कोरोना योध्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे पंतप्रधानांनी केले उदघाटन

नवी दिल्ली : १८ जून – देशातील कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी एक लाख कोरोना योद्धा निर्माण करण्यात येणार आहेत. या कोरोना योद्ध्यांना प्रशिक्षित करण्यासाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केलं. कोरोनाचं संकट रोखण्यासाठी या योद्धयांचा प्रचंड उपयोग होईल, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
देशातील 26 राज्यांमधील 111 ट्रेनिंग सेंटरमध्ये कोविड-19 हेल्थकेअर फ्रंटलाइन वर्कर्ससाठी ‘कस्टमाइज्ड क्रॅश कोर्स प्रोग्राम’ कोर्स तयार करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रशिक्षण कार्यक्रमाचा आज शुभारंभ केला. त्यावेळी संबोधित करताना त्यांनी ही माहिती दिली. आजपासून देशात एक लाख फ्रंट लाईन वर्कर्स तयार करण्याचं महाअभियान सुरू होत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हायरसचं बदलतं स्वरुप पाहिलं. त्यामुळे निर्माण झालेली आव्हानेही पाहिली आहेत. हा व्हायरस अजूनही आपल्यात आहे. तो पुन्हा म्युटेड होण्याची शक्यता आहे, असं मोदींनी सांगितलं.
कोरोना महामारीने समाज, विज्ञान, संस्था आणि व्यक्तिंना आपल्या क्षमतांचा विकास करण्यासाठी सतर्क केलं आहे. त्यामुळेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एक लाख कोविड योद्धे निर्माण केले जात आहे. त्यासाठी सहा नवे कोर्स करण्यात आले असून एक लाख तरुणांना शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हा कोर्स दोन ते तीन महिन्यात पूर्ण होणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
या प्रशिक्षणांतर्गत मोफत ट्रेनिंग देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थींना स्किल इंडियाचं प्रमाणपत्रं देण्यात येणार आहे. भोजन आणि राहण्याची सुविधा करण्यात आली आहे. तसेच प्रशिक्षणासोबत स्टायपेंड देण्यात येणार असून प्रशिक्षित योद्ध्यांचा दोन लाखांचा विमाही काढण्यात येणार आहे, असं ते म्हणाले.
राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांच्या गरजा लक्षात घेऊन हा कोर्स तयार करण्यात आला आहे. नर्सिंगशी संबंधित काम, सँम्पल कलेक्ट करणं, मेडिकल टेक्निशियन, नव्या उपकरणांची ट्रेनिंग आदी गोष्टींचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरुणांमध्ये स्किलिंग तयार करण्यात येणार आहे. ज्यांच्यात स्किलिंग आहे, त्यांच्यात अपस्किलिंग होणार आहे. त्यामुळे महामारीच्या काळात फ्रंटलाईन वर्क्सचा उपयोग करून घेण्यात येणार आहे. तसेच तरुणांसाठी रोजगाराची संधीही निर्माण होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply