तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू

नागपूर : १० जून – नागपुरातून सहलीसाठी अंबाळा तलावावर गेलेल्या सहापैकी दोन मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाला. पोहता येत नसतानाही तलावात पोहण्यासाठी उतरणे त्यांच्या जीवावर बेतले.
नागपूरवरून बोलेरो एम. एच. ४३ / बी. पी. ५६0८ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने सहा तरुण बुधवारी (९ जून) पहाटे रामटेककडे निघाले. त्यांनी सकाळी आठच्या दरम्यान गडमंदिर परिसर बंद असल्याचे दिसताच अंबाळ्याकडे वळले. तेथे सुरक्षा चौकीत तैनात असलेल्या होमगार्डने त्यांना तेथेच थांबून घरी जाण्याचा सल्ला दिला. परंतु, ते तरुण आमगाव रस्त्याला लागून समोरच्या झाडात गाडी पार्क करून पायवाट रस्त्याने आमगाव मार्गे अंबाळा तलाव येथे पोहोचले व त्यातील सहाही जण तलावातील पाण्यात आंघोळ करायला लागले. सहापैकी कुणालाही पोहता येत नव्हते. आंघोळ करताना दोघांचा पायरीवरून पाय घसरल्याने दोघेजण पाण्यात बुडाले. निसर्ग प्रभाकर वाघ (वय १८, रा. मानवसेवानगर नागपूर), कुणाल अशोक नेवारे (वय १७) याचा मृतकांमध्ये समावेश आहे. लक्ष्मीकांत अनिल बाविलकर (वय १७, रा. गोधनी), प्रणय अजय वासनिक (वय १७, रा. गिट्टीखदान), अभिनय अजय जिचकार (वय १७), तन्मय संजय कुंभारे (वय १८) हे चौघेही घाबरून एकमेकाला आधार देत पाण्यातून कसेबसे बाहेर आले. रामटेक पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ पोलिस उपनिरीक्षक शिवाजी बोरकर, अंमलदार रवींद्र मारबते, सहायक पोलिस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे, अंमलदार आकाश शिरसाट यांनी दोन्ही तरुणांना पाण्यातून काढण्यासाठी मच्छिमार बांधवांचा आधार घेऊन शोधमोहीम सुरू केली. तातडीने पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी घटनास्थळाला भेट दिली. निसर्गचा मृतदेह पाण्यातून काढण्यात आला. तर कुणाल अशोक नेवारे याची शोधमोहीम सुरू आहे.

Leave a Reply