धुऱ्याच्या वादातून पुतण्याने केली काकाची हत्या

नागपूर : १९ जून – ताराचे कुंपण व धुऱ्याच्या वादातून काकाची कुऱ्हाडीने हल्ला करून हत्या केल्याची धक्कादायक घटना एरंडा शेतशिवारात घडली. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना काटोल पोलिसांनी अटक केली आहे. अशोकराव बाबुराव गाढवे (वय ४0, रा. पारडसिंगा) असे मृतकाचे तर गोपाल मधुकर गाढवे (वय २९) व प्रफुल्ल मधुकर गाढवे (वय २७, दोघेही रा. पारडसिंगा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपी भावांची नावे आहेत.
मृतक अशोकराव हा आरोपींचा चुलत काका आहे तर दोन्ही आरोपी हे सख्खे भाऊ आहेत. मृतक व आरोपींची शेती एकामेकांच्या शेतीला लागून आहे. शेतातील तारेचे कुंपण व बांधाचा गेल्या काही दिवसांपासून वाद होता. घटनेच्या दिवशी गुरुवारी दुपारी हा वाद पुन्हा नव्याने समोर आला. यात आधी दोघांमध्येही तोंडातोंडी झाली. हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही आरोपींनी अशोक व त्याचा मुलगा हर्षल (वय १८) याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यात आरोपींनी कुर्हाडीने मृत अशोकच्या डोक्यावर मारून जखमी केले. अशोक जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ प्रथम ग्रामीण रुग्णालय, काटोल व नंतर हिंगणा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती काटोल पोलिसांनी देण्यात आली. याप्रकरणी काटोल पोलिसांनी आरोपींविरोधात भादंवि कलम ३0२, ५0४, ५0६ व ३४ अन्वये गुन्हा नोंद करून अटक केली.

Leave a Reply