मनाच्या हिंदोळ्यावर

आनंदी मन

चेहऱ्यावरचे हावभाव सांगतात तुमचे मन कसे आहे ते, आनंदी आहे की दुःखी आहे. आपल्या चेहऱ्यावर जर गोड हसू असेल तर आपलं मन आनंदी असतं. ह्या गोड हास्याचे आपल्या मनाशी फार जवळचे नाते आहे. माणसाच्या चेहऱ्यावरील गोड हास्याने समोरच्या व्यक्तीवर प्रभाव पडतो, त्याच्या आयुष्यात ह्या क्षणांनी जर चार सुखाचे क्षण आले तर आपल्याला एक प्रकारची मिळालेली ती पोचपावती समजावी. आताच्या भाषेत return gift समजावे. जर मनच आनंदी नसेल तर गोड हसू कसे बरे येईल?
माझ्या मते, आनंदी व्यक्ती ही विनोदी असावी हे जरुरी नाही, त्याच प्रमाणे विनोदी व्यक्तीचे मन हे नेहमी आनंदी असायला हवे हे पण जरुरी नाही. चेहऱ्यावर हसू आले ही एखाद्या विनोदाला दिलेली प्रतिक्रिया असू शकते. चेहऱ्यावरचे गोड हसू हे आनंदी मनाचे द्योतक आहे.
आता प्रश्न हा की आनंद म्हणजे काय? आनंदाची व्याख्या ही आपल्या वयानुसार बदलत असते. लहान मूल पाळण्यात आपल्या आईच्या स्पर्शाला ओळखून चेहऱ्यावर आनंद व्यक्त करतो. एखाद्या लहान मुलाने चित्र काढले त्या चित्राचे कौतुक करताच त्याच्या चेहऱ्यावर लगेच आनंद दिसतो. एखाद्या गायकाची रंगलेली मैफिल प्रेक्षकाच्या टाळ्यांच्या कडकडाटाने त्या गायकाच्या चेहऱ्यावर अतुलनीय आनंद दिसतो. ह्या सगळ्या आनंदाला joy of creation म्हणता येईल. एक प्रकारचा एखाद्या निर्मितीत दडलेला आनंद.
आनंदी मनाची ही एक प्रकारची रेसिपी आहे. आपल्या आयुष्यात वेगवेगळे चांगले, वाईट अनुभव येतात. हे अनुभव एक प्रकारची शिकवण देवून जातात. तांडळातून जसे आपण खडे बाजूला करतो तसेच आपल्या आयुष्यातून वाईट खडे बाजूला करावे व आनंदाचे क्षण जमा करावे. मग बघा तुमच्या आयुष्यात फक्त आनंदीआनंद असेल की नाही.

पल्लवी उधोजी

Leave a Reply