मोदी उध्दव भेटीचा अन्वयार्थ
एखादी अन्यथा दुय्यम वाटणारी राजकीय घटना सारा नॅरेटीवच कसा बदलवून टाकते याचे उदाहरण म्हणून मंगळवार दि. ८ जून रोजी राजधानी दिल्लीत झालेली पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्टÑाचे मविआ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या भेटीचे द्यावे लागेल. खरे तर या भेटीचा कार्यक्रम आधी जाहीर झालेला नव्हता. फक्त महाराष्टÑाच्या विविध समस्यांबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मराठा आरक्षण समितीचे समन्वयक अशोक चव्हाण यांचे एक शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार, एवढाच कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर झाला होता. त्या भेटीचे वृत्त छायाचित्रासह माध्यमात प्रसिध्द झालेही पण आज समाजमाध्यमांवर चर्चा मात्र मोदी उध्दव भेटीचीच होत आहे. यावरुन त्या भेटीचे महत्व अधोरेखित होते.
वास्तविक गेल्या दीड वर्षात शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जहाल आणि प्रसंगी कमरेखालची टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती. मोदींना शाहिस्तेखान म्हणण्यापर्यंत तिने मजल मारली होती. त्यासाठीच जणू काय ‘सामना’ आणि संजय राऊत यांना अधिकार दिले आहेत की, काय असा या टीकेचा रोख होता. सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आणि उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ह्या त्याच्या संपादक असल्यामुळे मोदींवरील टीका शिवसेनेच्या खात्यातच जमा होणे अपरिहार्य आहे. अशा स्थितीत जेव्हा उध्दव ठाकरे अधिकृत बैठक आटोपल्यानंतर पंतप्रधानांना विशेष विनंती करुन भेटीसाठी वेळ मागतात आणि भेटतात तेव्हा त्या भेटीची चर्चा होणे अपरिहार्यच ठरते. त्यातही आणखी विशेष म्हणजे उध्दवजींनी त्या भेटीचे जोरदार समर्थनही केले. ‘ मी काय पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना भेटलो काय, हा त्यांचा आक्रमक प्रतिप्रश्न आणि ‘ आम्ही राजकारणात सोबत नसलो तरी नाती कायम आहेत’ हा त्यांचा अभिप्राय त्या भेटीच्चे महत्व शतपटींनी वाढवितो आणि त्यामुळेच त्या भेटीवरच चर्चा केंद्रित होत आहे.
खरे तर या भेटीपेक्षा मविआच्या तीन मंत्र्यांनी घेतलेली पंतप्रधानांची भेट त्यातील विषयांमुळे अधिक महत्वाची ठरायला हवी होती. पण उध्दवजींनी पंतप्रधानांची वेगळी व्यक्तिगत भेट मागून व तिचे जोरदार समर्थन करुन अधिकृत विषयांचे महत्व कमी केले. त्याबद्दल मविआ नेते आज मौन पाळून असतील पण त्यांची खदखद लवकरच बाहेर आली तर ते आश्चर्य ठरु नये. मुख्यमंत्र्यांच्या या व्यक्तिगत भेटीची अजितदादा आणि अशोक चव्हाण यांना पूर्वकल्पना होती काय, हे अजून स्पष्ट झालेले नाही. पण ज्याअर्थी त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही त्यातून दोन्ही अर्थ निघु शकतात. पूर्वकल्पना असल्यामुळे ते बोलत नाही किंवा पूर्वकल्पना नसल्यामुळे काय बोलायचे हे त्यांनी पक्षश्रेष्ठींनी बोलावे अशी त्यांची अपेक्षा असली पाहिजे. पण या भेटीने केवळ त्यांचीच नव्हे तर मविआचीच कुचंबणा झाली आहे. कारण त्या भेटीनंतर मविआचे विसर्जन आणि पुन्हा सेना भाजपा युती जाहीर करणे तेवढे उध्दवजींनी बाकी ठेवले आहे.त्यामुळेही मविआमध्ये खदखद निर्माण झाली तर ते आश्चर्य ठरु नये. पण राजकारणी मंडळी कोणत्याही घटनेचे समर्थन करण्यात वा इन्कार करण्यात इतके माहीर असतात की, ‘महाराष्टÑाच्या व्यापक हितासाठी’ उध्दव ठाकरे कोणतीही पलटी मारु शकतात. त्यामुळे केवळ या भेटीच्या आधारावर सुप्रिया तार्इंकडे महाराष्टÑाचे मुख्यमंत्रिपद सोपविण्याची,भाजपाच्या बाहेरुन पाठिंब्याने राष्टÑवादीचे सरकार बनविण्याची घाई न केलेली बरी. काही मंडळींना या भेटीत भाजपासेना युतीचा संकेत दिसतो तर काहीनी कुचाळकी म्हणून मोदींनी उध्दवजींना अडीच वर्षे पंतप्रधानपद देण्याचे आश्वासन दिल्याचा विनोदी उल्लेखही केला आहे. पण अशा अभिप्रायांना कोणताही अर्थ नाही हे लवकरच स्पष्ट झाल्याशिवाय राहणार नाही.
हे शक्य आहे की, ही चर्चा मविआला अडचणीची वाटली तर सेनेचे प्रवक्ती संजय राऊत, राष्टÑवादीचे नबाब मलिक एखादी पत्रकार परिषद घेऊन या चर्चेचा इन्कार करतील व मविआचे ऐक्य कायम आहे, असा निर्वाळा देतील. हेही शक्य आहे की, या चर्चेच्या निमित्ताने भाजपावर दुगाण्या झाडून त्याच्यावर सत्तेसाठी आतुर झाल्याचा आरोप करतील. पण त्यामुळे या भेटीच्या परिणामी निर्माण झालेल्या वातावरणाचे निराकरण होऊ शकणार नाही. त्याचे कारण म्हणजे उध्दवज्ींनी या भेटीसाठी साधलेली वेळ. त्यांनी मविआच्या शिष्टमंडळासाठी वेळ मागणे, आपल्या मागण्या पंतप्रधानांकडे सादर करणे ही ठीकच आहे. पण या भेटीनंतर अजितदादा आणि अशोक चव्हाण यांना वगळून एकट्याने पंतप्रधानांची भेट घेणे व त्यानंतरचे अभिप्राय व्यक्त करणे यातून वेगळेच संकेत जातात हे निश्चित. विशेषत: उध्दव ठाकरे दिल्लीत जाऊन पंतप्रधानाना एकट्यात भेटतात आणि कॉंग्रेसअध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेण्याचा प्रयत्नही करीत नाहीत ही बाब पचविणे कॉंग्रेसला निश्चितच जड जाणार आहे. गेले दीड वर्ष पंतप्रधान आणि भाजपा यांच्या विरोधात राबविण्यात आलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आणि नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या शरद पवार यांच्या ‘सदीच्छा भेटी’च्या पार्श्वभूमीवर तर तसे संकेत निश्चितच जातात. कारण शरद पवार यांच्या पहिल्या शस्त्रक्रियेनंतर फडणवीस यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या असल्या तरी ‘सदीच्छाभेट’ घेतली नव्हती.
दुसरा मुद्दा असा की, राजकारणात केव्हाही आणि काहीही घडू शकते यावर आता लोकांचा विश्वास बसला आहे. पंचवीस वर्षांची भाजपासेना युती तुटेल यावर कुणाचा विश्वास बसत होता काय, शिवसेना कॉंग्रेससोबत सरकार बनवू शकते याची कुणी कल्पना केली होती काय, ? त्यामुळे राजकारणात कधीही, केव्हाही आणि काहीही घडू शकते हे लोकांना पटू लागले आहे.त्यामुळे मोदी उध्दव भेटीबद्दल वावड्या उडत असतील तर ते स्वाभाविकच म्हणावे लागेल.
एक मात्र खरे की, देशाला आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. प्रत्येक पक्ष त्या दृष्टीने तयारीला लागला आहे. ममतादिदींनी तर पावलेही उचलली आहेत. कॉंग्रेसने स्वबळावर लढण्याचा संकेत दिला आहे. त्यामुळे कॉंग्रेसेतर विरोधी पक्षात चुळबुळ निर्माण होत आहे. २०२४ पूर्वी राजकीय शक्तींची फेरमांडणी तर अटळ आहे. ही भेट तो संकेत तर देत नाही ना?
ल.त्र्यं.जोशी
ज्येष्ठ पत्रकार नागपूर