विसरू शकत नाही. त्यात समोर येऊन ठेपलेल्या अटळतेची सूचना, आर्तता, भिडस्त बोलावणं, घाई, इमर्जन्सी, निराशा, चिंता, दुःख, एकलेपणा सगळंच काही होतं.
याला स्वत:ला हार्टचं दुखणं सुरू झालं तेव्हापासून, रात्री काही त्रास झाला तर आता काहीही होऊ शकतं, असं समजून देवघरात जाऊन देवाला नमस्कार करून हा झोपून जात असतो. आईला यदाकदाचित जाग आली, तरी तिला मला उठवू देत नाही. तो दिवसभर बिचारा इतकं काम करत असतो, त्याला रात्री निदान शांत झोपू दे’ हे त्यामागचं कारण. पण तेच कधी रविवारी दुपारचं झोपलो असलो व त्याच्या संबंधातलं कुणी अगदी चिल्लर कामासाठी माझ्याकडे आलं असलं, तर मला उठवणार व खाली बोलावणार.
आता गेल्या वर्षी झालेल्या याच्या फूड पॉयझनींगच्या आजारात, त्याचं पोटॅशियम कमी झालेलं. जवळपास बेशुद्ध, भान नाही अशी अवस्था. पायावर उभं राहणं होत नव्हतं. पण डॉक्टर माहुरकर घरी बघायला आल्यावर तेवढ्यातही सगळं भान सावरून घेऊन, डॉक्टरनी कसं आहे?’ असं विचारल्यावर ‘चांगलं आहे’च सांगणार. नंतर अॅडमिट केल्यावरही राऊंडवर येणाऱ्या प्रत्येक डॉक्टरलाही तसंच सांगणार.
त्याचा त्रास, इमर्जन्सी, संकटाची जाणीव यामुळे माझी व आईची त्रेधातिरपीट, धावपळ, वेगवेगळ्या डॉक्टरांना बोलावणे व त्यावर ते आल्यावर याचं हे सांगणं. त्याही अवस्थेत आमची चिडचीड. बरं आहे, रिपोर्ट्स खरं काय ते सांगत असतात म्हणून.
एका दिवसाने थोडं बरं वाटल्यावर, लगेच याचा ‘सेन्स ऑफ ह्यूमर’ पुन्हा जागृत झाला होता. हिंगणघाटच्या कार्यक्रमातून येताना जांबला लस्सी प्यायल्यामुळे हे ‘फूड पॉयझनींग’ झालं, असा अंदाज होता. भेटायला आलेली चंद्रपूरची याची डॉक्टर मित्रमंडळी जायला निघाली, तेव्हा निरोप घेताना याचे डोळे मोठ्या कष्टाने उघडत होते, आवाज जवळ कान नेऊन ऐकावा इतका हळू येत होता, पण तशातही तो त्यांना म्हणाला, ‘जाताना जांबला थांबून लस्सी घेऊन पुढे जा!’
ही सततची मिश्किलता, कोट्या, नर्म विनोद हा याचा स्थायिभावच. लोकांना सतत हसत ठेवणं व स्वत: मध्ये मध्ये तंद्रीत जाणं, हे याचं सतत सुरू राहतं. नवीन टायपिस्ट ठेवली तर कुणी आल्यावर हा तिची ओळख करून देणार, ‘ही माझी नवीन कॉम्प्युटर कन्या. हीपण पहिलीइतक्याच चुका करते.’ यावर समोरच्याने चालायचंच, To err is human! असं काही म्हटलं की, हा लगेच म्हणणार, ‘काय? To err is woman?’
कधी वाटतं, याचा हा रोजच्या बोलण्यातला खट्याळपणा, मिश्किलपणा, वात्रटपणा, कोट्या, हे सगळं जर कुठे नोंदवून ठेवलं असतं, तर त्याचं एखादं पानापानावर हसू फुलवणारं छान पुस्तक होऊ शकलं असतं.
याच्या संपूर्ण स्वभावाचं गणित करायचं म्हटलं तर काळजी करणं व हळवेपण हाही ‘एक लघुतम साधारण विभाजक’. वयाबरोबरच या दोन्हीही गोष्टी याच्यातल्या वाढत गेल्यात व आता तर या दोन गोष्टी याच्या स्वभावाच्या ‘महत्तम साधारण विभाजक’ झाल्या आहेत.
याचं हळवेपण कुठल्याही दुःखाच्या प्रसंगात, काळजीच्या प्रसंगात, कुणाचं दु:ख पाहिलं, ऐकलं की उफाळून येतं; तसचं कुठल्याही आनंदाच्या प्रसंगातही येतं. पण या दोन्हीपेक्षा कुठेही काही उदात्त, मनाचं मोठेपण, मोठं कार्य पाहिलं की हे याचं हळवेपण जास्त उफाळून येतं. अशा प्रसंगात टचकन याच्या डोळ्यांत पाणी येतं. कुठल्याही आनंदाच्या, दुःखाच्या वा भारावून जाण्याच्या प्रसंगांनी डोळ्यांत पाणी तरळण्यापासून तर ओक्साबोक्शी रडण्यापर्यंत जाणारा हा माणूस आहे.
अगदी लहानपणी मला आठवतं, अंगणात पट्ट्याचं एरीअल’ टांगलेल्या जाळीदार लाकडाच्या डब्यातल्या रेडिओवर काहीतरी ऐकल्यावर हा अचानक हंबरडा फोडून रडायला लागला. नंतरही कितीतरी वेळ रडतच होता. मी तर घाबरूनच गेलो होतो. मग आईनं ‘काही नाहे रे, नेहरूजी गेलेत म्हणून असं करतात,’ असं सांगितल्यावर आईच्या हावभावावरून ‘हे, म्हणजे काही फारसं विशेष नसेल’ असं वाटून निर्धास्त झाल्याचंही आठवतं.
नंतर पुढे ७७ मध्ये जनता सरकार निवडून आलं व जयप्रकाशजींनी सर्व खासदारांना राजघाटावर शपथ दिली, तेव्हा त्याचं थेट प्रक्षेपण रेडिओवर झालं होतं. ती शपथ सुरू होती, तेव्हा पूर्ण अर्धा तास हा सतत रडत होता.
विनोबा गेल्याची बातमी आली, तेव्हा आम्ही अचलपूरला होतो. दिवाळी असल्यामुळे पुरणाच्या पोळीचं जेवण सुरू होतं. हा तसाच ताटावरून उठला. रडला नाही. कारण ते अपेक्षितच होतं. त्यांचं ‘प्रायोपवेशन’ सुरू असल्यामुळे अचलपूरला येतानाच आम्ही त्यांना भेटून आलो होतो. पण नंतर वर्षभर याने पुरणाची पोळी खाल्ली नाही.
८६ मध्ये हा पहिल्यांदा दिल्लीला गेला, तेव्हा राजघाटावर गेला होता. गांधींच्या समाधीच्या पाया पडल्यावर, थोडं बाजूला जाऊन झाडाखाली बसून अर्धा तास हा नुसता रडतच होता.
टचकन डोळ्यांत पाणी यायला तर याला लहान लहान माणसांच्या मनाच्या मोठेपणापासून मोठ्या माणसांच्या भव्यदिव्य कार्यापर्यंत कुठलंही निमित्त पुरतं.
अत्यंत ऋजू, हळवा स्वभाव. कुणालाही कधी दुखवणार नाही. कुणाला घालून पाडून बोलणार नाही. सतत दुसऱ्यांची काळजी करणार. एखादा जितका दुःखी, पीडित, तितका हा हळवा होऊन त्याच्या दु:खनिवारणार्थ धावणार. कुणी थोडा अधू असेल, लोकं त्याची चेष्टा करत असतील, तर त्याला हा ‘मॉर्निंग वॉक’पासून कार्यक्रमांपर्यंत सगळीकडे मित्रासारखं सोबत घेऊन फिरणार.
या माणसाच्या स्वभावाचं आणखी एक वैशिष्ट्य मला जाणवतं ते हे की, याच्या संबंधातल्या, अगदी कुणालाही हा प्रश्न विचारला की, हा माणूस ‘इंट्रोव्हर्ट आहे की एक्स्ट्रोव्हर्ट ?’ तर कुणीही चटकन उत्तर देईल, ‘इंट्रोव्हर्ट.’
पण तसं पाहायला गेल्यास याच्यात ‘इंट्रोव्हर्ट’ माणसाचं एकही लक्षण नाही. याला एकटं राहणं, एकान्त मुळीच आवडत नाही. सतत भोवती माणसांचा गराडा, संभाषण याला हवंच असतं. कुणी बोलायला नसलं तर हा अस्वस्थ होईल. लेखनालाही बसतो तेव्हा अगदी एकान्त हवा, कुणी डिस्टर्ब करायला नको असं याचं नसतं. लोक येत-जात राहतात आणि त्यातच याचं लेखन’ सुरू असतं. आलेला कुणी गेला की, ‘कुठे होतो आपण?’ असं लेखनिकाला विचारणार आणि लगेच एका मिनिटात याची ‘लिंक’ही लागून याचं पुढचं लेखन, अगदी तोच दर्जा राखून पुढे सुरू.
वाचनाच्याही बाबतीत याचं असंच आहे. त्यातही याला एकान्त लागत नाही. कुणी भेटून, बोलून गेल्यावर, पुस्तकात डोकं घातलं की याची एकाग्रता पुन्हा लगेच साधते. प्रवासात, बसमध्ये, गाडीत, विमानात याचं सतत वाचन सुरू असतं. आजूबाजूच्या गर्दीचा, गोंगाटाचा याला काहीही त्रास होत नाही. याची ‘वाचन-तंद्री’ अभंग असते. अशी चटकन व कुठेही एकाग्रता साधता येणं, ही याला प्राप्त असलेली एक सिद्धीच आहे.
आणि हा एकपाठीही आहे. एकदा वाचलं की याच्या ते जसंच्या तसं लक्षात राहतं.
एकान्त याला लागत नाही म्हणण्यापेक्षा ‘नकोच असतो’ म्हणणं जास्त सयुक्तिक आहे. उलट एकान्ताने हा ‘नर्व्हस’ होतो. कुणीच याच्या अवतीभवती बोलायला नसलं व हा रिकामा असला की, फोनची बटनं दाबत कुणाशी ना कुणाशी सतत बोलत असतो. फोनचंही याला तसं ‘अॅडिक्शन’च आहे. सतत असा लोकांमध्ये, बोलण्यामध्ये राहणारा हा माणूस तरीही ‘इंट्रोव्हर्ट’ आहे, हेही तेवढंच खरं आहे.
सतत लोकांमध्ये राहूनही आतल्या आत कुठेतरी हा आपल्या एकान्तात, तंद्रीत मग्न असतो, हे यामागचं कारण असावं.
‘आतल्या’ एकान्तासाठी, लौकिक, भौतिक एकान्ताची आवश्यकता न उरणं, ही आध्यात्मिक उन्नतीची एक पायरीच असावी का?
याच्या या हळवेपणाचं काय कारण असावं?
अगदी लहानपणीच आई गेली, वडील सतत फिरतीवर. अती संवेदनशील माणसाला यातून आलेल्या एकलेपणामुळे, मायेच्या भुकेमुळे आलेलं स्वभावाचं हे हळवेपण? –
माझी आत्या एक आठवण सांगते. याला पुरणाची पोळी खूपच आवडायची. रोज करून देण्यासाठी हट्ट करी. आजी ती रोज करूनही देई. एक दिवशी तिने करून नाही दिली म्हणून हा खूप हट्ट करून रडू लागला. ती चिडली. ‘थांब, पाहिजे नं तुला पुरणाची पोळी? आत्ता देते!’ म्हणून तिने चुलीत सराटा घालून तापवला व याच्या गालाला लावला. हा खूप रडायला लागला. तीही नंतर ‘आईविना पोराला मी लासवलं’ म्हणून रडू लागली.
ताईआत्या सांगते की, गालाचा फोड बघून सगळे विचारायचे, पण याने कधीच कुणाला सांगितलं नाही की, ‘आजीने चटका दिला.’
आजोबा सतत कीर्तनं व निरनिराळे उत्सव या निमित्ताने फिरतीवर राहायचे. त्यांच्या परतीची वेळ जवळ आली की, सगळ्या घराच्या आनंदाला पारावार नसे. ते लवकर परत यावेत, म्हणून हा दाराच्या कोयंड्यात सराटा घालून ठेवत असे.
आजोबा गावात आलेत याची खूण म्हणजे, त्या दिवशी व ते असतील तितके दिवस घरात संध्याकाळी कंदील लागत असे. नाहीतर हे घर चिमणीवरच काम भागवायचं. तसंच ते घरी असले म्हणजे स्वैपाकात पोळी होत असे व सणासुदीचा दिवस असेल तर त्यांना आवडतो म्हणून भात.
रोजच्या जेवणात भात लग्नानंतर आईने सुरू केला म्हणून याला मिळायला लागला. चप्पल पहिल्यांदा याने अमरावतीला कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली, तेव्हा घेतली. आणि नागपूरला एम.ए.साठी अॅडमिशन घेतली, तेव्हा पहिली पँट घालायला शिकला. बी. ए.पर्यंत याने पायजाम्यावरच काम चालवलं.
कॉलेजला अॅडमिशन घेतल्यावर सगळं सामान घेऊन अचलपूर सोडायच्या दिवशी याने आजोबांकडे छत्री मागितली. आजोबा याला खूप रागावले, ‘हे सगळे श्रीमंती चोचले तुला कशाला हवेत?’ वगैरे वगैरे. संध्याकाळी हा सगळ्या मित्रांचा निरोप घ्यायला म्हणून फिरायला गेला. रात्री घरी उशिरा परतला. परत आला, तेव्हा याच्या बांधून ठेवलेल्या सामानातल्या गादीच्या वळकटीवर डोकं ठेवून, याची वाट पाहत आजोबा बैठकीत जमिनीवरच झोपून गेले होते व याच्या सामानाच्या ढिगावर एक नवीन छत्री ठेवलेली होती.
याचा आवाज लहानपणापासूनच चांगला होता. एकदा असंच घरात कुठेतरी गाताना आजोबांनी मागून ऐकलं. ‘तुझा आवाज चांगला आहे. गाणं शीक, म्हणाले. याला घेऊन बैठकीत आले, पेटी काढली, स्वतः वाजवायला बसले व याला ‘आता गा’ म्हणाले. आजोबा स्वतः पेटी व पायपेटीही चांगली वाजवायचे. संगीत नाटकांना पायपेटीवर साथ करायचे.
नकलाही हा लहानपणी चांगला करायचा. अजूनही करतो. विशेषत: बोलण्याच्या ढबीच्या. आपल्याला सहसा लक्षात न येणाऱ्या खुबी याने नक्कल केल्यावर जाणवतात.
आजोबांची नक्कल करता करता हा कीर्तनही शिकला. लहानपणी याला ठिकठिकाणी बोलावून घेऊन जाऊन कीर्तन करायला लावायचे. वक्तृत्वाचं याचं करीयर असं कीर्तनापासून सुरू झालं आहे. नंतर सुदाम देशमुख या कट्टर, निष्ठावंत कम्युनिस्ट व जनसेवेला वाहून घेतलेल्या अमरावती भागातल्या मोठ्या लोकनेत्याच्या सभेची सुरुवात करायला हा गाणी म्हणायचा. सुदाम देशमुखांनीच याला पुढे सभेत भाषणं करायला लावून, याच्यातल्या वक्त्याला समोर आणलं.
बाकी तसाही साहित्य-कलाक्षेत्रांत हा ‘उद्योगी’ लहानपणापासूनच होता. लहानपणी हा ‘प्रकाश’ नावाचं हस्तलिखित मासिक चालवायचा. हस्ताक्षर सुरेख असल्यामुळे हस्तलिखित अर्थात याचं स्वत:चंच असायचं. साहित्याची कमतरता असेल तेव्हा याच्याच ‘एकटाकी’ लिखाणानंही अंक भरत असे. एक ‘कलामंडळ’ही हा चालवत असे. या हस्तलिखित मासिकाचं व कलामंडळाचं ऑफिस म्हणजे आमचं माळवेस पुऱ्यातलं राहतं घर. असा ऑफिसचा पत्ता लिहिलेली काही कागदपत्रं व एक-दोन अंकांची मुखपृष्ठं मला अचलपूरच्या जुन्या आलमारीत एकदा साफसफाई करताना सापडली, तेव्हा खूप छान वाटलं. अमरावतीला विदर्भ महाविद्यालयात शिकतानाही हा वाङ्मय मंडळाचा अध्यक्ष नेहमी असायचा. ‘वार्ताविपर्यास’ हे हा काढत असलेलं विनोदी दैनिक व भावविपर्यास’ हा सादर करत असलेला गाण्याचा कार्यक्रमही त्या काळात ‘स्नेहसंमेलना’ची वैशिष्ट्ये असत.
असंही नाही की, हा कधीच चिडत नाही. एरवी ‘सॉफ्ट’ बोलतो पण तत्त्वाला मुरड घालण्याची गळ कुणी घालू लागलं, याला आदरणीय असलेल्या व्यक्तींविषयी तात्त्विक विश्लेषणाऐवजी उगीचच हेटाळणीसारखी टीका कुणी करू लागलं, आयोजकांनी कार्यक्रमाला अकारण उशीर केला, निष्काळजीपणा दाखवला, की याचा आवाज चढतो, हात थरथर कापतात, संपूर्ण अस्तित्वानिशी पोटतिडकीने याचे वाग्बाण बरसू लागतात.
एरवी लहानसहान कारणांनी किंवा कधी कधी विनाकारण त्याची चीड अंगावर घेण्याचे ‘एक्सक्लुझिव्ह प्रिव्हिलेजेस’ त्याने फक्त मी व आई यांच्यासाठी राखून ठेवले आहेत. आम्हा दोघांशिवाय या दुर्मिळ ‘चिजे वर या जगात आणखी कुणाचाच हक्क नाही.
अमेरिकेत कॅनसास सिटीमधल्या व्याख्यानानंतर आयोजकांनी आम्हाला जेवायला नेलं. गांधींमुळे प्रभावित झालेला व तशा ग्रामशेतीचे टेक्सासमध्ये प्रयोग करत जगणारा एक भारतीय माणूस आमच्याबरोबर जेवायला होता. आयोजकांपैकी आम्ही ज्याच्या घरी उतरलो होतो, तो गृहस्थ संघाचा होता. याच्या सावरकर, चाणक्य या भाषणांवरून हाही संघाचाच असावा, अशी कल्पना होऊन तो गृहस्थ गांधींची हेटाळणी करू लागला. त्या वेळी ज्या पद्धतीने शांत राहून, पण स्पष्ट व तीक्ष्ण पद्धतीने याने त्याला सुनावून दिले, ते पाहण्यासारखं, ऐकण्यासारखं होतं. आपण परदेशात, त्याच माणसाच्या घरी उतरलेलो, त्याच लोकांनी कार्यक्रम आयोजित केलेला, प्रत्येक बाबतीत आपण त्यांच्यावरच अवलंबून असं परदेश वास्तव्यातलं ‘टिपिकल डिपेंडंस’, पण या कशाचाही याच्यावर परिणाम न होता, हा लगेच लढा घ्यायला तयार झाला आणि तेही जणू तो गृहस्थ आपल्या देशात, आपल्याच घरी उतरला आहे, अशा ‘कंफर्ट’ने.
लढे घेण्याची याची खुमखुमी काही मला नवीन नाही. याच्या पेशन्सची हद्द संपली की, हा आधी शांत होतो. ही प्रचंड मोठ्या वादळापूर्वीची शांतता असते. मग सगळ्या परिणामाची पूर्ण तयारी असल्यासारखी शांतता व तेज याच्या संपूर्ण अस्तित्वभर भिनतं व हा जिद्दीने ‘लढ्या’ला सुरुवात करतो.
मग उद्धव बांदुरकर प्रकरणाचा दिवसभर चाललेला घेराव असो, की, हीन पातळीवरची कम्युनिस्टांनी घेतलेली ‘निषेध सभा’ असो, याची प्रशांत वृत्ती यत्किंचितही ढळलेली मला कधी दिसली नाही.
आणीबाणी जाहीर झाल्यावर हा कमालीचा अस्वस्थ झाला. आतमध्ये धुमसत काय करता येईल, याचा विचार करत, जे काही समोर येईल, ते करत गेला. मग पन्नालाल सुराणांची किंवा एस.एम.जोशींची भूमिगत कामे, त्यांच्या भेटी, घरी उतरणं, कार्यकर्त्यांच्या भेटी, छुप्या बैठकी आयोजित करणं, छुप्या पत्रकांचे वाटप, छात्र युवा संघर्ष वाहिनी, तरुण शांत सेना, राष्ट्र सेवा दल, सर्वोदय अशा अनेक कार्यकर्त्यांना एकत्रित करणं, प्रभाकर शर्मांनी आत्मदहन केलं, त्याची सर्वोदय कार्यकर्त्यांनी काढलेली बुलेटीन्स सरक्युलेट करणं, जन्मभर याच्याशी न पटलेल्या संघाच्या कार्यकर्त्यांचंही काही भूमिगत कार्य चाललं असेल, तर त्याला शक्य ती मदत, असं याचं चाललेलं असे.
मग साहित्यिकांनी आणीबाणी उठवण्याबद्दल राष्ट्रपतींना जाहीर आवाहन करणार एक पत्रक पाठवायचं व सगळ्या सरकारी समित्या, पदांचे राजीनामे द्यायचे, अशी मोहीम याने ठरवली. त्याप्रमाणे पत्रक लिहिलं. प्रती जप्त होऊ नयेत, म्हणून चोरून सायक्लोस्टाईल केल्या, याने स्वत:ची सही केली, सगळ्या समित्यांचे व पदांचे राजीनामे दिले व सह्या गोळ्या करण्यासाठी गावोगाव, दारोदार फिरला. काहीबाही निमित्तांनी सह्या टाळणं, याची नजर व भेटच टाळणं अशा आत्यंतिक निराशाजनक अनुभवांनी अत्यंत व्यथित झालेल्या याला तेव्हा मी पाहिलं. ही व्यथितता नुसत्या सह्या न मिळण्याच्या निराशेची नव्हती, पण आदर्श म्हणून जपलेल्या कित्येक मोठ्या माणसांच्या वास्तवातल्या भित्र्या मनोवृत्तीच्या अनुभवामुळे आलेल्या ‘डिसइल्युजनमेंट’ची होती. आणीबाणी उठल्यावर शूरवीरासारख्या भाषणं देणाऱ्या व जाहीर विधानं करणाऱ्या अनेक साहित्यिकांच्या ‘शुद्ध’, ‘अंतरंग-दर्शनाचा’ अनुभवही या निमित्ताने मला लहानपणीच मिळाला.
याचा व्हायचा तो परिणाम झाला. जिल्ह्याच्या अटक करण्याच्या यादीमध्ये याचं नाव आलं. यवतमाळला मामा वकील असल्याने कलेक्टर ऑफिसमधून त्यांना ते कळलं. आजी, आजोबा यांची आईच्या माहेरी प्रचंड चिंता व काळजी सुरू झाली. त्यांनी मामाला याला समजावयास म्हणून पाठवलं.
याचं मन काही बदललं नाही, ते शक्यही नव्हतं.
मला त्या वेळेस हा जेलमध्ये जाण्याची भीती अथवा चिंता वाटत होती का? बहुधा नाही. उलट हा ‘हीरो’ वाटून बरंच वाटत
होतं.
कॉलेजची ‘गव्हर्निंग बॉडी’ पूर्ण काँग्रेसची होती. आणीबाणीत याच्या कारवायांनी किंवा निवडणुका जाहीर झाल्यावर ‘माणूस’मध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीने संचालकांमध्ये अस्वस्थता पसरायची, विचारणा व्हायच्या. आणीबाणीत राजीनाम्यापर्यंत प्रकरण नाही आलं, पण त्या आधी व एकदा त्यानंतर काही गोष्टी निकरास जाऊन, याने दोनदा नोकरीचा राजीनामाही दिला होता.
पुढे काय करायचे, काहीच निश्चित नाही. हातात काहीच नाही, गाठीला त्या महिनाभर पुरतील एवढेही पैसे नाही. अशा वेळेसही तत्त्वाचा प्रश्न निर्माण झाल्याबरोबर हा निर्णय घेऊन मोकळा झाला होता. पण आईची त्या वेळेसची तीव्र चिंता व भेदरलेली अवस्था मला आठवते. मला स्वत:लाही तेव्हा ‘असुरक्षितते’चं फीलिंग आलेलं आठवतं.
विचार न करता प्रवृत्ती’च्या हाकेला धावून जाण्याचा आणखी एक मनात रुतून बसलेला लहानसा प्रसंग या संदर्भात मला आठवतो. त्या वेळी दरोडे घालणारी एक टोळी त्या भागात फिरत होती. एकदा उन्हाळ्यात बाहेर झोपलो असताना रात्री दोन वाजता बाजूला नगरवाल्यांच्या घरून ओरडण्याचा आवाज यायला लागला. अगदी बाहेर, आजूबाजूला मोकळ्या जागेत आमची दोनच घरं अशी ही ‘सिच्युएशन’ होती. हा झटक्यानेच उठला. आईला घरातून काठी आणायला सांगितली, मला उठवलं व मला घेऊन पळतच तिकडे गेला.
आलेले दरोडेखोर संख्येने किती असतील, काय परिस्थिती असेल, याची तमा न बाळगता मी अगदी दहा-बारा वर्षांचाच असतानाही मलाही सोबत घेऊन, ‘प्रसंगाला धावून जाणं’ या आपल्या मूल्यापायी तो स्वत:सकट आपल्या लहान मुलाचीही कुर्बानी द्यायला, काहीही विचार न करता तयार झाला होता..
याचा ‘लेटेस्ट’ लढा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई साहित्य संमेलनाच्या वेळी साहित्यिकांबद्दल अपमानास्पद विधाने केल्याने (शासनाची मदत, अनुदानं या संदर्भात) याने युती शासनाची अशीच भूमिका असेल तर असहकार म्हणून सगळ्या सरकारी समित्यांचे व पदांचे राजीनामे पाठवून दिले.
राजीनामा देणे हा याचा शौकच असावा का? मागे साठ वर्षांचा झाल्यावर याने असाच विदर्भ साहित्य संघापासून, सगळ्याच सार्वजनिक संस्थांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि बहुधा ‘न बदलवण्याचा निर्णय’ आधी घेऊनच मग हा निर्णय घेत असावा. कारण नंतर कित्येकांनी कितीतरी प्रयत्न करूनही, याने दिलेला राजीनामा कधीच परत घेतला नाही.
कुठलाही सन्मान, पद किंवा कोणत्याही स्वत:च्या कामासाठी याला कुणाकडे शब्द टाकताना मी जन्मात पाहिलं नाही. सगळ्याच क्षेत्रातल्या थोरामोठ्यांशी याचे नेहमीच जवळचे संबंध होते. राजकारण्यांशीही होते. चार मुख्यमंत्री तर घरी भेटायला येणाऱ्यातले होते, पण स्वत:साठी किंवा स्वत:च्या कुटुंबीयांसाठी याने कधी कुणाकडे काही मागितलं नाही.
असं असायचं होतं, तर मग निदान कुणासाठीच नाही मागायचं व ती शेखी मिरवत तरी जगायचं, पण तेही नाही. संस्थांची, कार्यकर्त्यांची, आपसातल्या लोकांची, लोक सांगतील ती कामे हा बिनदिक्कतपणे ओळखीच्या मोठ्या लोकांना सांगत असतो.
एकदा तर कुणी आपसातल्या व्यक्तींनी ‘लोकमत’मध्ये प्रूफ रीडर असलेल्या त्याच्या नातेवाइकाची बदली करावी, त्याचे साहेब लोक त्याला त्रास देतात, हे विजय दर्डांना सांगावं असा याच्या मागे लकडा लावला. यानेही तसा फोन लावून लगेच त्या रात्रीच (अगदी लक्षात ठेवून) तसं सांगितलंही. मलाच ते ऐकताना मेल्याहून मेल्यासारखं झालं.
ग्रामसेवक पदाच्या बदलीपासून ते ‘पद्मश्री’ मिळण्यासाठी प्रयत्न करावा इथपर्यंतची कामं लोक याला सांगत असतात व ‘अटलजी तुमचं म्हणणं टाळूच शकणार नाहीत’, अशा प्रकारचा एक भाबडा भावही बाळगून असतात. हाही ती कामं होतील, न होतील त्याची तमा न बाळगता, याला शक्य आहे तेवढं बिनदिक्कतपणे करून मोकळा होत असतो.
प्रस्तावना लिहून द्या म्हणून मागे लागणारे लहानमोठे लेखक, कवी, वन टाईम लेखकही याच्या सतत मागे लागलेले असतात. आणि हाही कुणालाही नाही न म्हणता, सगळ्यांना प्रस्तावना लिहून देत असतो. लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कुणी जास्ती प्रस्तावना लिहिल्यात यासाठी याच्यामध्ये व कुसुमाग्रजांमध्ये चढाओढ होती की काय, माहीत नाही. पण दोघांचंही नाही न म्हणण्याचं व प्रस्तावना लिहून देण्याचं वेड सारखंच.
आणि मग ‘प्रकाशनालाही तुम्हीच हवे’ हा आग्रह नंतर ओघाने येतोच. हा भिडस्तपणे कबूलही करणार, नंतर येणारी मोठी निमंत्रणेही आधीची कमिटमेंट म्हणून नाकारणार. कुठेही आडगावी कार्यक्रम असला तरी ओढाताण करीत वेळेवर पोचणार.
मला कधी कधी प्रश्न पडतो, ‘खरं बोलणं’ हे मूल्य म्हणून याने जन्मभर पाळलं. मग अशा प्रस्तावनांमध्ये लिहावा लागणारा किंवा अशा समारंभांमध्ये बोलावा लागणारा खोटेपणा याला कसा काय चालतो?
तरी हा अशा प्रसंगांत शक्य तितकं परखड बोलत असतो. तरीपण शिष्टाचाराच्या मर्यादा ‘सत्याला मुरड’ घालतातच. उदाहरणार्थ, एखाद्याचं साहित्य अगदीच टाकाऊ, बालीश व केवळ लेखक म्हणून मिरवण्याच्या सोसापायी लिहिलं गेलं असेल, तरी हा ‘अभ्यासाची बैठक अजून अधिक वाढवायला हवी, विचारांची खोली व भावनांची तीव्रता येईपर्यंत वाट पाहावी, प्रगटीकरणाची घाई करू नये. तरीही प्रयत्न कौतुकास्पद आहे, अशा प्रयत्नांतूनच पुढे दिशा मिळत जाते,’ असं काहीतरी लिहील व बोलेल.
हा मूळ कुठल्या विचारधारेचा आहे ?
हा सगळ्यांशीच मिळवून घेतो, याला पक्का विचार, किंवा निष्ठा अशी नाहीच असा आरोप याचे विरोधक याच्या अशा ‘मिळवून घेण्याच्या स्वभावामुळे करत असतात.
याच्या मूळ विचारधारेचा माझा याच्याबाबतचा शोध मला काय सांगतो? शाळकरी वयात हा सुदाम देशमुख या वाहून घेतलेल्या कम्युनिस्ट माणसामुळे भारावला गेला होता. त्याच्या सभा, त्याची कामं करायचा.
मग कॉलेजच्या वयात हा विद्यार्थी काँग्रेसची कामे करायचा व गांधी, सुभाषचंद्र बोस व नेहरू यांनी प्रचंड ‘इनफ्लुएन्स्ड’ होता.
गांधीहत्येनंतर ब्राह्मणांवर प्रचंड संकटं आली. कुटुंबच्या कुटुंब देशोधडीला लागली. त्यावेळेस बहुतेक ब्राह्मण कुटुंबं संघाची झाली, संघाच्या प्रवाहामध्ये सामील झाली.
पण याच्यावर याचा उलट परिणाम झाला. गांधीहत्येमुळे संघाविषयी याच्या मनात इतका तिटकारा निर्माण झाला की, तो पुढे अठ्ठावीस वर्षे टिकला. शेवटी आणीबाणीमध्ये हा संघाविषयी थोडा ‘सॉफ्ट’ झाला..
स्वातंत्र्यानंतर एकोणिसशे सत्तरपर्यंत हा काँग्रेसचाच होता व नियमितपणे बैलजोडी किंवा गायवासरू यांना मत देत असे, हेही मला आठवतं.
पण काँग्रेसच्या राजकीय नेतृत्वापेक्षा, गांधींचे उत्तराधिकारी म्हणून विनोबांकडे याचा कल जास्त. सर्वोदय, आचार्यकुल ही कामे करण्यात हा स्वत:ला वाहून घेत असे. काँग्रेसशी त्याचा संबंध फक्त दर पाच वर्षांनी मत देण्यापुरता उरला होता.
सत्तरनंतरच्या जयप्रकाशांच्या आंदोलनानंतर हा अधिक अस्वस्थ झाला. विनोबा व जयप्रकाश या दोन श्रद्धास्थानांमध्येच दुफळी निर्माण झाल्याने हा अचंबित, अस्वस्थ व दु:खी झाला होता.
याच काळात इतर समाजवादी संघटनांशी, छात्र युवा संघर्ष वाहिनी, राष्ट्र सेवा दल, तरुण शांती सेना, ‘साधना’ परिवार, कथामाला, आंतरभारती यांची जवळीक अधिक वाढली.
७५ च्या आणीबाणीनंतर हा पूर्णपणे काँग्रेसविरोधी झाला. विनोबांच्याही यावरच्या चुप्पीमुळे मनातून अत्यंत अस्वस्थ, पण विनोबांवरच्या अती श्रद्धेपायी ‘मूग गिळून’ अस्वस्थ व चूप राहणं, अशी याची प्रतिक्रिया झाली.
७७ ते ८५ या काळातल्या सगळ्या घडामोडींनंतर, सगळ्या समाजवादी संघटनांविषयीही याला निराशा आली, पण जन्मभर पाळलेल्या निष्ठा व विचारधारांमुळे कसेतरी फरफटत अजूनही त्याच कार्यात तो स्वत:ला गुंतवून ठेवतो.
८५ नंतर जे जे काम स्वत:ला भावलं, त्या मागच्या संघटनेचा विचार न करता त्यासाठी स्वत:ला झोकून देणं, होईल ती मदत करणं व निवडणुका येतील तेव्हा पक्ष न पाहता जो सर्वांत योग्य उमेदवार असेल, त्याला मत टाकणं, असा हा जगतो आहे.
स्वप्नभंगानंतरही चांगुलपणा असलेला माणूस जे शक्य आहे, जेवढं शक्य आहे, जसं शक्य आहे, तेवढं करतच शेवटपर्यंत जागेवर टिकून असतो, शक्ती आहे तोपर्यंत लढतच असतो, तसं याचं हे ‘जगणं’ आहे.
याचं हार्टचं दुखणं उद्भवलं, तेव्हा पहिल्या हॉस्पिटलायझेशनच्या वेळेस हे दुखणं आहे हे कळल्यावरही हा तसा शांतच होता.
बाय-पास सर्जरीचं ठरलं, तेव्हाही हा शांतच होता. धीरोदात्तपणे यानं आपली सगळी कामं, सगळ्या कमिटमेंट्स आटोपल्या. ‘सगळी परिस्थिती पाहता मी परत येणार हीच शक्यता जास्त, पण तसं नाहीच झालं तर तयारी असावी म्हणून माझ्या राहिलेल्या इच्छांचं पत्र लिहून ठेवतो आहे, नंतर ते वाचा,’ असं मला व आईला सांगितलं. ऑपरेशनसाठी जाताना स्ट्रेचरवर पडल्यापडल्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर माझ्या चेहऱ्यावर हात फिरवत याने मलाच धीर दिला. हा प्रसंग आधी कधी वा आत्ताही कल्पनेत आणला, तर आपल्याला सहन करणं शक्यच नाही, असं वाटतं. पण त्या वेळी धीर होता. कुठून येतो माहीत नाही. ईश्वर देतो की मनाचं ‘डिफेन्स मेकॅनिझम’ हे करतं? माहीत नाही.
ऑपरेशनच्या आधी व नंतरही याला हॉस्पिटलमध्ये भेटायला येणाऱ्यांची सतत रीघ लागलेली असायची. अनेक मोठी माणसं रोज भेटायला यायची. मंगेशकरांकडून आम्हा कुटुंबीयांना रोज डबा यायचा, काही काम पडेल म्हणून गाडी व ड्रायव्हर यायचा.
ऑपरेशन सुरू असताना बाहेर नानाजी देशमुख, न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी, सौ. भारती मंगेशकर बसले होते. आई खोलीत पोथी वाचत बसली. मी खाली हॉस्पिटलच्या मंदिरात जाऊन ध्यान करत बसलो. कधीतरी माझ्यामागे येऊन राजदत्तही ध्यान करत बसले.
ऑपरेशन यशस्वी झाल्याचा निरोप आला. लिफ्ट लवकर येत नव्हती, म्हणून मी धावतच सात मजले चढत खोलीत गेलो. आई तिथे नव्हती, खाली गेली होती. पुन्हा धावतच खाली आलो. आई नानाजींच्या मांडीवर डोकं ठेवून रडत होती.
मी आल्यावर माझ्या गळ्यात पडून रडायला लागली. मी तिला शांत करत होतो, पण नंतर सगळ्यांच्या पाया पडलो, तेव्हा प्रत्येकाने जवळ घेतल्यावर जवळपास प्रत्येकाजवळ भडभडून रडलो. शेवटी राजदत्तांनी मला शांत केलं.
बरा होऊन आल्यावर आम्ही याने लिहून ठेवलेलं पत्र वाचलं. ‘घराण्याला वंशज व सांस्कृतिक संकुल बांधून पूर्ण व्हावं’, याशिवाय यात दुसऱ्या कुठल्या इच्छा लिहिलेल्या नव्हत्या.
ईश्वराने असा बाप कुणाला, अगदी वैऱ्यालासुद्धा देऊ नये. दिलाच तर त्याला म्हातारा करू नये. पोरावरही बापाला खांद्यावरून नेण्याचं दुर्भाग्य येऊ नये. दोघांनाही एकदम न्यावं
याची अशी आजारपणं व त्यांना न जुमानता चाललेले याचे हे सततचे दौरे पाहून म्हणावंसं वाटतं, अरे असं जाण्यासाठी उतावीळ असल्यासारखा का वागतोस? जरा थांब. स्वत:साठी नाही तर, माझ्यासाठी थांब. माझं काहीतरी बघून जा. अरे, हे माझं काहीच कर्तृत्व नव्हतं. पैसा, नाव, लक्झुरीज हे तर माझ्या वरवरच्या कॉप्लेक्सेसपायी माझ्या हाताने झालं. खरा ‘मूळ मी’ हा नाही.
तुला नाही तर कुणाला दाखवू तो? आजोबांनी माझं काहीच पाहिलं नाही. तूही माझं काहीच पाहिलं नाहीस, हे असमाधान देशील आयुष्यभर?
खरा ‘मी’ आता तर कुठे जमिनीतून वर यायला लागलो आहे. आत्ता तर कुठे कोंभ, एखाददुसरं पान फुटायला लागलंय. त्याचा वृक्ष होईपर्यंत थांबू नकोस, पण वृक्ष व्हायला निघालेली झेप पाहीपर्यंत तर थांब. तोपर्यंत तर सावली धर

आशुतोष शेवाळकर,
नागपूर.

Leave a Reply