डॉक्टर दाम्पत्याला एक कोटीची खंडणी मागणाऱ्या महिलेला पोलिसांनी केली अटक

नागपूर : १७ जून – आर्थिक स्थिती भक्कम असूनही एका महिलेने डॉक्टर दाम्पत्याकडे एक कोटींची खंडणी मागितली. सततचा कौटुंबिक वाद, पैशाची चणचण आणि वाढत चाललेल्या तणावामुळे खंडणीसाठी तिने शक्कल लढविली. दोन मुलांच्या जीवाच्या बदल्यात उपरोक्त रकमेची मागणी केली. मात्र, या प्रकरणात आरोपीचा कुठलाच सुगावा नसताना बेलतरोडी पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करीत खंडणी मागणाऱ्या महिलेला हुडकून काढले व गुन्हा नोंदवून तिला अटक केली. न्यायालयाने तिला १९ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
अटकेतील महिलेचा पती केंद्रीय कार्यालयात अधिकारी पदावर आहे. तिला दोन मुली असून, कनिष्ठ इयत्ता पाचवीत तर थोरली दहावीत शिकते. त्यांची आर्थिक स्थिती भक्कम आहे. मात्र, कुटंबात पैशांवरून नेहमीच वाद होत. खर्चासाठी जवळ पैसे नाहीत आणि सततचा वाद होत असल्याने ती तणावात रहायची. तिच्या डोक्यात विचारांची गर्दी होऊ लागली. अशातच तिने पैशासाठी शक्कल लढविली.
सोमलवाडा निवासी फिर्यादी तुषार पांडे आणि त्यांची पत्नी दोघेही डॉक्टर आहेत. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मनीषनगरात त्यांचे रुग्णालय आहे. खंडणी मागणारी महिला कोरोना काळात बाधित होती. तिने डॉक्टर पांडे यांच्याकडे उपचार केला. त्यामुळे तिला डॉक्टर दाम्पत्याविषयी संपूर्ण माहिती होती. डॉक्टरांचा व्यवसाय धडाक्यात सुरू असून चांगली रक्कम मिळू शकते असा तर्क तिने लावला.
दरम्यान, ती कोरोनातून बरी झाली. इकडे घरच्या परिस्थितीत कुठलाच बदल नव्हता. पैशासाठी भांडणे नेहमीचीच होती. त्यामुळे महिलेने शक्कल लढवून योजनेनुसार एक पत्र तयार केले. त्या पत्रात दोन मुलांच्या जीवाच्या बदल्यात एक कोटींची खंडणीची मागणी केली. कुरीअर मिळताच डॉक्टर दाम्पत्याच्या पायाखालची वाळू सरकली. भयभीत झालेल्या डॉक्टरने वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत यांना संपूर्ण प्रकार सांगितला. पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी तांत्रिक कौशल्याचा वापर करीत खंडणी मागणाऱ्या महिलेला अटक केली.
कुरीअर पाठविण्यात आले त्या ठिकाणापासून चारही बाजूंनी शोध घेण्यात आला. सीसीटीव्हीच्या पाहणीत एक संशयित महिला दुचाकीवर दिसली. तिच्या घरापर्यंत शोध घेण्यात आला. मनीषनगरात तिचे घर असल्याचे निष्पन्न झाले. नमूद क्रमांकाच्या दुचाकीचा शोध घेतला गेला आणि त्या आधारे महिलेला ताब्यात घेतले. गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता धक्कादायक माहिती पुढे आली.

Leave a Reply