वाघ शिकार प्रकरणात ८ आरोपींना अटक

यवतमाळ : २० जून – यवतमाळ जिल्हय़ातील मारेगाव आणि मुकूटबन वनपरिक्षेत्रात मार्च आणि एप्रिल महिन्यांत वाघाच्या शिकारीच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या. या प्रकरणी पोलीस आणि वन विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल आठ आरोपींना अटक करण्यात आली. या कारवाईने वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्या मोठय़ा टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.
मारेगाव वनपरिक्षेत्रामध्ये २३ मार्च रोजी सोनेगाव शिवारात एका नाल्यात पट्टेदार वाघ मृत आढळला होता. प्रथमदर्शनी काटेरी तारेत अडकून वाघाचा मृत्यू झाल्याची शंका होती. मात्र तपासाअंती या वाघाची शिकार केल्याचे स्पष्ट झाले.
पांढरकवडा वन व वणी उपविभागीय पोलीस पथकाने संयुक्त तपास करून झरी तालुक्यातील येसापूर येथून तीन आरोपींना अटक केली. दौलत भीमा मडावी, मोतीराम भितु आत्राम, प्रभाकर महादेव मडावी अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्या घरातून वन्यप्राण्यांचे मांस आणि शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले.
याच पथकाच्या दुसऱ्या कारवाईत मुकूटबन वनपरिक्षेत्रात २५ एप्रिल रोजी गुहेच्या तोंडाशी जाळून मारलेल्या वाघिणीच्या शिकार प्रकरणात पाच आरोपींना झरी तालुक्यातील वरपोड येथून अटक केली.
या आरोपींमध्ये नागोराव भास्कर टेकाम, सोनू भवानी टेकाम, गोली रामा टेकाम, बोनू तुकाराम टेकाम, तुकाराम भवानी टेकाम यांचा समावेश आहे.
ही कारवाई पांढरकवडा वनविभागाचे उपवनसंरक्षक किरण जगताप यांच्या मार्गदर्शनात सहायक वनसंरक्षक एस. आर. दुमारे, विक्रांत खाडे, वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वारे, माधव आडे, रणजित जाधव, संगीता कोकणे, तुळशीराम साळुंखे, सुनील मेहरे, आशिष वासनिक, मुकूटबवन ठाण्याचे पोलीस निरक्षक सोनूने सहायक पोलीस निरीक्षक संगीता हेलोंडे आदींनी केली.

Leave a Reply