तसा ब-यापैकी पाऊस बरसत असतो… खरंतर खूप आतून बरसत असतो तो… तरीही तो भासतो अतृप्ततेचं लेणं ल्यायलेला… अतृप्ततेचं लेणं म्हणण्यापेक्षा मी म्हणीन की पाऊस तृषार्त वाटतो… अगदी चपखल शब्द म्हणजे प्यासा… जेव्हा पाऊस प्यासा वाटतो ना तेव्हा मी समजतो तो गुरुदत्तच्या डोळ्यांतून तो झरतोय… दुस-यांच्या ओंजळीत भरभरुन आनंदाच्या थेंबांचं दान देताना स्वतः काहीसा अलिप्त, काहीसा अस्वस्थ, काहीसा अव्यक्त आणि स्वतःला पोखरुन घेत अजून काहीतरी निर्माण करताना तृषार्त राहिलेला गुरुदत्त पावसाद्वारे व्यक्त होतोय, असा फील येतो…
रात्रीच्या भयाण शांततेत आभाळाला चिरत विजेचा होणारा लखलखाट आणि त्यानंतर पुन्हा सन्नाटा… पावसाची रिपरिप आहे असं वाटतं पण खिडकीतून डोकावताना ती रिपरिप नाही तर पावसाचं कोसळणं आहे, हे कळतं आणि समोरचा काळाकभिन्न अंधार मनाला घरं पाडू लागतो… तो पाऊस नक्कीच मीनाकुमारीच्या मनातून कोसळत असतो… आपल्या अभिनयातून नव्हे तर लेखणीतून अधुरं राहिलेलं स्वप्नं मीना जमिनीवर पाठवत असते ते याच पावसाच्या रुपात असं उगीचंच मनाला वाटत रहातं…
मधुबालासुद्धा बरसते कधीतरी हलक्या पावसाच्या रुपात… पण श्रावणात… सोबत इंद्रधनुला घेऊन… कारण आपल्या वैयक्तीक दुःखाला दडवत लोकांचं रंजन करण्यावर तिचा ठाम विश्वास असतो… म्हणूनच चार पावसाच्या थेंबांना ती पाठवत असते जमिनीवर इंद्रधनुचा खेळ खेळायला…
तसा रोमॅंटिक मूड घेऊन देव आनंदही येतो बरं का बरसत… त्याच्याबरोबर गडगडाट नसतो, लखलखाट नसतो… हवा जरा कुंद झाली की समजून जायचं असतं की देव आनंद येतोय… असो… निदान मी तरी खूपसं बॉलिवूड बघतोय पावसात… आता नेमकं कोण येणार आहे माहित हे माहित नाही, पण ढग मात्र ’ढोल बाजे’ म्हणायला लागलेत…
महेश घाटपांडे
(कॉकटेल या माझ्या पुस्तकातून)