लॉकडाऊनमध्ये स्वतःच्याच घरात २० फूट खोल विहीर खणली

वाशिम : २० जून – वाशिम जिल्ह्यातील एका दाम्पत्यानं लॉकडाऊनचा सदुपयोग केला आहे. वाशिममधील एका व्यक्तीनं पाण्याच्या तुटवड्याची समस्या सोडवण्यासाठी स्वतःच्याच घरात 20 फूट खोल विहिर खोदली. ही विहिर केवळ 22 दिवसांत खोदली गेली आहे. ही विहिर अजूनही खोल केली जाणार आहे. आता केवळ घरातीलच नाही तर गावातील सगळ्यांच लोकांना पाणी मिळण्यास मदत होईल. ही विहिर खोदण्याचं काम केलं आहे, कुटुंबातील तीन सदस्यांनी.
हे काम करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे रामदास फोफले. वाशिम जिल्हा हा तसा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. रामदास फोफले यांच्या गावात पाण्याचा मोठा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे, या समस्येवर मार्ग शोधण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यांनी ही गोष्ट आपल्या पत्नी आणि मुलाला सांगितली. या दोघांनीही रामदास यांना संपूर्ण साथ दिली. 22 दिवसात 20 फूट खोल जमिनीत घरामध्येच एक विहिर खोदण्यात आली. या विहिरीत पाणीही आहे. आज घरातील पाण्याचा तुटवडा दूर झाला आहे. या कुटुंबानं आता असं ठरवलं आहे, की ते संपूर्ण गावाची तहान भागवणार आहेत. ही विहिर आता आणखी खोल केली जाणार आहे, जेणेकरुन घरच्यांसोबतच संपूर्ण गावाची तहान भागू शकेल.
रामदास फोफले यांनी सांगितलं, की या विहिरीला सध्या जितकं पाणी आहे, त्यात त्यांच्या घरच्यांची गरज भागू शकते. मात्र, गावातील पाण्याचा तुटवडा पाहता त्यांना गावकऱ्यांनाही मदत करायची आहे. रामदास फोफले लॉकडाऊनमध्ये घरीच होते, अशात त्यांना काही विशेष काम नव्हतं. यामुळे लॉकडाऊनमध्ये काहीतरी करायचं असं रामदास यांनी ठरवलं होतं. त्यांनी आपल्या पत्नीला आणि मुलाला याबाबतची कल्पना दिली आणि हे संपूर्ण कुटुंब या कामाला लागलं. 21 दिवसाच्या मेहनतीनंतर विहिरीत पाणी दिसताच या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. रामदास यांनी यासाठी आपल्या पत्नीचे आणि मुलाचेही आभार मानले आहेत.

Leave a Reply