मराठा आरक्षण आंदोलनात खा. धैर्यशील माने सलाईन लावून सहभागी

कोल्हापूर : १६ जून – कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. भर पावसात हे आंदोलन सुरू आहे. पण, या आंदोलनात सच्चा शिवसैनिकाची झलक पाहण्यास मिळाली. तब्येत ठीक नसताना हाताला सलाईन लावली होती, अशाही परिस्थितीत शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आंदोलनात सहभागी झाले.
खासदार धैर्यशील माने यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली आहे. पण, त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी धैर्यशील माने आपल्या गाडीत सलाईन लावून आंदोलन स्थळी पोहोचले.
मराठा समाजाचे आंदोलन संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली पहिले आंदोलन आहे. माझी तब्येत बरी नसली तरीही माझी नैतिक जबाबदारी आहे की आंदोलनात सहभागी झाले पाहिजे. शाहू महाराजांच्या भूमीत आज लढा दिला जात आहे. मराठा समाजासाठी लढा देण्यासाठी आम्ही कोणत्याही परिस्थितीत असलो तरी एकत्र येण्याची गरज आहे, म्हणून मी इथं आलो आहे, असंही धैर्यशील माने यांनी सांगितलं.
तसंच, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण लढा देत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आरक्षणासाठी मागणी केली आहे. आरक्षणासाठी लढा देण्यासाठी लोकसभेतही माझा आवाज बुलंद राहिल, अशी ग्वाहीही माने यांनी दिली.
दरम्यान, कोल्हापूरमध्ये आज मराठा आंदोलनाची ठिणगी पडली आहे. संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मूक आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पहाटेपासून शहरात पावसाने हजेरी लावली होती. सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले, त्यानंतर राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात केली.
पण, आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर पावसाला पुन्हा सुरुवात झाली. संभाजीराजे, प्रकाश आंबेडकर आणि सर्वपक्षीय नेते आंदोलनात सहभागी झाले आहे. समाथीस्थळासमोर हिरवळीवर संभाजीराजे यांच्यासह सर्व नेते खाली बसले आहे. तर समोर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आमदार आपली भूमिका मांडत आहे.
संभाजीराजे यांनी आधीच हे मूक आंदोलन आहे, असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आंदोलन संपेपर्यंत ते बोलणार नाही. दुपारी 1 वाजेच्या सुमारास संभाजीराजे जनतेला संबोधित करून आंदोलनाची पुढची दिशा काय असेल, याबद्दल भूमिका जाहीर करतील.

Leave a Reply