भंडाऱ्यात रानडुक्कर शहरात शिरले, तिघांना केले जखमी

भंडारा : १० जून – एरव्ही जंगल किंवा जंगलालगत असलेल्या भागात आढळणाऱ्या रानडुकराने थेट भंडारा शहरात प्रवेश करुन तिघांना जखमी केले. एका युवकाने हिंमतीने त्या रानडुकराशी झुंज देत रानडुकराला आपल्या काबूत केले. ही थरारक घटना शहरातील शीतला माता मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास घडली.
शहरातील प्रसिद्ध शीतला माता मंदीर परिसरात पहाटेच्या सुमारास नेहमीप्रमाणे काही नागरिक फेरफटका मारत होते. तेवढय़ात एका रानटी डुकराने त्या परिसरात प्रवेश केला. या रानडुकराने काही नागरिकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात रजनी भरतसिंग भदोरीया (वय ५५) यांच्या पायाचा चावा घेतल्याने त्या जखमी झाल्या. तर रुपेश किशन नेवारे (वय २२) याच्या पायाला जखमी केले. भावेश किशन नेवारे या युवकावर रानडुकराने हल्ला केला असता त्याने रानडुकराशी निकरीने झुंज देत त्याला आपल्या काबूत केले. यात भावेशचे दोन बोटे फ्र ॅक्चर झालेत. भावेशने तब्बल दीड तास रानडुकराला पकडून ठेवले होते. त्यामुळे रानडुकराच्या हल्ल्यातून अनेक जण बचावले. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. परंतु, वनविभागाचे पथक दीड तास उशीरा पोहचल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. रानडुकरावर नियंत्रण मिळविण्यासाठी भावेशच्या मदतीला मनोज बांते, मोहन पायक, भास्कर नेवारे, किशन नेवारे, सुनिल नेवारे, युवराज भदोरीया, नत्थु गौर, ज्योतीबा हजारे यांनी मोलाची साथ दिली. भंडारा वन परिक्षेत्राचे एन.जी. श्रीरामे, नवनाथ नागरगोजे यांनी पिंजर्यात रानडुकराला टाकून ताब्यात घेतले. जखमींना उपचाराकरीता सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमींना शासनाच्या वतीने त्वरीत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील नागरीक तसेच नगरसेवक बंटी मिर्शा यांनी केलह आहे.

Leave a Reply