संपादकीय संवाद – हे सर्व बघता महाआघाडीच्या काही खरे नाही

शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आणि सध्या ईडीच्या तडाख्याने त्रस्त झालेले आ. प्रताप सरनाईक यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून भाजपशी पुन्हा जुळवून घेण्याचा सल्ला दिल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. याचसोबत त्यांनी ज्या शरद पवारांच्या चाणक्य नीतीने शिवसेनेचा मुख्यमंत्री बनला त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवरही शिवसेनेचे सदस्य फोडत असल्याचा आरोप केल्यामुळे आता महाविकास आघाडी टिकणार की कोसळणार अशी स्थिती निर्माण झाली आहे.
वस्तुतः महाराष्ट्रात जी महाआघाडी बनली तीच मुळात अनैसर्गिक होती जे तीन पक्ष परस्परांच्या विरोधात लढले होते, ज्यांचे कार्यक्रम, विचारधारा, हे सर्वकाही भिन्न होते, तरीही केवळ सत्तेचे लोणी मटकावण्यासाठी आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आले होते त्यातही शिवसेना आधी भाजपसोबत लढली होती त्यावेळी एकत्र सरकार बनविण्याचा वादा केला होता मात्र भाजपला जागा कमी पडत आहेत हे बघून शिवसेनेने पलटी मारली आणि भाजपचा साथ सोडून या दोन भिन्न विचारसरणीच्या पक्षांसोबत अभद्र शय्यासोबत केलीय,शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जाणे पक्षातील अनेक निष्ठावंतांनाही पटले नव्हते मात्र सत्तेचा मोह आडवा आला, आणि या निष्ठावंतांनी नांगी टाकली.
या प्रकरणात शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांनी एकत्र येत भाजपच्या तोंडचा घास पळवला त्यामुळे भाजप दुखावणार हे निश्चित होते. केंद्रातही भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे,त्याचसोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोनही पक्ष काही धुतल्या तांदळासारखे स्वच्छ नाहीत त्यामुळे साहजिकच भाजपने आणि केंद्र सरकारने कडक भूमिका स्वीकारणे हे ओघानेच आले. त्याचा फटका आता सर्वानाच बसतो आहे,प्रताप सरनाईक हेदेखील त्यातील एक भुक्तभोगी म्हणता येतील. अजूनही अनेकांचा नंबर यात लागू शकतो त्यामुळे सर्वच धास्तावलेले आहेत. म्हणूनच प्रताप सरनाईकांनी बहुसंख्य पीडितांची व्यथा उद्धवपंतांसमोर मांडलेली दिसते आहे.
सरनाईकांनी तोंड उघडले हे चांगलेच झाले मात्र त्यांनी बराच उशीर केला आहे, वस्तुतः सरनाईकांसारख्या निष्ठावंत शिवसैनिकांनी त्याचवेळी उद्धवपंतांना आणि संजय राऊतांना विरोध केला असता तर कदाचित ही अभद्र युती होणे टळू शकले असते मात्र त्यावेळी सर्वानाच सत्तेचा मोह होता. आता सर्वांना देव दिसत आहेत
आज उद्धवपंतांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करायचे जरी ठरवले तरी भाजप कसा प्रतिसाद देईल हाही यात कळीचा मुद्दा राहणार आहे. भाजपतील बहुसंख्यांना आता शिवसेनेशी युती नको आहे जे पक्ष दगलबाजी करतात त्यांच्यासोबत का जायचे? हा प्रश्न पक्षात विचारला जातो आहे. अश्या परिस्थितीत शिवसेनेने मैत्रीची याचना केलीही तरी भाजप कितपत प्रतिसाद देईल याबाबत सर्वच साशंक आहेत. अश्यावेळी शिवसेनेची अवस्था तेलही गेले आणि तूपही गेले अशी होऊ शकते हा धोकाही लक्षात घ्यायला हवा.
सध्या महाआघाडीतील एक घटक पक्ष असलेला काँग्रेस पक्ष स्वबळासाठी वारंवार दंड थोपटतो आहे या पक्षातील दिग्गज महाआघाडीतून केव्हाही बाहेर पडू शकतात. त्यामुळे महाआघाडी धोक्यात येऊ शकते. हे सर्व बघता महाआघाडीचे आता खरे नाही असे म्हणावेसे वाटते.

अविनाश पाठक

Leave a Reply